Jump to content

अंगारमळा/१ अंगारमळा

विकिस्रोत कडून

१ अंगारमळा

 १९७६ च्या मे महिन्यात पहिल्याच तारखेला आम्ही हिंदुस्थानात परतलो. श्रेया आणि गौरी दोन्ही मुलींना खरं म्हणजे बर्न सोडल्याचं दु:ख होतं. "तिथेच राहावयाचं ठरवलं आहे, चला परत." म्हटलं असतं तर दोघींनीही 'हुप्पी' म्हणून आनंदाच्या आरोळ्या ठोकल्या असत्या, पण पोरी आपल्या बापालां पक्कं ओळखत होत्या. आता परत जाणे नाही हे त्यांना उमगले होते. अगदी समजायला लागल्यापासून त्या दोघीही स्वित्झर्लंडमध्येच वाढलेल्या. तसं त्यांचं सगळं विश्व तिथलंच.
 मायदेशाबद्दल साहजिकच त्यांचं मत बरं नव्हतं. १९७० मध्ये तीन महिन्यांची रजा घेऊन आम्ही एकदा परत आलो होतो. त्यांचं देशाविषयी चांगलं मत व्हावं याकरिता अगदी दिल्ली, सिमला, आग्रा, पुणे असा कार्यक्रम आखला होता. दिल्ली ते सिमला जायला मुद्दाम 'डिलक्स' बस घेतली होती. वाटेत जाताना बेफाम पाऊस सुरू झाला. त्या आरामगाडीच्या छपरातूनही धो धो पाणी आत येत होते. सगळे भिजून चिंब झालो. थंडीने काकडून गेलो. चंडीगड अगदी फ्रेंच स्थापत्यशास्त्रज्ञ कुर्वीसिऐची कलाकृती म्हणून अभिमानाने दाखवले. बसस्थानकावरील स्वच्छतागृह मुलींनी पाहिले आणि त्यांचा जीव घाबरा झाल्याचे मला जाणवले. शक्य असते, तर त्याच दिवशी विमान पकडून त्या परत बर्नला गेल्या असत्या.
 त्यांची शाळा, मित्र-मैत्रिणी, फ्रेंच भाषा, बर्फावरचे खेळ सगळे सगळे मागे टाकून त्या निघाल्या होत्या. आईबापांखेरीज विश्व नसलेल्या त्या अजाण पोरींवर खरं म्हणजे आम्ही केवढा जुलूम चालवला होता. गौरी काहीच बोलत नव्हती. श्रेयाला जाण मोठी. वातावरणात काहीतरी ताण आहे हे तिला कळलं होतं आणि काहीतरी गमतीचं बोलून, निदान बोलतं राहून ती ताण कमी करण्याचा प्रयत्न करू पाहत होती.
 लीलाही तशी गप्पच होती. मायदेशी परत येऊन कोरडवाहू शेती करायची या योजनेबद्दल गेली चार वर्षे आम्ही चर्चा करीत होतो. "शेती करायची, तर भरपूर पाण्याची करावी, शेती आणि गरिबी यांचा संबंध बागायती शेतीच्या प्रयोगातसुद्धा कळू शकेल," अशी तिची सूचना होती. आता उडी मारली म्हटल्यावर तिच्याही मनावर दडपण होतेच, पण बर्नला तशी ती कंटाळली होती. एम्.ए.ला पहिली आलेली, गणकयंत्राचे विशेष ज्ञान, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन या भाषांवर प्रभुत्व. पण बर्नला त्याचा काहीच उपयोग होत नाही अशी तिला खंत वाटे. हिंदुस्थानात आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल याची तिला खात्री होती, आणि जरूर पडली, तर एकटीने सगळा संसार सांभाळण्याची तिची हिंमतही होती. निदान तशी हिंमत असल्याचे ती दाखवत होती.
 तिच्या मनात खरोखरच काय चाललं होतं कोण जाणे. माझी ही उडी खरे म्हटले, तर तिच्यावरही अन्यायच होता. लग्न चारचौघांसारखं दाखवून झालेलं. माझ्या निरीश्वरवादामुळे विवाह कोणताही धार्मिक विधी न करता नोंदणी पद्धतीने झाला, एवढंच काय ते जगावेगळं लक्षण. आय.ए.एस. पास झालेल्या हुशार, कर्तबगार समजल्या जाणाऱ्या नवऱ्याच्या हाती तिने हात दिला, तो सुखासमाधानाच्या चौकोनी कुटुंबाच्या राज्यात चिरकाल राज्य करण्यासाठी. पुढं हे असं काही घडेल याची काय कल्पना?
 आपल्या संसाराचे वेगळेपण तिला लग्नानंतर फार लवकर लक्षात आलं असावं. तिनं स्वत:ला पार बदलवून टाकलं. माझी पहिली शिष्या तीच. बर्नच्या सुखसंपदेतलं माझं असमाधान तिला कळलं होतं. जानकीच्या निष्ठेने ती माझ्या मागोमाग येत होती. त्या वेळी कोणालाच ठाऊक नव्हते, की रामायणाच्या काळानंतर रावणांची संख्या फार माजली आहे आणि सीतेची शोकांतिका आता दंडकारण्यातच होते.
 सभा, भाषणांतून कोणी मी केलेल्या त्यागाचा आता उल्लेख केला म्हणजे मला हसू येतं. संघटनेच्या कामात मी काही करुणेच्या प्रेरणेने पडलेलो नाही. कोणा तळागाळातील जनसामान्यांचा उद्धार करण्याची मनिषा ठेवण्याचा उद्धटपणा माझ्याकडे नाही. या कामात मला अपरंपार आनंद मिळतो म्हणून मी हे काम करतो. आजपर्यंत हजारो शेतकरी आंदोलनात तुरुंगात गेले. कित्येकांनी लाठ्या खाल्ल्या. निपाणी भागात गेलो, तर डझनभर शेतकरी लाठ्या-गोळ्यांनी हातपाय गेलेले कुबड्या खाड्खाड् वाजवीत भेटायला येतात. बावीस घरांतली तरुण कर्ती माणसं पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडली. माझा सगळा संसार आज उजाड झाला आहे. लीला आज नाही. श्रेया, गौरीला लहानपणी कधी कोणत्या हट्टाला नाही म्हणावं लागलं नाही. आता अगदी साध्या गोष्टींकरितासुद्धा त्यांना आता हे आपल्याला परवडण्यासारखं नाही हे सांगायची वेळ येते; पण पोरी हुशार आहेत. बापावर अशी वेळ येऊच देत नाहीत. समजून घेतात. एवढं होऊनसुद्धा या कामात मला आनंद वाटतो. मग त्याग कसला? उलट, माझ्याइतकं भाग्यवान कोण? त्याग काय आजपर्यंत थोड्यांनी केला? अनेकांची बलिदानं व्यर्थ गेली. त्यांच्या नजरेला काहीसुद्धा फळ पडलं नाही. मी शेतकऱ्यांच्या ना जातीचा, ना पातीचा, ना पेशाचा. देशभरातील शेतकऱ्यांनी मला जे प्रेम दिले त्याला तोड नाही.
 थोडं नाटकी वाटेल; पण आमचं घर मोडलं तरी श्रेया, गौरी आणि मी आज शेकडो कुटुंबांत घरातल्यासारखे वावरतो.
 माझी एक आई आहे. चिकोडी तालुक्यात निपाणी आंदोलन १४ मार्च १९८१ ला चालू झाले. चार- पाच हजार शेतकरी जमतील सत्याग्रहाला अशी अपेक्षा होती. तिथे चाळीस हजारांवर शेतकरी जमले. सात आठ किलोमीटर लांबीचा पुणे-बंगळूर रस्त्याचा भाग आंदोलननगराने व्यापला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकारांबरोबर प्रत्येक गावच्या मांडवाला भेट देत निघालो. एक म्हातारीशी बाई धावत माझ्याकडे आली. उंच शिडशिडीत बांधा. जन्मभरचे कष्ट, चेहऱ्यावरच्या रेषारेषांच्या जाळ्यांत खोदलेले. मला म्हणाली, "साहेब, तुम्ही गावांतल्या माय-बहिणींना सत्याग्रहाला यायला सांगितले म्हणून आलो. नेसूचं धड नव्हतं म्हणून शेजारणी कडून लुगडं घेऊन आलो बघा." या माझ्या आईच्या घरी मी नंतर गेलो. आपल्या लेकीच्या घरून दूध आणून तिनं मला प्यायला दिलं. मला दूध पिताना पाहिलं तेव्हाच तिला समाधान वाटलं.
 पण 'त्याग' शब्दाची विदारक जाणीव प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळणं कठीण. दु:खे अगदी छोटी छोटी; पण फार टोचायची. मुलींना फ्रेंच, जर्मन, लॅटिन सोडून आता मराठी, हिंदी, इंग्रजी शिकायचं होतं. बर्नमधून निघण्यापूर्वी श्रेयानं फ्रेंचमध्ये कोपर्निकसवर निबंध लिहिला होता. ती आता 'गमभन’ गिरवायला बसली होती. मुलींना शाळेत प्रवेश मिळण्याची मोठी अडचण झाली. ओळखपाळख कुठे वापरायची नाही असा निश्चय केला होता. शिक्षण निदेशालयातल्या सामान्य कर्मचाऱ्यांपुढे रांगेत उभा राहून जात होतो. दरवाज्यापाशी बसत होतो. काही अधिकाऱ्यांची शिरजोरी पाहून वाटायचे, आता यांना आपण कोण आहोत ते सांगावं. जादूची कांडी फिरल्यासारखं काम होऊन जाईल; पण प्रत्येकवेळी मोह आवरला. रेशनदुकान, गॅस वितरक, वकील, मुख्याध्यापक सर्वांपुढे तोंड वेंगाडणे झाले. आम्ही चेहऱ्यावर कोणीच काही दाखवत नव्हतो. लीला मात्र जास्त आक्रमक बनत चालली होती. आमच्या उपक्रमाविषयी कोणी चिंता, शंका व्यक्त केली की ती त्याच्यावर तुटून पडायची. बाहेरून आमच्यातील प्रत्येकजण सगळं काही व्यवस्थित चाललं आहे असं दाखवीत होता. दुसऱ्याचा धीर तुटू नये अशी कोशीश करीत होता.
 झोपी जातांना चिंतांची तोटी बंद करून झोपी जायचं ही माझी फार जुनी कला आहे. झोप लागताना सगळ्या चिंतांचा आणि तणावांचा काही त्रास झाला नाही. रात्री अडीचतीन वाजता मात्र झोप खाडकन खुले. पुढे झोपणेच अशक्य होई. कपाळाला हात लावून मी स्वत:लाच विचारी, "मी पाहतो आहे ते खरं की स्वप्न?" आसपास शांतपणे झोपलेल्या लीला, श्रेया, गौरीकडे पाहून पोटात गलबलून यायचं. यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा मला काय अधिकार होता? त्याग म्हणजे रुपयापैशांचा नसतो. त्याग अशा अनेक दाहक क्षणांनी गुंफलेला असतो.

 आंबेठाण येथे शेती तर घेतली. साडेतेवीस एकर कोरडवाहू जमीन. पुण्यातल्या सिंध कॉलनीत घर घेतलं, मुलींच्या शाळेच्या सोयीने. घराचे नाव ठेवले 'मृद्गंध'. आंबेठाण या माळरानातल्या रखरखीत शेताचे नाव काय ठेवावे? मराठीतल्या कवितांत नावे शोधायची माझी जुनी सवय. केशवसुतांच्या-


 जेथे ओढे वनराजी । वृत्ती तेथे रमे माझी।
 कारण काही साक्ष तिथे । मज त्या श्रेयाची पटते।

 यावरून पहिल्यावहिल्या मुलीचे नाव ठेवले. आता कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या-

 पदोपदी पसरून निखारे, आपुल्याच हाती
 होवूनिया बेहोश धावलो, ध्येयपथावरती
 कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
 बांधू न शकलो प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
 एकच तारा समोर आणिक, पायतळी अंगार

 बस शेताचे नाव ठेवले 'अंगारमळा', या अंगाराने पुढे वणवा पेटायचा होता.


 एक जानेवारी १९७७ ला कामाला सुरुवात केली. तातडीने दोन विहिरींची कामे सुरू केली. रब्बी पिके संपल्यानंतर आमच्या भागात रोजगार नाहीच. अडीचशे तीनशे माणसे कामाला असायची. मलाही काम उरकायची घाई होतीच.खोदणे, सुरुंग लावणे, बांधकाम करणे, खरिपाची तयारी करणे अशी सगळी कामे चार एक महिन्यांत आटोपायची होती. मजुरी किमान वेतन कायद्याप्रमाणे स्त्रियांना आणि पुरुषांना सारखीच, तीन रुपये ठरवली. मला त्या वेळी मजुरी नगण्यच वाटायची; पण गावकऱ्यांत खळबळ माजली. तसे आंबेठाणमध्ये भूमिहीन कोणीच नाही; पण अजिबात दुसरीकडे मजुरीला जातच नाही अशी डझनभरसुद्धाघरे नसतील. त्यातलीच काही मंडळी भेटायला आली. उन्हाळ्याच्या दिवसांत विहिरीच्या कामाचा चालू रोज दीड रुपया होता. मी रोज वाढवला तर बाकीच्यांनी पैसे कुठून द्यावेत आणि कामे कशी करून घ्यावीत? मला त्या वेळी तरी त्यांची खरी अडचण समजली नव्हती. मी म्हटले,

 "मी बाहेरचा माणूस. कायद्याने ठरवलेल्यापेक्षा कमी वेतन कसा देऊ?" त्यांना काही पटले असे दिसले नाही; पण पुढे बोलता तरी आले नाही. आज किमान मजुरी बारा रुपये रोज आहे (सप्टेंबर १९८८). प्रत्यक्षात पुरुषांना त्याच्यावर व स्त्रियांना बहुतेक कामांना सातच्या वर रोज आहे. शेजारी महाराष्ट्र उद्योग महामंडळाची उद्योगनगरी उभी राहते आहे. तेथे बांधकामावर मजुरीसाठी वीस वीस रुपये मिळतात. १९७७ मधली गावकऱ्यांची अडचण मला आज समजते आहे. "तीन रुपये तुम्ही देऊ शकता, आनंद आहे. आम्ही द्यावे कोठून?" कारखानेवाले वीस रुपये देऊ शकतात, भले हो त्यांची. मी द्यावे कसे व कोठून? १९७८ पासून मी संकरित ज्वारी किलोला सव्वा रुपयाच्या आसपास विकतो आहे. कांद्याला दरवर्षी साठ रुपये क्विंटल भाव पक्का. पैसे आणावे कोठून?

 शेतावर मुक्कामाला अजून आडोसा नव्हता. शेतावर वीज नाही. हे लांब लांब साप निघत. साप निघाला नाही असा दिवसच नाही. नाथा भेगडे फटाफट साप मारायचा. आता माझ्या शेताचा कारभारी तोच आहे; पण साप मारणे त्याने एकाएकी सोडून दिले. सकाळी उठून मी चाळीस किलोमीटर 'चेतक'वरून येई. वेगवेगळ्या ठिकाणी कामे चालत. पाळीपाळीने रांगेत जाऊन दगड पाट्या उचलू लागे. कामावर येणारी अडीचशे तीनशे बायामाणसं पाच-पाच, दहा-दहा किलोमीटर चालत अनवाणी पायांनी येत. भर उन्हाळ्याचे दिवस. प्यायच्या पाण्याची गैरसोयच. परातीत पाणी घेऊन तोंडाला पदर लावून पाणी गाळून प्यायचे. निसर्गाने बुडविलेल्या, चोरांनी लुटलेल्या, सावकारांनी नाडलेल्या, सुलतानांनी पिडलेल्या, धर्मजातींनी गांजलेल्या या मंडळींच्या जवळ जाण्याचा मी प्रयत्न करीत होतो; पण कुणी खुलेपणाने बोलत नव्हते. त्यांच्यात माझ्यात अंतर किती? ते उलंघावे कसे? पुढे पुढे मला युक्ती कळली, निबंधवार उत्तरे द्यावी लागतील असे प्रश्न विचारायचेच नाहीत. वस्तुनिष्ठ प्रश्न विचारायचे. उत्तरे आपण सुचवायची. उत्तर कोणत्या तोंडातून दिले जाते, त्यापेक्षा उत्तर देताना चेहऱ्यावरची मुद्रा बारकाईने न्याहाळायची.

 मध्ये जेवायची सुटी दोन तास असायची. म्हणजे गावातल्या लोकांना गावात जाऊन भाकरतुकडा खाऊन यायला वेळ मिळे. तरी बरेच लोक शेतावरच सावलीला थांबत. एक दिवस मी सुचविले, "दुपारी सर्वांनी भजन म्हटले तर?" दुसऱ्या दिवशी मृदुंग, झांजा हजर झाल्या. शेतावरच्या कामाला सुरुवात झाल्यापासून मनातली उदासीनता वाढत चालली होती. कुठे जिनेव्हा न्यूयॉर्कमधील अलिशान सभागृहांतील बैठकीमधील चर्चा आणि कुठे या वैराण कातळांवरच्या जीवघेण्या उकाड्यात दगडांचे ढीग टाकणं. कोठे

होतो? कोठे आहे? काय होतो? काय आहे? असा षडाक्षरी मंत्र सारखा जपत होतो. भजनाने तरी काही बरे वाटले तर बघत होतो. खरे म्हणजे गावातले भजन नेहमी 'केशवा माधवा'नेच चालू व्हायचे; पण या निरक्षर अडाण्यांनी मी त्यांच्या चेहऱ्यावर वाचले नव्हते इतके भाव माझ्या चेहऱ्यावर वाचले होते. भजनाची सुरुवात झाली,

 हरिश्चंद्र राजा, तारामती राणी
 डोंबाघरी भरी पाणी, डोंबाघरी पाणी..

 मृदुंग झांजांचा कल्लोळ आणि गाणाऱ्यांची सामूहिक बेसूरता ओलांडून अर्थ असा भिडला, की गळ्यातला आवंढा गिळेना.


 आणीबाणीचा काळ अजून चालू होता. भूमिहीनांना दोनअडीच एकर जमिनीची वाटणी चालली होती. माझ्या जमिनीच्या पश्चिमेला दहाबारा घरांना मिळालेल्या जमिनी पडून राहिल्या होत्या. महाळुंग्याच्या शिवळे पाटलांच्या जमिनी कित्येक आदिवासींना मिळालेल्या, रिकाम्याच पडल्या होत्या. हे प्रकरण मला काही समजेना. खरे म्हणजे जमीन मिळाल्यानंतर नवभूधारकांनी उत्साहाने जमीन कसायला लागले पाहिजे होते. जमिनीचे फेरवाटप झाले, जमीन नसणाऱ्यांना जमिनी मिळाल्या म्हणजे ग्रामीण दारिद्राचा प्रश्न सुटतो असे आम्ही कित्येक वर्षे ऐकत, घोकत होतो आणि या जमिनी हाती आलेल्यांना त्याचे काहीच कौतुक नव्हते.

 कुणी म्हणाले, जमीन मिळाली तरी औते पाहिजेत, बैल पाहिजेत, बियाणे पाहिजे, खतं पाहिजेत, नुसती जमीन घेऊन काय करता? अकलूजला का कुठे कुणी पुढाऱ्यांनी नवा प्रयोग केला. नवभूधारकांना त्यांच्या जमिनी नांगरून, पेरून द्यायच्या. मी मनात विचार केला, पाचपंचवीस नवभूधारक एकत्र झाले, थोडीफार पैशाची सोय झाली, तर सामूहिक शेती जमणार नाही का? खेडच्या प्रांत अधिकाऱ्यांनी दावडीच्या नवभूधारकांची गाठ घालून दिली. अडचण कोणतीच नव्हती, जुना मालक थोडा कटकट्या होता; पण कायद्याने त्याचे काहीच चालण्यासारखे नव्हते. मामलेदारांनी स्वत: येऊन जमिनीच्या सीमा काढून दिल्या. एकूण अकरा भूमिहीनांना सलग जागी जमीन मिळाली होती. अकरा घरच्यांची बैठक बोलावली. निम्मेअधिक चावडीवर आले. सगळ्यांनी सामूहिक शेती करायची. सगळ्यांची जमीन सामूहिक मानायची. माझा हा तुकडा असे म्हणायचा कोणालाच अधिकार राहणार नाही. नाही तर विहिरीची जागा ज्याच्या जमिनीवर लागेल, तो विहीर खणून झाल्यावर म्हणायला लागायचा- मला नाही तुमच्या सामूहिक शेतीत

सामील व्हायचे. व्हा माझ्या जमिनीच्या बाहेर; म्हणजे मग सगळेच मुसळ केरांत जायचे. शेतीचे नाव ठरले, 'अकरा भूमिपुत्र'.


 एक एक गमतीची गोष्ट लक्षात आली. या अकरापैकी तीनच खऱ्या अर्थाने भूमिहीन होते. त्यांच्या घरचे पुण्या-मुंबईला नोकरीत होते. त्यांना शेती नावावर झाली यात आनंद होता. वेगवेगळ्या पुढाऱ्यांना भेटून त्यांनी जमीन मिळावी याकरिता पैसा खर्चही केला होता; पण जमीन कसण्यात त्यांना मनातून काहीही उत्साह नव्हता. माझ्यासमोर, अधिकाऱ्यांसमोर जमीन कसण्याबाबत आपल्या उत्साहाचे प्रदर्शन करण्यात मात्र त्यांची अहमहमिका चाले. बँकेकडून कर्ज मिळवायची व्यवस्था मी खेटे घालून घालून करून आणली. बरोबर अकरापैकी फक्त एकच भूमिपुत्र; बाकीचे सगळे घरच्या कामासाठी गुंतलेले. एकोणीसाव्या शतकातील मिशनऱ्यांच्या धाटणीवर मी स्वत:लाच धीर देत होतो. आपल्यावर विश्वास ठेवण्यासारखे आपण प्रत्यक्षात काय करून दाखवले आहे? त्यांनी निरुत्साह दाखवावा हे साहजिकच नाही, योग्यही आहे. काम उभे राहील तस तसा त्यांचा विश्वास वाढेल.


 जमीन डोंगराच्या कपारीत उतरणीवर, बांधबंदिस्तीचे मोठे काम करणे जरूर होते. संबंधित खात्याच्या मंडळींनी काम करून देणे कबूल केले. अट एक-कामाकरिता रोजावर लावायची माणसे जागेवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची. मी आनंदाने कबूल केले. तालुक्याच्या गावाहून दावडीला आलो. दोन चार भूमिपुत्र भेटले. त्यांना निरोप दिला, दोनचार दिवसांत आपण शेतीवर राहायला जायचे. प्रत्येक नवभूधारकाच्या घरातली दोन माणसे तरी राहायला आली पाहिजेत. बांधबंदिस्तीचे काम आपणच केले तर पदरचा खर्च करावयाच्या ऐवजी मजुरी मिळेल. जे गैरहजर राहतील त्यांना वेगळा भार द्यावा लागेल.


 ठरलेल्या दिवशी सकाळी उजाडता उजाडता दावडीला गेलो. कोणत्याच घरचे कोणीच सापडेना. तास दोन तासांत चार घरातली नऊ माणसं हाती लागली. त्यांना माझ्या जीपमध्ये घालून त्यांच्या जमिनीवर नेले. जमिनीवर अफाट दगडगोटे गोळा करायला सुरुवात झाली. दगड लावून घेऊन पहिल्यांदा रात्रीकरिता आडोशाच्या भिंती करून घ्यायला सुरुवात झाली. संध्याकाळी कंदिलाच्या प्रकाशात सगळ्यांनी भाकऱ्या खाल्ल्या.

मायदेशी परत आल्यापासून आयुष्याला काही दिशा सापडते आहे असं वाटलं. जेवण झाल्यावर दोन तरुणांनी गावात जाऊन उद्या सकाळी प्रत्येक घरच्या दोघादोघांना गोळा करून आणण्याची हमी देऊन गावाकडे प्रस्थान ठेवले. एक दोन तशीच सटकली. आम्ही सहा जण दगडांच्या रचलेल्या भिंतींच्या आडोशात डोंगरातील वाऱ्याच्या भणभणाटात रात्र काढली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत नवीन कोणीच आले नाही. गावातल्या कोणत्या तरी मर्तिकाची बातमी लागली. राहिलेले भूमिपुत्रही लगबगा गावाकडे जाऊ लागले.

 अशाच प्रकारची पुनरावृत्ती होऊ लागली. तेव्हा मी सगळ्यांना एकदा विचारले, "तुमची अडचण तरी काय आहे? तुम्हाला शेती करायची आहे की नाही? नसेल करायची तर मला मोकळे करा."

 "वा, वा! असं कुठं झालंय? तुम्ही गेला म्हणजे सगळंच कोसळंल बघा. मग तर आम्हाला तोंडात मातीच घालावी लागेल अन् तो मालक आम्हाला आता जगू देईल का? साहेब, असं करू, जरा बेताबेतानंच घेऊ, मालकाला एकदम चिडवणं बरं नाही..." वगैरे, वगैरे, वगैरे.


 माझ्या एकूण प्रकरण लक्षात आलं. एव्हाना हजार दोन हजार मी पदरचे खर्चुन बसलो होतो. अकरापैकी एकालाही जमीन कसण्याची आणि कष्ट करण्याची इच्छा नव्हती. बिगर शेती उत्पन्नाचे साधन असतानाही भूमिहीन म्हणून नावे नोंदवून त्यांनी जमीन मिळवली होती. माझ्यासारख्या शहरी माणसापुढे भूमिहीनतेचे करुण नाटक करून दाखवायचे कौशल्य त्यांना जमले होते. गावकऱ्यांपढे त्यांचे नाटक चालत नव्हते. त्यांना जमीन कसायची नव्हती. पुढेमागे खरीददार सापडला तर विकून दोन पैसे करायचे होते आणि जमले तर हस्तांतरित जमिनी म्हणून त्या कदाचित परतही मिळवायच्या होत्या.



 ....पण यात त्यांचे कुठेच चुकत नव्हते. चुकत माझेच होते. बँकेच्या कर्जाचे प्रकरण करतानाच माझ्या लक्षात आले होते. विहिरीचा खर्च करून, पाण्याची सोय करून शेती करायची म्हटले तर कोणतेही पीक काढले तरी बँकेच्या कर्जाची परतफेड यावज्जन्म शक्य नव्हती. दरवर्षी चांगले पीक येईल असा हिशेब केला तरी खर्च फिटत नव्हता. ही काय गंमत आहे. याचा उलगडा मला स्वत:ला त्या वेळी झाला नव्हता. गावकऱ्यांना ते कळलं होतं. भूमिपुत्रांनाही ते कळलं होतं; पण ते मला सांगत नव्हते. हे सर्व समाजव्यवस्थेचं गुह्यतम गुह्य आणखी उग्र तपस्येने माझे मलाच शोधावे लागणार होते.

 "तुमची सगळ्यांची जमिनीवर राहायला जायची तयारी झाली, म्हणजे मला निरोप द्या." असं म्हणून मी भूमिपुत्रांचा निरोप घेतला. एक धडा शिकून. यापुढे लोकांचे भले करण्याचे प्रयत्न बंद. भिकेच्या आणि मदतीच्या प्रकल्पातून गरिबीचा प्रश्न सुटत नाही. वर्षानुवर्षे गावागावातील गरिबी संपण्याबद्दल जो मार्ग मनात शंकासुद्धा न आणता मी मानला होता, त्याबद्दलच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पुन्हा एकदा शून्यावर आलो होतो. स्वित्झर्लंडला परत जाण्याचा मोह मी कसा टाळला कुणास ठाऊक?

(सा. ग्यानबा, १२ सप्टेंबर १९८८)

■ ■