अंगारमळा/महाविद्यालयातील विद्यार्थ्यास पत्र

विकिस्रोत कडून

महाविद्यालयातील विद्यार्थ्यास पत्र


'अंगारमळा', आंबेठाण,

ता. खेड, जि. पुणे.

१४ ऑगस्ट १९८५

प्रिय मित्र,

 हे पत्र तुला लिहितो आहे; पण खरे तर महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात जन्मलेल्या आणि यंदा महाविद्यालयात येऊन पोचलेल्या हजारो विद्यार्थी-मित्रांना उद्देशून लिहितो आहे.

 तसेच नवे वर्ष सुरू झाल्याबरोबर लगेचच तुझ्या हाती पडावे अशा बेताने हे पत्र लिहिण्याचा विचार होता. पण म्हटले थोडे थांबावे. सुरुवातीच्या काळात तुझी खूपच धांदल चाललेली असणार. इतक्या घाईगर्दीत माझे पत्र वाचायला तुला फुरसत कोठून मिळावी? आणि 'पुढे कधी तरी वाचू' म्हणून हे पत्र बाजूला ठेवलेस, की 'पुढे' कधी उगवण्याची खात्री काहीच नाही.

 पहिली गोष्ट, तुझी राहण्याची सोय व्यवस्थित झाली की नाही? कुणा नातेवाईकाकडे किंवा ओळखी-पाळखीच्या माणसाकडे उतरावयाची सोय झाली म्हणजे बरे असते. खर्च कमी होतो हे तर खरेच. पण कपडे अंथरुण-पांघरूण याबाबतसुद्धा काटकसर करता येते. पावसाळ्यात कपडे वाळायची अडचण होते म्हणून नाही तरी अगदी कपड्याच्या एका जोडातही भागवता येते. घरच्या जेवणात खानावळीतला ताट-वाट्यांचा चकचकाट नसतो; पण साध्या स्वच्छ घरच्या जेवणात प्रकृतीला अपाय तरी नाही. खानावळ परवडणे कठीणच. मग एस्टीने घरून डबा मागवता आला तर बरेच. प्रत्येक वेळी डबा उघडला म्हणजे घरच्या सर्वांची भेटच झाल्यासारखे वाटते. पण एस्टीचा भरवसा कमीच. कधी उशीर, कधी काय. सकाळचे रात्री खाण्याची घरी सवय नसले असे नाही. पण शहरातल्या खोलीत सूर्य मावळल्यावरती सकाळचेच समोर वाढून घेऊना जेवायले बसले, की डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही.

 वसतीगृहात रहायला मिळण्याइतकी ऐपत असलेले भाग्यवानच म्हणायचे. एखाद्या पुढाऱ्याची मुले सोडल्यास वसतिगृहात मुलांना ठेवण्याची शेतकरी आईबापांची परिस्थिती कधीच नसते. बिचारे इकडे तिकडे उधार-पाधार उसनवार करून आणि अक्षरश: आपले

पोट आवळून घेऊन पोरांना वसतिगृहात ठेवतात; पण त्यांच्या मुलांची वसतीगृहात कुचंबणा काही कमी होत नाही. पुढाऱ्यांच्या आणि शहरातल्या मुलांच्या सामानाचा झगमगाट पाहून डोळे दिपूनच जातात. थंडी वाजू नये म्हणून आईने बळेच दोन गोधड्या दिलेल्या असतात. घरी एक कमी पडत असूनसुद्धा. इतर पोरांच्या रंगीबेरंगी फुलांच्या नक्षी असलेल्या गाद्या, उशा, पलंगपोस, चादरी पाहिल्या म्हणजे आईची प्रेमाची गोधडीसुद्धा लपवून ठेवावीशी वाटते. श्रीमंत पोरांचे सगळेच वेगळे. नव्या कोऱ्या कपड्याच्या चळती, नवी पुस्तके, छत्र्या रेनकोट, काय न काय. पाहून हेवा तर वाटतोच; पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर आपल्या शिक्षणाच्या सोयीकरता यंदा स्वत:साठी नवे कपडे करणारच नाहीत याचासुद्धा विसर पडतो. या भाग्यशाली झुळझुळीत कपड्यात फिरणाऱ्या, दररोज नवीन घडीच्या रुमालावर सुगंध शिंपणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर रहावे, त्यांच्यासारखे वागावे-दिसावे, मित्र-मैत्रिणींच्या नजरेतील कौतुकांचा नजराणा गोळा करीत फिरावे असे वाटणे अगदी नैसर्गिक आहे. विडी-सिगारेट पिणे, प्रसंगी अपेयपान करणे, सिनेमा, नाटक, तमाशा हे सगळे वाईट असे हजारदा मनावर ठसवलेले असले, तरी नव्या मित्रांना या भानगडी करताना पाहून राग तर येत नाहीच; पण आजपर्यंत पूजिलेली सर्व मूल्ये आणि कल्पना भुरूभुरू उडून जातात आणि एकदा का होईना त्यांच्यासारखे करावे, मग त्यासाठी लागेल त्या मार्गाने पैसे उभे करावे, आवश्यक तर खऱ्या-खोट्या सबबी सांगून घरून आणखी पैसे मागवून घ्यावे असे वाटणे साहजिकच आहे.

 मोहनदास करमचंद गांधी विद्येसाठी इंग्लंडला गेले, तेव्हा त्या भावी महात्म्यालासुद्धा हे सर्व मोह झाले होते. जुनागडच्या दिवाणाच्या मुलाचा पाश्चिमात्य जीवनाशी परिचय नसेल, पण मायदेशी तो काही दारिद्रयात नव्हता. इंग्लंडमधील नवे जग जुनागढपेक्षा आकर्षक खरे; पण फरक अंशाचा. आज खेड्यातून शहरात शिकायला येणाऱ्या मुलांच्या आयुष्यात होणारा फरक अंशापळांचा नाही, गुणवत्तेचा असतो. बंगलेवाल्या पोराने कौतुकाने उचलून घरात नेलेल्या रस्त्यावरच्या कुलंगी कुत्र्याच्या पिलांची व्हावी अशी आपली गत शहरात आल्यावर होते. कुत्र्याच्या पिलाचे कोडकौतुक त्याचा छोटा मालक करतो, दूधपोळी खाऊ घालतो. गरम बिछाना करतो. आपली तशी सोय होत नाही. आपण इतरांचे चोचले नुसते बघायचे. कारण आपल्याला कोणी उचलून नेलेले असते. आपली स्थिती बंगल्यात घुसलेल्या कुत्र्याच्या पिलासारखी. मोहनदास करमचंद गांधींच्या काळी भारत-इंग्लंड यामध्ये जेवढा फरक होता त्याच्या कितीतरी पट जास्त तफावत आज आपल्या देशातल्या देशात-खेड्यात-शहरात आहे. तरुण मोहदनदासला ज्या

कसोटीला तोंड द्यावे लागले, त्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रखर कसोटीला शहरात आलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांना सामना करावा लागतो. अगदी चाळीस एकराच्या सवर्ण जातीच्या खातेदार घरातल्या मुलांची ही परिस्थिती. आदिवासी, दलित, बौद्ध, मुसलमान, शेतमजूर घरातल्या मुलांना तर, काय कसोटीचा सामना करावा लागत असेल याची कल्पनाच असह्य होते. त्यांच्या जन्माला गेल्याखेरीज खऱ्या अर्थाने त्यांच्या यातना कळणे कठीणच.

 महाविद्यालयातील, वर्गातील, वसतिगृहातील विद्यार्थी मित्रांचे वैभव हे मन पोळणारे. याउलट शहरात बाजारपेठेत फिरताना होणाऱ्या वैभवाच्या दर्शनाने काहीच क्लेश वाटत नाहीत. दुकानांतील वस्तूंची विविधता, आकर्षक मांडणी, ग्राहकांची गर्दी, सुबक, डौलदार घरात राहणारी गोंडस कुटुंबे, आखीव बागबगीचे, त्यात आनंदाने विहरणारे तरुण-तरुणी, अनेक मजल्यांच्या प्रचंड इमारती, मोटारीची अखंड वाहतुक पाहिल्यानंतर खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्याला आश्चर्य वाटते. हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळाले, याचा आनंद वाटतो आणि आता गावातील ते भयानक आयुष्य मागे टाकून या नवीन विश्वात सुखी होऊन जाऊ या कल्पनेने त्याचा उत्साह उसळू लागतो.

 पण या नवीन जगात स्थान मिळवणे सोपे नाही. अपरिमित कष्ट करूनही ते जमेल किंवा नाही शंकाच आहे. शहरातली पोरे आणि पुढाऱ्यांची पोरे नुसतीच श्रीमंत नाहीत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आली आहेत. एकमेकांतसुद्धा फाडफाड इंग्रजी बोलतात. आपल्याला इंग्रजी बोलणे तर सोडूनच द्या. बोललेले समजणेसुद्धा कठीण. त्या पोरांना इंग्रजी सिनेमातल्या नायिकासुद्धा काय बोलतात ते समजते, आपल्याला प्राध्यापक काय बोलतात हे सुद्धा कळणे मुष्किल. अभ्यास करायचा कसा? आणि पास व्हायचे तरी कसे?

 अभ्यासाचं हे रडगाणं तसं नवं नाही. सगळे विषय मराठीत होते तेव्हा सुद्धा पुस्तक आपल्याशी बोलत नव्हती. गणिताच्या पुस्तकांची भाषा अ,ब,क च्या कामांची, आगगाडीच्या-विमानांच्या वेगाची, गट्टुमल मारवाड्याच्या फायद्यातोट्यांची; त्यात पीक पिकवण्याकरिता लागणाऱ्या श्रमाची आणि खर्चाची बेरीज नव्हती. कर्जाच्या हिशेबात, बँकेच्या अधिकाऱ्याला काही द्यावे लागत नव्हते. भूगोलात पृथ्वीपाठीवरच्या लांबलांबच्या प्रदेशांतल्या हवामानाची, पिकांची यादी होती; पण आपल्या भागात होणाऱ्या उत्पन्नाचा आर्थिक भूगोल नव्हता. बळीराजानंतर शेतकऱ्यांचा राजा झाला फक्त शिवा; पण आमचा इतिहास किती थोर राजांची, सम्राटांची आणि धर्मवीरांची जंत्रीच्या जंत्री देत होता. आमच्या भूमितीच्या धड्यांना शेताच्या आकारांचे, झाडांच्या उंचीचे, विहिरींच्या

गोलाईचे आणि बांधकामाचे वावडे होते आणि अ,ब,ड,ई त्रिज्येच्या वर्तुळाची परिमिती म्हटले, की आपले तर कान बंद. तीच गोष्ट बीजगणिताची. वर्गातला स्कॉलर गुरुजींच्या भूमिती बीजगणिताच्या प्रश्नांना चटाचट उत्तर देऊ लागला की 'हा काय दैवी चमत्कार!' अशी मुद्रा आम्ही करायचो. विज्ञानाने, रसायनाने मातीशी इमान कधी साधलेच नाही. हिंदुस्थानला लुटण्याची यंत्रणा राबवण्याकरिता कारकून तयार करण्यासाठी शिक्षणाची व्यवस्था झाली. इंग्रज गेला तरी व्यवस्था तीच राहिली. आता काळ्या इंग्रजाच्या तैनातीला उभे राहण्याकरता कारकून पाहिजेत, अधिकारी पाहिजेत. ज्या खेड्यांना लुटायचे तेथील शेतकऱ्यांच्या पोरांना जमत असले तर त्यांनी शिकावं! पास व्हावं! सर्वांना समान संधीचं हे लोकशाही युग आहे.

 हे कठीण आहे. महा कर्मकठीण आहे. आज शहराच्या नवलाईच्या दर्शनाने सुखावलो आहोत. आजतरी आपल्या विद्येकरता गावाकडे मायबापे काय उस्तवारी करत आहेत, याचासुद्धा विसर पडतो. त्यांची इच्छा एक, पोरानं परीक्षा द्यावी, पास व्हावं, नोकरी धरावी. घरशेती कर्जातून सोडवावी आणि हे पाहून त्यांनी सुखानं डोळे मिटावेत; पण शेतकऱ्यांच्या पोरांना शहरांतली परीक्षा म्हणजे हत्तीला दोरीवरच्या उड्या मारायला सांगणं आहे. जमावे कसे? दरवर्षी बारावीतले, पदवीच्या शेवटच्या वर्षांतले शेकडो विद्यार्थी कपाळाला हात लावून बसतात. दोन-चार वर्ष चैनीत बरी गेली, परीक्षा हाती पडणं दुरापास्त, नोकरी त्याहून कठीण. आता कोणत्या तोंडानं मायबापापुढं जावं? शेकडोजण पळून जातात, मुंबईला जातात, जे मिळेल ते काम करतात. मायबाप तिकडे पोराचं झालं तरी काय असेल या नव्या चिंतेने तोंडात माती घालून घेतात. नाहीतर शिकलेली पोरं नोकरीबिकरी शोध शोध शोधतात आणि एक दिवस गावाकडं परतात, शेतात खपावसं वाटत नाही. म्हातारे म्हातारी घाम गाळतच राहतात.

 मित्रा, महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात लिहिलेल्या पत्रात इथल्या मुक्कामाच्या शेवटी तुझी जी अवस्था असेल त्याविषयी लिहून तुला नाउमेद करण्याची माझी इच्छा नाही. स्वप्नात मश्गुल राहिलास तर शोकांतिका अटळ आहे.

 हे असे का? गावात जन्मभर शेतीवर राबणाऱ्या मायबापांना एक सुखाचा घास नाही आणि इकडे एक काडीही इकडची तिकडे न फिरवणारी माणसं नोटा उधळू शकतात कशा? इथली नवरा बायको हसून खेळून राहतात, मुलांची कौतुकं करतात, घरं सजवतात. गावातल्या शेतीवर जगणाऱ्यांना हे का जमत नाही? अरबी भाषेतील सुरस कथांत भाग्य फळफळायचे दोनच मार्ग- गुप्त खजिन्याची गुहा सापडणे किंवा जादूचा दिवा किंवा

अंगठी सापडणे. कष्टाने घाम गाळून कोणीच लक्ष्मी मिळवत नाही, शेतकऱ्याला भाग्य उजळायचे दोनच मार्ग- पुढारी बनणं, नाहीतर शहरात येणे. हे असं का?

 लाखात एकाद्याच शेतकऱ्याच्या पोराला मिळणारी विचार करण्याची, अभ्यास करण्याची संधी तुला मिळाली आहे. ती किमान या एका प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यासाठी वापर. 'माझ्या आईबापांनी असं कोणतं पाप केलं होतं, की त्यांना चिखलात झिजत राबावं लागतं? त्यांच्या श्रमाचं मोल त्यांना का मिळालं नाही? त्यांच्या घामाचं दाम कोण्या हरामाने हिरावून नेलं?'

 मोहनदास करमचंद गांधी इंग्लंडच्या नव्या ऐश्वर्याला भुलून काही काळ साहेब बनण्याचा प्रयत्नाला लागले; पण त्यांनी स्वत:ला सावरले आणि स्वातंत्र्याचे प्रणेते, राष्ट्रपिता झाले. ते स्वत: इंग्लंडमधल्या सुखात रममाण झाले नाहीत. तुझ्या मायबापांना लुटणाऱ्यांच्या वैभवात बोटे घालून त्यात धन्यता मानण्याचा मोह पडू देऊ नकोस.

 आजची तुझी स्थिती सीतेच्या शोधासाठी गेलेल्या हनुमानासारखी आहे. लंकेचे वैभव, प्रासाद, तलाव, बागबगीचे पाहून हनुमानही विस्मयचकित झाला; पण त्या भिकारड्या रामाची कसली भक्ती करता, या रावणाच्या अजिंक्य, महाबलाढ्य, सुखसमृद्ध ऐश्वर्याचा उपभोग घेऊ असा विचार त्याच्या मनाला शिवलाही नाही. अशोकवनातील विरही, दुःखी सीतेचा शोध त्याने चालू ठेवला म्हणून रामायण घडले.

 आज भूमिकन्या सीता पुन्हा वनवासात आहे. आम्ही भूमिपुत्र तिच्या विमोचनाच्या कामाला लागणार, का लंकेश्वर रावणाच्या वैभवाचे वाटेकरी व्हायला बघणार हा प्रश्न तुझ्याकडे ठेवण्यासाठी हा पत्राचा प्रपंच


 

तुझा,   

शरद जोशी 

(प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश भाग २-प्रथमावृत्ती डिसेंबर १९८५, या पुस्तकातून.)