अंगारमळा/मी 'साहित्यिक' नाही!

विकिस्रोत कडून

मी 'साहित्यिक' नाही!


 मी औरंगाबाद येथे उसावरील झोनबंदी विरोधात उपोषणाला बसलो असतांना साहित्य संमेलनाचे संयोजक मला निमंत्रण देण्यास आले होते. तेव्हा पुढील घटना अनिश्चित असल्याने मी ते निमंत्रण स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भत नव्हता; पण मंडळी मोठी चिकाटीची. उपोषण संपल्यानंतर मी जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालो तेव्हा वसमत मुक्कामी त्यांनी मला पुन्हा गाठलं. खरं तर हे निमंत्रण टाळायचा मी प्रयत्न करीत होतो. म्हणून मी विचारलं, "तुमचं साहित्य संमेलन आहे म्हणजे थोर थोर नेतेगण, पुढारी, मुख्यमंत्री नाही तर निदान एखादे मंत्रिमहोदय येणार असतील? आसपासचा एखादा साखर कारखाना किंवा एखादी सहकारी संस्था शेतकऱ्यांकडून निधी वसूल करीत असणार! तेव्हा अशा संमेलनाला येणं मला थोडं अवघड जातं; कारण एरवी मी त्यांच्याविरुद्ध लढत असतो;" पण माझा अपेक्षाभंग झाला. त्यांनी मला आश्वासन दिलं, की इथे असे कोणी नेते पुढारी येणार नाहीत आणि कुणाकडूनही सक्तीने पैसे वसूल करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्रामध्ये आजकाल दुर्मिळ झालेली गोष्ट म्हणजे ज्याला पुढाऱ्याचा डाग लागलेला नाही असा साहित्याचा मंच; तो इथं उभा राहतो आहे, हे पाहून मी या संमेलनाला यायचं कबूल केलं.

 या संमेलनाच्या समारोप समारंभाच्या आधी श्री. शेषराव मोऱ्यांचे भाषण आणि इंद्रजित भालेरावांचं काव्यगायन आहे असं काल अकोल्याला वर्तमानपत्रात वाचलं आणि दोन तास आधी इथं येऊन बसलो आणि एरवी कधी शक्य नाही अशी संधी घेऊन या दोघांचेही कार्यक्रम ऐकण्याचा लाभ घेतला; कधी मिळत नाही इतका आनंद मिळवला. इंद्रजीत भालेराव तसे माझे मित्र झाले आहेत. बरेचदा ते आपल्या कविता ऐकवायला येतात आणि माझेच अर्थशास्त्र ऐकून परत जातात. म्हणून ही संधी घेण्याचा प्रयत्न केला; पण वेळेच्या आधीच्या माझ्या उपस्थितीमुळे संयोजकांची अडचणच झाली असे दिसते. कारण काव्यगायनाचा रंगलेला कार्यक्रम थांबवून समारोपाचा कार्यक्रम वेळेवर, दोन वाजता सुरू करावा का नाही असा त्यांच्यापुढे पेच पडला. निष्कर्ष एवढाच, की पुढारी राजकीय नसला तरी त्याने, सार्वजनिक जीवनातील माणसाने, रसिकांच्या मेळाव्यात आगाऊपणे जाण्याचा प्रयत्न करू नये.

 इथे दोघांना साहित्यसेवेबद्दल पारितोषिके देण्याचा कार्यकम झाला. काय म्हणावं

त्यांच्याबद्दल? मी एवढंच म्हणेन की, "हे प्रतिभाशाली पारितोषिक विजेत्यांनो! हे पारितोषिक मिळूनसुद्धा तुमची प्रतिभा जिवंत राहो अशी मी आशा व्यक्त करतो." खरं म्हणजे एकदा पारितोषिक मिळालं, की नंतर काही त्या साहित्यिकाचं खरं नसतं ! किंबहुना, राजाश्रय लाभल्यानंतर साहित्यगुण किंवा प्रतिभा कितपत टिकते, हा मोठा वादाचा विषय आहे.

 माझी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ओळख असली तरी मी चुकून अर्थशास्त्र घेतलेला मनुष्य आहे. मी मुळामध्ये संस्कृत भाषेचा अभ्यासक आहे. कालिदास हा माझा आवडीचा कवी आहे. आज जर वेळ असता आणि संधी मिळाली असती तर कालिदासाच्या कोणत्याही काव्याचं निरूपण येथे करू शकलो असतो; पण अशा या थोर कवी कालिदासामध्ये पुढे एक मोठा दोष निर्माण झाला. त्यांनी राजाश्रय स्वीकारला आणि त्यानंतर त्यांच्याकडून ठरावीक पठडीतील काव्यच निर्माण व्हायला लागलं. तसं आजच्या या पारितोषिक विजेत्यांचं न होवो! सुदैवाने, भाग्याने यांना लाभलेल्या सरस्वतीचा वरदहस्त शासनाच्या पारितोषिकाला तोंड देऊन अबाधित राहो एवढी शुभेच्छा दोघांसाठी व्यक्त करतो.

 मी तर साहित्यिक नाही, म्हणजे साहित्यिक म्हणून मला मान्यता नाही. तसं कालपरवापर्यंत मला अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही मान्यता नव्हती. मी कुठं अर्थशास्त्रावर बोलायला गेलो, की त्या त्या संस्थांचे प्रमुख आपल्या विद्यार्थ्यांना सांगायचे, "लक्षात ठेवा! आपण अभ्यासक आहोत आणि शरद जोशी आंदोलक आहेत. तेव्हा ते काय म्हणतात त्यानं तुमची डोकी बिथरू देऊ नका!" गमतीची गोष्ट अशी, की आपल्या विद्यार्थ्यांना या तऱ्हेने बजावणारी काही माणसं, मी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काम करीत असताना त्यांना अर्थशास्त्रासंबंधी एखादी नोकरी मिळावी यासाठी माझा वशिला लावायचा प्रयत्न करायची; पण ते काम सोडून इथं आल्याबरोबर (त्यांच्या लेखी) मी एका दिवसात आंदोलक बनलो! डंकेलसाहेबाने मांडलेल्या प्रस्तावामुळे इतर काही परिणाम झाले त्याचा विचार सोडून देऊ; पण त्या प्रस्तावाच्या विरुद्ध सारा हिंदुस्थान आणि बाजूने मी एकटा अशी मोठी कुस्ती झाली. त्याचा निकाल माझ्या बाजूने लागला हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यानंतर आता ही मंडळी हळूहळू शरद जोशी 'अर्थशास्त्री' नाही; पण निदान कृषिअर्थशास्त्री आहेत असं लाजतकाजत का होईना, म्हणायला लागली आहेत.

 साहित्याच्या बाबतीतही तेच आहे. मी आतापर्यंत अठरावीस पुस्तके लिहिली आहेत. मराठीबरोबर इंग्रजीतही लिहिली आहेत. माझ्या काही पुस्तकांची इतर भारतीय भाषांत

भाषांतरंही झाली आहेत आणि ही सगळीच पुस्तकं काही अर्थशास्त्रावरची नाहीत किंवा शेतीवरची नाहीत. स्त्रियांच्या प्रश्नांचं विश्लेषण करणारं 'चांदवडची शिदोरी', शिवाजी महाराजांच्या चरित्रात डोकावणारं 'शेतकऱ्यांचा राजा शिवाजी', जोतिबा फुल्यांच्या 'शेतकऱ्यांचा आसूडा'ला केलेला 'शतकाचा मुजरा', जातीयवाद, धर्मवाद यांचं रसायनशास्त्र उलगडणारं 'जातीयवादाचा भस्मासुर' अशी अर्थशास्त्रापेक्षा वेगळ्या विषयांवरचीही पुस्तकं आहेत. ललित साहित्य मी काही फारसं लिहिलं नाही. मी लिहिलेल्या लेखांतले दोनचार लेख ललित आहेत असं काही लोकांचं म्हणणं आहे. इतकं लिहिलं तरी मी बहुधा साहित्यिक नसावा! कारण, आजकाल ज्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत आणि ज्यांना काही पारितोषिकं मिळालेली नाहीत असे लेखक मोठे प्रयत्नपूर्वक शोधावे लागतील. मी त्यांच्यातलाच एक आहे. माझ्या एकाही पुस्तकाला पारितोषिक मिळालेलं नाही. माझ्या 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती' या पुस्तकाच्या, जे ललित लेखन नसूनसुद्धा ४० हजार प्रती संपल्या आहेत. महात्मा फुले समग्र वाङमयाच्या नवीन आवृत्तीचा विक्रीचा विक्रम सोडल्यास हा मराठीतील उच्चांक आहे आणि तरीही मला साहित्यिक म्हणून मान्यता नाही. मी प्रचलित अर्थानं साहित्यिक असेन असे मलाही वाटत नाही.

 मी साहित्यिक का नाही ते सांगतो. मला दु:ख पाहवत नाही आणि ऐकवत नाही, ही अगदी खरी गोष्ट आहे. हे इंद्रजित भालेराव इथे इतक्या लोकांच्या समोर बसून त्यांच्या 'जन्माची कहाणी' कशी काय सांगतात याचं मला मोठं आश्चर्य वाटतं! मला नाही सांगता येणार, मी ओक्साबोक्शी रडायला लागेन. आजकाल भालेरावांवरही तसाच परिणाम होतो आहे असं वाटतं. पहिल्यांदा मला जेव्हा त्यांनी ही कविता म्हणून दाखवली तेव्हा शांतपणे एक एक ओळ म्हणत होते; आज भरभर म्हणून टाकत होते. त्यांची दुसरी एक कविता इथे ऐकायला मिळेल असं वाटत होतं. 'एक लहान पोर बापाकडे चिटाच्या कापडाचा सदरा हवा म्हणून हट्ट करतं. मग आई त्याला सल्ला देते, की तुझा तू सदरा कमव. गुरं राखताना जी काही 'बोंदरं' झाडाला लागली असतील ती गोळा कर, वेगळी वीक आणि तुझा चिटाचा सदरा घे.' ही कविता मला अत्यंत आवडली. मी आतापर्यंत तीनदा तीन वेगवेगळ्या माणसांना ती वाचून दाखवायचा प्रयत्न केला; पण जेव्हा कवितेत पोराचा बाप पोरानं जमवलेल्या कापसाला भाव न आल्याने पोराला पैसे देऊ शकत नाही म्हणून संतापून उठतो, मनगट चावत शिव्या घालू लागतो, पोराची पाठ बडवतो. त्या जागी मी तिन्ही वेळा अक्षरशः रडू लागलो. निर्विकारपणे दुःख पाहण्याचं, ऐकण्याचं मन

माझ्याकडे नाही, तशी ताकद नाही आणि तुम्हा साहित्यिकांच्या सहजतेने व्यक्त करण्याची ताकद नाही. मग, आम्ही काय करतो? आकडेवारीच्या आणि अर्थशास्त्राच्या आलेखांमागे लपतो. शेतकऱ्यांचं दु:ख आमच्या तब्येतीला काव्यात सांगणे झेपत नाही. मग, रडू येऊ नये म्हणून आम्ही आकडेवारी मांडतो अन् रडू येऊ म्हणून सिद्धांत मांडतो. स्वत:च्या घामाने मिळणे शक्य असलेल्या 'न मिळणाऱ्या सदऱ्या' बद्दल बोलू शकत नाही म्हणून आम्ही 'उणे सबसिडी'ची गोष्ट करतो. म्हणून, मी साहित्यिक नाही, असं मी म्हणतो.

 तसं, मी काही थोड्या काठीण प्रसंगांना तोंड दिलं नाही; तरीसुद्धा लहान मुलाचं दु:ख मला सहन होत नाही. मोठ्या माणसांच्या, विशेषत: वयात आलेल्या पुरुषाच्या दु:खाचं मला काही फारसं वाटत नाही. वाटतं, त्यांनी तोंड दिलंच पाहिजे; पण, स्त्रिया व लहान मुलं यांचं दु:ख खरंच सहन होत नाही. म्हणून आम्ही आकडेवारी मांडतो.

 साहित्यिकाचीही स्वत:ची एक ताकद असते. मगाशी मोरेसाहेबांनी सावरकरांवर चांगल भाषण केलं. त्यांनी म्हटलं ते खरं आहे. तुम्ही सावरकरांचं कवित्व विसराल तर सावरकरांचं विज्ञान समजणं अशक्य आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. साहित्यिक ताकद कशी काय उपयोगी पडते? मी एक उदाहरण सांगतो. मी संयुक्त राष्ट्रसंघाची नोकरी सोडून इकडे आलो आणि तिकडे जिनेव्हामधल्या संरमरवरी महालामध्ये भाषण करणारा मी, इकडे चार वर्षांच्या आत मला येरवड्यामध्ये फाशीच्या कोठडीत ठेवण्यात आलं. पहिल्याच आंदोलनात शासनानं मला तुरुंगात टाकलं आणि पोलिसांना भीती अशी, की तुरुंगात आजूबाजूला चारपाच हजार शेतकरी आहेत, त्यांच्यात या माणसाला ठेवलं तर तो भडकवून टाकील त्यांना. त्यामुळे त्यांनी मला वेगळ्या खोलीत ठेवायचं ठरवलं; पण येरवडा ही 'बरॅक जेल' आहे; तिथे वेगळ्या कोठीची सोय नाही. त्या जेलमध्ये एकाच ठिकाणी चारेक वेगळ्या खोल्या आहेत; दुसऱ्या दिवशी ज्यांना फाशी द्यायचं असतं त्यांना या खोल्यांत ठेवतात. मला ठाऊक नव्हतं. पोलिसांनी मला त्यातल्याच एका खोलीत ठेवलं होतं. मी आपला झोपून गेलो. दिवसभरच्या आंदोलनामुळे दमून गेलो होतो, झोप लागली. रात्री शेजारच्या खोलीतला सिंधी व्यापारी ओरडायला लागला. त्यामुळे झोपमोड झाली. शिपायांनी मला सांगितलं, की या खोल्या अशासाठी आहेत आणि त्या सिंधी व्यापाऱ्याला त्याच्या उद्याची भीती वाटायला लागली म्हणून तो ओरडायला लागला. संगमरवरी महाल ते फाशीची कोठी, किती मोठा बदल केला, किती त्याग केला हे लोकांना सांगणं सोपं असतं; पण प्रसंग आला म्हणजे काय बेततं, कशा टोचण्या लागतात ते प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीज कळणार नाही. त्या वातावरणामुळे झालेल्या

मन:स्थितीतून सावरण्यासाठी माझ्या मदतीला अंदमानच्या तुरुंगातले सावरकर आले. सकाळ होईपर्यंत सावरकरांच्या -


की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने
जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले करी हे सतीचे

आणि

आले शिरावरी जरी घनघोर झाले
दारिद्र्य दु:ख अपमानही प्राप्त झाले
कारागृही जरी सतत वास करी मी
पूजिन मी सतत मन्मयमातृभूमि

 या दोन काव्यांनी मला फाशीच्या कोठीमध्ये वास्तवतेला सामोरं जाण्याचं धैर्य दिलं.


 'साहित्यामध्ये जगणं' आणि 'साहित्यामध्ये व्यक्त करणं' या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. साहित्यिक मंडळींनी रागावू नये; पण मला काही वेळा संशय येतो, की ज्यांची संवेदन क्षमता तीव्र असते त्यांना साहित्य तयार करता येत नसावं. थोडंसं आडूनआडून ज्याला दु:ख सोसता येतं, पाहता येतं तो त्याचं सुंदर काव्यामध्ये रूपांतर करू शकतो. कवी जळतो असं म्हणतात; पण ज्यांच्या मनामध्ये दु:ख सोसण्यासाठी संरक्षणाचं कवच नसतं अशी भस्म होणारी माणसंच काव्य बाजूला ठेवून काही काव्य जगायचा प्रयत्न करतात की काय असा मला संशय येतो.

 या संमेलनाच्या निवेदकांनी आता म्हटलं, की हे तिसरं संमेलन झालं, पुढे चौथं व्हायचं आहे. ऐकून मला आनंद झाला. कारण पुढच्या वर्षापर्यंत तरी मराठी भाषा टिकणार आहे अशी आशा निर्माण झाली. या संमेलनाचे अध्यक्ष श्री. द.पं. जोशी यांच्या भाषणाचा वृत्तांत वर्तमानपत्रात वाचला. त्यांची चिंता, की 'चौथं, पाचवं, सहावं' अशी संमेलनं होतच राहतील. अर्थात साहित्य संमेलनं भरवायला साहित्य शिल्लक राहिलंच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. संमेलनं भरवायला काय हरकत आहे?' पण, काही मुद्द्यांवर माझा काही वेगळा विचार आहे. तो मी आपल्यापुढे नम्रपणे मांडू इच्छितो.

 मी काही केवळ शेतकरी नेता नाही. किंबहुना, मी खरा शेतकरी नाहीच. मी नेहमीच सांगत असतो, की मी जोशी आडनावाचा म्हणजे माझा जन्म ब्राह्मण घरचा आहे; पण

शेतकरी मायबहिणींनी आतापर्यंत मला जितकं प्रेम दिलं, तितकं ते कुणालाही दिलेलं नाही. मी जरी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतीचा प्रश्न मांडत आलो असलो, तरी शेतीचा प्रश्न मी एका दरवाजाची किल्ली म्हणून वापरला आहे; शेतीमालाच्या भावाचं तत्त्वज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र करण्याची गुरुकिल्ली म्हणून वापरलं आहे. मी मुळात स्वातंत्र्याचा भोक्ता आहे. गरिबीचं नाव घ्यायचं, गरिबी हटवायची म्हणायचं आणि गरिबी निर्मूलनाचे वेगवेगळे कार्यक्रम काढून आपलेच खिसे भरून घ्यायचे हे मला करता आलं नसतं असं नाही; पण मी एकोणीसशे ऐंशी सालापासून एक सिद्धांत मांडतो आहे. हा सिद्धांत माझा नाही, महात्मा गांधींचा आहे. गांधीजींनी म्हटलं होत, "गरिबांकरिता आम्ही हे करू. ते करू असं सगळेच जण म्हणतात. फक्त गरिबांच्या छातीवरून उठायला कुणी तयार होत नाही." गरिबांना दुसऱ्या कोणत्याही मदतीची गरज नाही; आय.आर.डी.पी. नको की कोणती रोजगार हमी योजना नको. सरकार हाच गरिबीचा कारखाना आहे. जर एखाद्या भूकंपात दिल्ली आणि मुंबईची सरकारं खलास झाली असती तर देश आबादीआबाद आणि सुखसंपन्न झाला असता, या विचारांचा मी पुरस्कर्ता आहे. इतका व्यापक विचार मांडत असताना मला 'मराठी भाषा जगेल किंवा नाही' या प्रश्नावर काही बोलायचा मोह होतो आहे. तो मी टाळीत नाही. सगळेच तुम्ही साहित्यिक साहित्याच्या बाबतीत माझ्या दृष्टीने वडीलधारे आहात. भाषेसंबंधी माझे विचार मांडताना जर काही चुकलं तर तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे.

 शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घ्यायच्या आधी मी फ्रान्समध्ये होतो. पहिल्यांदा जेव्हा मी फ्रान्समध्ये गेलो तेव्हा एका ठिकाणी, तहान लागली होती म्हणून, इंग्रजीतून पाणी मागितलं. पाणी मागणं आणि तेदेखील इंग्रजीमध्ये हा त्यांच्या दृष्टीने दुहेरी गुन्हा झाला. पहिली गोष्ट फ्रेंच माणसं पाणी पीत नाहीत आणि दुसरी ते फ्रेंचच बोलत. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे चक्क दुर्लक्ष केलं; पण नंतर, मी स्वित्झर्लंडमधून परत येईपर्यंत त्यांच्यात मोठा बदल घडून आला होता. फ्रान्समधील सगळी सुशिक्षित माणसं बऱ्यापैकी इंग्रजी बोलायला शिकली होती; पण इंग्रज माणसं फ्रेंच बोलताना ती मातृभाषा नाही असं दाखविण्याचा प्रयत्न करतात तसंच फ्रेंच माणसं करीत. मराठीत 'च'चे दोन उच्चार आहेत, एक कठोर आणि एक मृदु; पण फ्रेंच भाषेत सर्वच उच्चार मृदु तर इंग्रजीत फक्त कठोर आहेत; पण फ्रेंच माणसं इंग्रजी बोलताना मुद्दाम मृदु उच्चारच करायचे. कसं का होईना, फ्रेंच माणसं स्वभाषाभिमान सोडून इंग्रजी बोलायला लागले म्हटल्यावर मी विचारलं, "तुम्ही तुमच्या भाषेचे इतके अभिमानी होता, मग आता इंग्रजी कसं काय बोलायला

लागलात?" तेव्हा ते म्हणाले, "आम्ही जे बोलतो ते इंग्लिश नाही, ती अमेरिकी भाषा आहे! आम्ही ही परकी भाषा शिकलो याचे कारण काय? अमेरिकेत आर्थिक वैभव आहे, सुखसंपन्नता आहे, साधनांची विपुलता आहे. त्यामुळे अमेरिकी भाषा खऱ्या अर्थान संपन्न झाली आहे आणि ज्याला जगाच्या सरहद्दीवर. इतिहासाच्या सरहद्दीवर. संशोधनाच्या सरहद्दीवर जायचं आहे त्यांना अमेरिकी शिकण्याखेरीज गत्यंतर नाही."

 साहित्य समृद्ध करायचं तर काय करायला हवं? तुमच्या संमेलनाच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात म्हटलं, "आजची जी काही शिक्षणपद्धती आहे. त्यांतील दोन भाषांचा, तीन भाषांचा ‘फॉर्म्युला' आणि ज्या पद्धतीने भाषा शिकविली जाते हे सर्व पाहता मराठी भाषा लवकर मरेल असं दिसतं." त्याचं कारण एका वाक्यात सांगायचं झालं तर, गरीब लोकांची भाषा श्रीमंत असू शकत नाही. हा विचार तुम्हा साहित्यिकांना पटणार नाही, तरीही मी सांगतो. आज तुम्ही ज्या काळातल्या साहित्याची वाखाणणी करीत आहात, त्या काळातील मंडळींच्या जीवनाकडे पाहा. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वर घ्या. त्यांचा जन्म, मातापित्यांची आत्महत्या, समाजाने घातलेला बहिष्कार या सर्वांमुळे ज्ञानेश्वर सर्व आयुष्य जळत जळत जगले, समाजाने दिलेले सर्व हलाहल त्यांनी पचवले म्हणून त्यांच्या तोंडून अमृतमयी ओवी निघाली. सकाळी कॉलेजमध्ये जाऊन दोनतीन 'लेक्चर'च्या पाट्या टाकून, घरी आलेल्या माणसाच्या हातून, बालपणीच्या संस्कारातून लाभलेली जी काही साहित्याची आणि प्रतिभेची शिदोरी असेल ती संपेपर्यंत साहित्यनिर्मिती होईल; पण त्यानंतर पारितोषिकाच्या लिखाणापलीकडे काही होणार नाही.

 मला संपन्नता म्हणजे काय म्हणायचं आहे ते थोडं स्पष्ट करतो. मला गरिबीचं कौतुक केलेलं आवडत नाही. प्रदेश गरीब असला तरी त्याचं साहित्य मोठं असतं ही गोष्ट खोटी आहे. संख्याशास्त्रीयदृष्ट्या, गरिबीतही एखादा कुणी प्रकांड प्रज्ञेचा मनुष्य निघू शकतो, नाही असं नाही. म्हणजे, तो गरीब असूनही In spite of poverty तसा असतो. पण संख्येनं पाहिले, साहित्याची एकूण निर्मिती पाहिली तर तो अपवाद ठरतो. साहित्य किंवा प्रतिभा कशातून जन्मते? वरून कुठूनतरी एकदम प्रतिभा शिरते, अंगात सरस्वतीचा संचार होतो आणि मग 'जे न देखे रवि, ते देखे कवी' असं म्हणून साहित्य तयार होतं अशी जर कुणाची कल्पना असेल तर मग जन्मांधसुद्धा निसर्गकविता लिहू शकेल! खरं तर तुमच्या शब्दांचा, प्रतिभेचा फुलोरा हा तुमच्या अनुभवाच्या संपन्न भूमीतून वाढत असतो. मग, ज्याचं आयुष्य दरिद्री, पैशानं नव्हे, तर अनुभवानं; ज्याचं आयुष्य अनुभवाच्या विविधतेनं नटलंलं नाही अशा माणसाचं साहित्य हे फक्त मुंबईच्या लोकल

गाडीतील प्रवासातच वाचायच्या लायकीचं होतं आणि आज वस्तुस्थिती अशी आहकी मराठीतील 'मान्यवर' लेखकांचं साहित्य हे लोकल गाडीत जर का खारे दाणे विकत घ्यायला पैसे नसतील तर शेजाऱ्याकडून घेऊन वाचण्यालायक साहित्य झालं आहे.

 माझे एक गुरु डॉ. सुमत मुरंजन. त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेव्यवस्थेमध्ये काम केलं आहे. कोरियाचं युद्ध झाल्यानंतर अमेरिकेनं त्यांना 'अमेरिकेतील चलनवाढ कशी थांबवावी' यावर चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. अशा या आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या माणसाने 'आंतरराष्ट्रीय नाणेव्यवस्था' हे पुस्तक मराठीत लिहिलं. लोकांनी त्यांच्यावर फार टीका केली. लोकांनी म्हटलं, 'हे पुस्तक इंग्रजीत लिहायला हवं होतं. मराठीत लिहून काय उपयोग?' ही १९५५ ची गोष्ट आहे. टीकाकारांना डॉ. सुमंत मुरंजनांनी उत्तर दिलं, "माझ्या अनुभवांच्या आधारे ज्यांना आंतरराष्ट्रीय नाणेव्यवस्थेचा अभ्यास करायचा असेल त्याने मराठी भाषा शिकावी अशी माझी इच्छा आहे." इतकी हिंमत दाखविण्यासाठी. तुमचा अनुभव समृद्ध आहे का? कॉलेजच्या या मुलीनं कॉलेजच्या त्या मुलाकडं पाहिल्यानंतर त्या दोघांचे डोळे एकमेकांच्यात मिसळल्यानंतर जी काही किलबिल किलबिल होते त्याची काव्यं किती वेळ लिहिणार? या किलबिलीशिवाय तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने लिहायला नको का? का शंभर वर्षांपूर्वी तुमच्या आजीआजोबांच्या मनांत ज्या किलबिली होत होत्या, त्याच किलबिली अजून चालू आहेत? काही नवीन आणाल तर साहित्य होईल. तीच ती शिळी कढी किती वेळ तुम्ही पुन्हा पुन्हा उकळणार आहात?

 सगळ्या देशातली गरिबी ही कच्च्या मालाचं जाणीवपूर्वक शोषण केल्यामुळे तयार झाली आहे हा माझा अनुभवावर आधारित सिद्धांत आहे आणि तो सत्य आहे यात काही वाद नाही. हा सिद्धांत, त्याचा अभ्यास, त्याची आकडेवारी महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनाने तयार केली आहे आणि हे सर्व मी मराठीत लिहून ठेवले आहे. माझ्याकडे, अगदी हार्वर्डपासून अनेक विद्यापीठांतले, शेतकरी संघटनेच्या अर्थशास्त्रावरील पीएच.डी.चे अनेक प्रबंध आहेत. ते लिहिणाऱ्यांतले निम्मे तरी लोक परदेशांतले आहेत. ते मला: म्हणतात, “तुम्ही हे सर्व लिखाण कधीतरी इंग्रजीतून करायला पाहिजे.” त्यांना माझंही उत्तर माझ्या गुरूंनी दिलेलं, “शेती अर्थव्यवस्थेचा अभ्यास ज्याला माझ्या मांडणीच्या अंगाने करायचा आहे, त्यांनी मराठी शिकलं पाहिजे."

 साहित्यवेलीला लागलेली कीड जर मारायची असेल तर आधी त्या वेलीवर वेगळी वेगळी पानं येतील असं काही तरी करा. त्यासाठी, काही वेगळे अनुभव येतील असं काही तरी करा. हे काही मी साहित्यिकांवर नुसती टीका करण्यासाठी बोलत नाही;

ज्या काही दोन गोष्टी मांडतो आहे त्याचा तुम्ही गंभीरपणे विचार करावा यासाठी मी बोलतो आहे.

 मला राजकारणावर बोलायचं नाही; पण देशातील परिस्थिती इतकी गंभीर वाटते की ती सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविण्यासाठी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातील शाहिरांसारखे शाहीर असायला हवेत असे वाटते. आज जर का ते शाहीर जिवंत असते तर मुंबईचं कोणतंच सरकार टिकलं नसतं, पण आजचे आमचे सगळे शाहीर सरकारी मान्यताप्राप्त शाहीर! संमेलनांतून मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हातून फेटे, पारितोषके आणि बिदाग्या स्वीकारत कवनं अशा तऱ्हेची करतात, की त्यात शाहिरीचा जिवंतपणा राहत नाही. मग ते काव्य 'ब्राह्मणी' होतं. अगदी तुम्ही आता वानगीदाखल जी काव्यं म्हणून दाखवलीत त्यांबद्दलही माझं हेच मत आहे. तुमच्या या काव्याला मान्यता मिळाली त्याचं प्रमुख कारण त्यांच्यातील प्रतिमा धूसर झाल्या हे आहे; शेतकऱ्याच्या दुःखाच्या प्रतिमा दाहक राहिल्या नाहीत. मी ज्वारी पिकवतो; पण माझ्या ज्वारीच्या कणसाला चांदणं लगडलेलं दिसलं आणि मला फार हर्ष झाला असं कधी घडलं नाही. ही ज्वारी निघाल्यानंतर त्याचं पुढं काय होतं हे साहित्यात कधी येतच नाही.

 मला एक सहज प्रश्न पडतो. अर्थशास्त्री मूर्ख असतील. गेली पन्नास वर्षे, शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक लूट होते हे त्यांना कळलं नाही, हे समजण्यासारखं आहे, कारण ते इंग्रजी पुस्तकं वाचतात आणि त्यावरूनच लिहितात; त्या पुस्तकांत लिहिलं नव्हतं म्हणून त्यांना कळलं नसावं. पण तुम्ही ग्रामीण साहित्यिक म्हणवणारे, मी शेतमजुराच्या घरी जन्मलो आहे म्हणून मला ग्रामीण साहित्यिकाचा वेगळा तंबू टाकण्याचा अधिकार आहे असं मोठ्या आग्रहानं सांगणारे, शेवटी शेतकऱ्यांच्या दुःखांचा बाजार मांडून नागरी साहित्यिकांच्या पेठेत आपलंही दुकान असावं म्हणूनच प्रयत्न करता की नाही? जर तुम्हाला शेतकऱ्याच्या दु:खाची खरी जाण झाली होती तर तुम्ही गावांमधील झोपडं आणि गावामधील विटांचं घर यांच्यामधील भांडण का भांडलात? त्याचं कारण, तुमची ग्रामीण भागाची प्रतिमा खोटी होती, तुमचं शेतीअर्थव्यवस्थेचं ज्ञान हे डाव्यांच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकातून आलं होतं. तुम्ही असं का नाही म्हटलं, की तुम्ही कितीही ज्वारी पिकवा, कितीही पीक येऊ द्या; कणसाला चांदणं लगडण्याचं सोडा, कर्जाचा बोजा थोडा कमी झाल्याच्या आनंदाची रेघसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर उमटणार नाही? कितीही पीक आलं तरी शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज, आजच्या व्यवस्थेत, फिटण्याची कुठलीही शक्यता नाही असं एकाही कवीला का वाटलं नाही? हे सत्य जर तुम्ही ग्रामीण

साहित्यिक मांडू शकला नाहीत तर तुमची अनुभूती किती खरी याबद्दल मला शंका आहे. तुमची अनुभूती जर इंग्रजी भाषेचं बोट धरून आलेली अनुभूती असेल तर तुमची मराठी भाषा का जगावी?

 तुमची, तुमच्या भागातली आयुष्यं अनुभवसंपन्न होण्याकरिता काही अमेरिका तयार करावी लागत नाही. जे काही आयुष्य आहे त्या आयुष्यातले विविधतेचे अनुभव तुम्ही किती घेता हे खरे महत्त्वाचे आहे. इथे आम्ही कमी पडतो म्हणून साहित्याला हे 'ब्राह्मणी' स्वरूप येतं आहे. ज्ञानेश्वरांनी 'फाटलेल्या कांबळी'च्या जागी आता 'नवी कांबळ' मागावी हे ठीक आहे; पण तीच मागणी जर का १९९५ सालचा कवी करू लागला तर त्याचा अर्थ आपलं नपुंसकत्व, आपला भ्याडपणा, आपला भीरूपणा तो देवाच्या मागे लपवायचा प्रयत्न करतो आहे. जे जे सत्य आहे ते कवीनं सांगायला काय हरकत आहे? का सांगितलं गेलं नाही? कारण आम्ही आमची अनुभूतीची सगळी क्षेत्रं लहान करीत चाललो आहोत.

 महाराष्ट्रातले साहित्यिक कोण? टीकाकार हे सगळे ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण, त्यात तीन चतुर्थांश कुलकर्णी आडनावाचे! लेखन कोण करतं? कविता कोण करतं? जे कॉलेजमध्ये मराठी विषय शिकवतात ते मराठी लिखाण करतात; अपवादानेच, इतर विषय शिकविणारेही मराठी लिखाण करतात. म्हणजे साधारणत: कॉलेजातील माणसं लिखाण करतात. आता, कॉलेजचं विश्व ते काय? मग त्यांनी लिहिलेलं, 'तिनं त्याच्याकडे पाहिलं, त्यानं तिच्याकडं पाहिलं; बापानं थोडा विरोध केला, शेवटी जमलं." असं तेच तेच लिखाण पुन्हा पुन्हा वाचावं लागलं तर तुमचं साहित्य जिवंत आहे असं म्हणताच कशाला? ते मेलंच आहे.

 सॉमरसेट मॉम हा माझा फार आवडता लेखक आहे आणि मला असं वाटतं, की . कुणीही लिहू इच्छिणाऱ्याने मॉमच्या निदान चार लघुकथा Short stories वाचल्याखेरीज लिहूच नये. या माणसाने आयुष्यभर फक्त प्रवास केला. पॅसिफिकमधील एकेक बेट तो हिंडला. त्यातून घेतलेल्या विलक्षण अनुभवाला त्यानं साहित्यात आणलं. त्याचं साहित्य वाचलं, की प्रत्येक वेळी मला वाटतं, की आता अनुभवाच्या दृष्टीनं आपण सॉमरसेट मॉमइतकंच प्रगल्भ झालो आहो. आता त्या साहित्यात आपल्याला धक्का देण्याची ताकद राहिली नाही; पण ती पुस्तकं पुन्हा वाचायला लागलो, की आधीच्या अनुभवापेक्षा वेगळाच अनुभव येऊन अचंबित होतो. मग लक्षात येतं, की त्याच्या मानानं अजून आम्ही लहान बालकं आहोत किंवा अपंग आहोत.

  मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल.मोठी व्हायची असेल तर, शिक्षणाची व्यवस्था

बदलली पाहिजे, त्याची मांडणी वेगळी झाली पाहिजे हे खरंच आहे; पण त्याचबरोबर व्याकरणाकडेही लक्ष दिलं पाहिजे. नवीन व्याकरणात माझा गोंधळ होतो. अर्थामध्ये फरक करणारे अनुस्वार निघून गेल्यामुळे ते नसताना वाक्याचा नेमका अर्थ कसा लावायचा याबद्दल माझा गोंधळ होतो. भाषा सोपी लिहिणं ही काही भाषा जगवण्याची पद्धत नाही. भाषा कधी जगते? पहिली गोष्ट, भाषेतील काही शब्द हरघडी मरत असतात. आजवर किती शब्द मेले! श्री.म. माटेंचं साहित्य वाचताना मला नेहमी जाणवतं, की जे शब्द माटे सहज वापरत असत ते आता मराठीचे राहिले नाहीत. मध्ये एकाला कुसुमाग्रजांची 'गर्जा जयजयकार' वाचून दाखवीत होतो, तर तो मनुष्य म्हणाला, "यातील मराठी शब्द कुठे गेले हो?" मी म्हटलं, "मेले". कोणत्याही भाषेतील शब्द असे मरतच असतात. मराठीतील शब्द असेच मरत राहिले; पण त्यांच्या जागी नवीन शब्द आलेच नाहीत. मराठी भाषा जर टिकायची असेल तर तिच्यातील जितके शब्द निघून जातात, त्यांच्यापेक्षा जास्त शब्द दररोज जन्माला आले पाहिजेत; कारण काही शब्दांचं मरण हे अपरिहार्य आहे.

 पण, कुठून हो यावे तुमच्या माझ्या मराठीत शब्द? आम्ही सगळंच आडगिऱ्हाइकी जगतो. आमची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, आमचं विज्ञान, आमचे विषय हे सगळं आडगिऱ्हाइकी. असा आडगिऱ्हाइकी धंदा करून आम्ही पोट जाळण्याचं काम करतो; मग आमच्या अनुभवामध्ये विविधता यावी कुठून आणि वेगवेगळे नवीन शब्द यावे कुठून? शब्दांची भर नाही आणि त्यापलीकडे, जी काही साहित्य निर्मिती होते ती अनुभूतीची नाही. मग, मराठी भाषा कशी काय जगायची?

 माझ्या पुस्तकांपैकी बहुतेक पुस्तकं मी मराठीत लिहिलीत हे वर सांगितलंच आहे. माझ्यावर, विशेषत: तत्त्वज्ञानावरच्या माझ्या पुस्तकासंदर्भात आक्षेप घेतला जातो. त्यातल्या त्यात 'स्वातंत्र्याच्या कक्षा' (Degrees of Freedom) ही जी कल्पना मांडली आहे, त्यासंबंधात मोठमोठ्या लोकांनी तक्रार केली आहे. त्यांचं म्हणणं, "स्वातंत्र्याच्या कक्षा ही संकल्पना इतकी क्रांतिकारी आहे, की ती तुम्ही लिहिलीत का याबद्दल पुढे इतिहासात वाद होणार आहेत. तेव्हा लवकरात लवकर ती तुम्ही इंग्रजीत लिहून ठेवा, तरच तुम्हाला त्याच्यावरचा बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Right) मिळेल. नाही तर तो जाईल." अजून मी मोह टाळला आहे; परंतु जसजशी आयुष्याची संध्याकाळ जवळ येत आहे तसतसं मला वाटू लागलं आहे, "स्वातंत्र्याच्या कक्षा ही संकल्पना इंग्रजीत पुढे मांडावी का मराठीचा अभिमान बाळगावा?" या दोन विचारांमध्ये जर का द्वंद्व सुरू झालं तर मला अशी भीती वाटते, की मराठी भाषेची घसरण पाहून मी मोहानं ते

पुस्तक इंग्रजीत लिहीन; मग काय करावं? शाहीर सगळे सरकारच्या नादी लागले आणि संपले. तुळशीदास जाधवानं आदिलशाहाच्या दरबारात जाऊन डफावर थाप मारावी असं हे झालं. आज, शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेले म्हणवणारे शाहीर, ज्यांच्या हाती शेतकऱ्यांच्याच माना कापायच्या सुऱ्या आहेत, त्यांच्या आश्रयाने आपल्या संध्याकाळी मोठ्या आनंदात घालवीत आहेत आणि मग हे साहित्य क्रांतिकारी होऊ शकत नाही.

 मग काय करावं? माझ्यासारखी सामान्य माणसं, जी साहित्यिक नाहीत ती काय विचार करतात? मागे पुण्याला आम्ही एक चर्चासत्र घेतलं होतं- शेतीवरील सबसिडीला मनमोहन सिंगांसह सर्व अर्थशास्त्रज्ञांची मान्यता घेण्यासाठी. त्यामध्ये दिल्लीच्या एक विदुषी आल्या होत्या. त्यांनी भाषणात वेगळीच भाषा वापरली. मी त्या भाषेला झिंदी (Zindi) असा शब्द वापरतो. 'झिंदी' म्हणजे झी टीव्हीवरून ऐकवली जाणारी हिंदी.मी मराठी बोलतांना एखाददुसरा अपवाद सोडल्यास किंवा जाणीवपूर्वक वापरायचा ठरविल्याशिवाय एकही इंग्रजी शब्द वापरीत नाही. इतरही भाषा वापरताना मी हेच करतो. इंग्रजी बोलताना फ्रेंच वापरत नाही आणि फ्रेंच बोलताना इंग्रजी वापरत नाही. कारण एक भाषा वापरत असताना तीत दुसऱ्या भाषेचा शब्द येऊ देणं हा मी माझ्या अभ्यासाचा अपमान आहे असं समजतो.

 पण जर असा प्रश्न निर्माण झाला, की मला विचार मांडायचा आहे; पण माझ्या भाषेत मांडता येत नाही कारण माझ्या भाषेतले शब्द तोकडे पडतातं; तर मग काय करावं? शब्दांशी तडजोड करावी का अर्थाशी? मराठी भाषा जगणं महत्त्वाचं मानावं का सत्याचा शोध ही गोष्ट महत्त्वाची मानावी? मी काही अशातला नाही, की जे परदेशात जातात, तीनचार महिने राहतात आणि मुंबईला उतरताच निम्मे शब्द इंग्रजी बोलतात. आणि म्हणतात, "आमची हॅबिटच गेली हो मराठी-स्पिकिंगची!" वर्षानुवर्षे परदेशात राहून, परकीय भाषांमध्ये संपूर्ण काम करून मी शेतकऱ्यांसाठी उभा राहिलोय. कुणी मला साहित्यिक म्हणो न म्हणो, पण महाराष्ट्रातल्या आणि हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांना पदव्युत्तर पातळीवरचं अर्थशास्त्र मी 'ग्यानबा'च्या भाषेत नीट समजावून सांगितलं आहे. मराठीचं वैभव तुम्हाला पाहायचं असेल तर ते कुठं पाणचट कथांत शोधायला जाऊ नका. मराठी भाषेची ताकद काय आहे, अत्यंत क्लिष्ट विचारसुद्धा किती चांगल्या तऱ्हेनं मांडता येतो ते पाहायचं असेल तर महिलांच्या प्रश्नावर मी लिहिलेलं 'चांदवडची शिदोरी' हे पुस्तक वाचा. इंग्रजीमध्येसुद्धा महिलांच्या प्रश्नांवर लिहिलेलंया तोडीचं इतकं आटोपशीर आणि व्यवस्थित मांडणी करणारं पुस्तक सापडणार नाही!

 माझ्यासारख्या माणसाला चिंता पडली आहे, की साहित्यसृष्टीचे ईश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर असे तुम्ही साहित्यिक, तेच ते शब्द पुन्हा पुन्हा घोळत आहात; नवीन शब्द येत नाहीत; नवीन अनुभूती नाही. कारण आमचं सगळ्यांचं आयुष्य दरिद्री झालं आहे. अमेरिकत एखादं पुस्तक प्रकाशित करायचं ठरलं तर प्रकाशक पहिली आवृत्ती म्हणून किमान दहा लाखाची काढावी असं म्हणतो. मराठीमध्ये एखादं पुस्तक प्रकाशित करायचं म्हटलं तर प्रकाशक म्हणतो, "तीन हजाराची आवृत्ती काढायचं म्हणजे जरा धाडसाचंच होईल; दीड हजारातच जमलं तर बघा!" म्हणजे, मराठीत पुस्तक लिहिलं तर ते जास्तीत जास्त दीड हजार लोकांपर्यंत जाईल अशी अपेक्षा ठेवायची. छापल्या छापल्या त्यातली सहाशेच पुस्तकं खपतील, नऊशे कदाचित कपाटातच पडून राहतील. गेलेल्या सहाशेतील शंभरएक पारितोषिकं देणाऱ्या संस्थांना देणगीदाखल गेलेली असतील. अशानं मी जे लिहिलं असेल त्याचं काय व्हायचं? आणि मराठी भाषेचं काय व्हायचं?

 मुळात, गरिबीचा प्रश्न सुटला पाहिजे. जर का गरिबीचा प्रश्न सुटला नाही, आयुष्यं संपन्न झाली नाहीत तर काय होणार आहे? गरिबी असताना आम्ही गरिबीचं विदारक दृश्य दाखविण्याच्या कामात अपयशी झालो आहोत. संपन्नतेचा अनुभव नसल्यामुळे आमचे 'डोळे'च थिटे पडले आहेत. असे असताना तुम्ही कितीही प्रयत्न केलेत, कितीही अभ्यासक्रम बदललेत, कितीही पारितोषिके दिली आणि कितीही 'ग्रंथाली'सारख्या चळवळी चालवल्या तरी त्यांचा काय उपयोग? तुमची पुस्तकं खपायची असतील तर त्यांचा केवळ प्रचार करून भागत नाही. मीतर गरीब माणूस आहे. तरीही प्रयत्नपूर्वक मी साधारणपणे वर्षाला पाचदहा हजार रुपये पुस्तकांकरिता आणि मासिकांकरिता खर्च करतो. तुम्ही ग्रामीण साहित्य लिहिलं, 'ग्रंथाली'सारखी चळवळ चालवली; पण ज्या शेतकऱ्याला समोर ठेवून तुम्ही लिहीत आहात त्याचा कापूस खरेदी केंद्रावर विकला जात नाही, विकला गेला तर चेक मिळत नाही, चेक मिळाला तर तो वटून पैसे मिळत नाहीत अशी जर स्थिती असेल तर तुमचे ग्रामीण साहित्य वाचायचे कुणी? यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे.

 आजकाल मान्यवर साहित्यिक होणं सोपी गोष्ट आहे. राजदरबारी दाखल झालं, की पुरतं. त्यांची मग वेगळी जीवनशैली असते. संध्याकाळच्या मैफली होतात, त्यांमध्ये काही वेगळ्या प्रकारचा 'कैफ' चढू शकतो आणि तो 'कैफ' हाच मुळी 'प्रतिभेचा कैफ' आहे अशीही समजूत होऊ शकते.

 या पलीकडे जाऊन आपल्या साहित्याशी इमान राखणारे साहित्यिक मराठीत आहेत

का? हे मोठं प्रश्नचिन्ह मी तुमच्यामसोर ठेवतो आहे. तुम्ही म्हणाल, 'आम्ही लेखक, प्राध्यापक; आमचं काम आम्ही सोडणार नाही. आम्ही काही आंदोलनं, समाजकारण करणार नाही.' मीही असं म्हणणार नाही, की तुम्ही आंदोलनात यावं; प्रत्येक लेखकानं एकदा तरी तुरुंगाचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं; तरीसुद्धा नसलं जायचं तर तुम्ही तुरुंगात जाच असंही मी म्हणणार नाही; पण निदान तुमच्या लेखणीमधून सत्य विचारमंथन बाहेर पडावं का नाही?  अनिल बर्वे हा माझा फार चांगला मित्र. त्यानं काही काळ शेतकरी संघटनेचा बिल्ला लावला होता. त्यानं एक आत्मचरित्रात्मक कहाणी लिहिली आहे. मी त्याला म्हटलं, "तुझं हे साहित्य खरं वाटत नाही. तू ऑर्थर रोड जेलमध्ये असतानातू 'थॅंक यू मिस्टर ग्लॅड'मध्ये लिहिलं आहे तसे बुटांनी मारत होते काय?" तर तो म्हणाला, "नाही बाबा! उलट दररोज तिथं मला कोंबडी मिळत होती." अनुभूती आणि लिखाणामुळे अनिल बर्वे हा त्यातल्या त्यात प्रामाणिक साहित्यिक बनला. त्याचं म्हणणं समाजकारण, आंदोलनं करताना लागत नसेल; पण असं साहित्य, प्रतिभा दाखवायची म्हणजे 'कैफ' आणणारं काहीतरी लागतंच. हल्ली मराठी कवीच्या मोठेपणाचं मोजमाप या 'कैफा'वरच केलं जातं. मी म्हटलं, कदाचित आपल्याला या क्षेत्रात अनुभव नाही, त्याबद्दल अधिकारवाणीनं कशाला बोलावं? तरीही त्याला मी म्हटलंच, "प्रतिभेकरिता किंवा काव्य स्फुरण्याकरिता घ्यावी लागत असेल; पण तू जे लिहितोस त्याकरिता काही घ्यावं लागेल असं मला वाटत नाही."

 मग अशा स्थितीत 'मराठी असे आमुचि मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे,' असं म्हणून तिच्या भवितव्याविषयी तुम्हाला खरंच तळमळ असेल, ती जगवण्याच्या निमित्ताने एक वेगळी संस्था स्थापन करून, सरकारकडून वेगळे निधी उपलब्ध करून घ्यावे अशी योजना नसेल तर माझ्या मते, तुम्ही दोनच गोष्टी कराव्या. एक, तुमचं अनुभवाचं विश्व व्यापक होईल याचा प्रयत्न करावा आणि दुसरी, ग्राहकाला तुमचं पुस्तक किमान वाचण्याकरिता तरी हातात घेणं परवडेल हे पाहावं. या दोन गोष्टी न करता, आपल्या खोलीमध्ये बसून कागद चितारणे म्हणजे साहित्यनिर्मिती असं जर तुम्ही समजलात तर मला वाटतं, तुम्ही मराठी भाषेचा द्रोह कराल.

 शेवटी दोन अनुभव सांगातो. महाराष्ट्रातल्या कविश्रेष्ठांनी शेतकऱ्यांवर कविता लिहिल्या, चांगल्या तळमळीने लिहिल्या. त्यांनी ते पुस्तक माझ्याकडे प्रस्तावना लिहिण्यासाठी पाठवलं. मी ते वाचलं आणि त्यांना विनंतीपत्र लिहिलं, "मला फारसं

नवकाव्य वगैरे समजत नाही; पण मला असं वाटतं, की माझं 'शेतकरी संघटना- विचार आणि कार्यपद्धती' हे जे अर्थशास्त्रावरचं पुस्तक आहे त्याचीच जर आपण एका ओळीत दोन शब्द, दुसऱ्या ओळीत पाच शब्द, तिसऱ्या ओळीत तीन शब्द अशी फेरमांडणी केली तर तेही मुक्तकाव्यच म्हणून चालून जाईल! मला असं वाटतं, की आपण जे लिहिलं ते एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, पुन्हापुन्हा लिहावं. टॉलस्टॉयनं 'वॉर आणि पीस' ऐंशी वेळा लिहिलं. मला जर कुणी म्हटलं, 'या आठ ओळी लिहायला मला पंधरा दिवस लागले.' तर मला फार आनंद वाटतो. कुणीतरी स्वत:च्या शिल्पावर मेहनत करतंय हे पाहून मला बरं वाटतं. नाही तर जे पहिलं लिहिलं जातं तेच सरळ छापखान्यात जातं अशी सर्वसाधारण रीत. अजून प्रतिभेचं महत्त्व संपलेलं नाही; पण प्रतिभेइतकंच महत्त्व परिश्रमालाही आहे आणि हे परिश्रम साहित्यामध्ये मोलाचे आहेत असं मला वाटतं. तेव्हा तुम्ही या कवितांचं पुनर्लेखन करा.' असं सांगून मी त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्यास नकार दिला. माझा नकार गेल्यावर त्यांनी दुसऱ्या कुणाकडून तरी प्रस्तावना घेतली आणि तसंच पुस्तक प्रकाशित केलं. आता या पुस्तकाला पारितोषिक मिळालं आहे एवढंच नव्हे तर ते कविश्रेष्ठ एका कविसंमेलनामध्ये अध्यक्षही होणार आहेत असं कळतं. त्यांचं भलं असो. मला काव्यातलं फारसं काही समजतंय असं नाही; पण सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने या कवितांबद्दल त्यांना आपलेपणा वाटावा असं काही असावं की नाही?

 दुसरं उदाहरण माझ्या मित्राचं. शेषराव मोहित्यांच्या 'असं जगणं तोलाचं' मध्ये काय आशय आहे? हा शेषराव आमचा कार्यकर्ता असताना त्याची एक कविता 'आमचा पंदरा आगस्ट कवा हाय?' माझ्या पाहण्यात आली. अगदी जिवंत काव्याचं उदाहरण आहे. त्याचबरोबर त्यानं एक कथा लिहिली- 'पाणभांडवल' म्हणून. एक शेतकरी मोठ्या कष्टानं विहीर खणायला घेतो. पाणी येईल, ऊस होईल म्हणून स्वप्न पाहतो. अपार कष्ट करतो, पाणी येतं, ऊस होतो याचं चित्र त्यांन तपशीलवारपणे रेखाटलं आहे. आणि गुऱ्हाळ लावून गूळ विकायला गेल्यानंतर काय स्थिती होते त्याचंही वर्णन विदारकतेनं केलं आहे. त्याचं ते लहानसं साहित्य माझ्या दृष्टीनं 'ओल्ड मॅन अँड द सी'च्या दर्जाचं होतं; बारकाईनं तपशील लिहिणारं.

 एकेक दिवस, बी पेरल्यानंतर हाती पीक येईपर्यंत किंवा न येईपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकऱ्याच्या मनाला ज्या सहस्र इंगळ्या डसतात त्याचं चित्र साहित्यात मला कुठंही दिसत नाही. साहित्यात नाही आणि सिनेमातही नाही. सिनेमात तर काय?

शेतकरी दाखवायचा म्हणजे एकदाच नांगर घालताना दाखवायचा. आणि लगेच सगळी पिकं लहलहरती. मग पुढे, दहा मुली इकडं तिकडं नाचत जाणार! शेतकऱ्याच्या आयुष्याचं चित्रण हे असं होऊन गेलंय. तुम्ही शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये बारकाईनं का पाहत नाही?  मी शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला नाही; व्यवसायानं मुळात मी शेतकरी नाही आणि तरीदेखील गावामध्ये मी गेलो, की शेतकरी मोठ्या संख्येनं जमतात. कारण मी काय बोलतो ते शेतकऱ्यांना समजतं. मी साहित्यात अडाणी असेन; पण ग्रामीण भागातल्या जनतेच्या, विशेषत: मायबहिणींच्या वेदना मला समजतात. कारण मी माझ्या अनुभवाचं विश्व व्यापक करण्याचा सतत प्रयत्न केला, करतो. मी तुम्हाला प्रेमानं आणि कळकळीनं सांगतो, मराठीतलं जे ग्रामीण म्हणून साहित्य आहे, ते खेड्यांशी संबंधित आहे असं मला खरंच वाटत नाही. तुम्ही संमेलनं घालाल, डेरे घालाल, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि आता आणखी काही साहित्य निघालीत, त्यांची संमेलनं घालाल, त्यांचे मंच उभे कराल, निधी जमवाल; पण तुम्हाला असं वाटत असेल, की यातून मराठी भाषा जगणार आहे तर तो तुमचा भ्रम आहे. याने मराठी भाषा जगणार नाही. मराठी भाषा मोठी करायची असेल तर मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. लहान माणसाची भाषा-मातृभाषा मोठी असूच शकत नाही एवढंच मला सांगायचं आहे.

 समारोपाच्या या भाषणात मी थोडा कुचेष्टेचा स्वर काढला असला तरी ते वेदनेनं बोललो आहे. मला दु:ख पाहवत नाही, हे मी आधीच सांगितले. मराठी भाषेवर माझं अपरंपार प्रेम आहे. काही मोजके लोक सोडले तर, एकाच अर्थाच्या किंवा एकाच वृत्ताच्या कविता म्हणण्याची स्पर्धा लावली तर मी इथल्या सगळ्यांना हरवीन. अशा सहअनुभूतीच्या माणसाच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत, वेदना आहेत त्याच मी इथे मांडल्या आहेत.


 (शेतकरी संघटक, २१ ऑक्टोबर १९९६: चौथे परभणी जिल्हा मराठी साहित्य संमेलन जवळा बाजार १९९५, येथील भाषण)

■ ■