अंगारमळा/'अनिल' जादूच्या दिव्यातील राक्षस
'अनिल' जादूच्या दिव्यातील राक्षस
संघटनेचे अनेक कार्यकर्ते अनिलविषयी बोलतांना त्याला राक्षस किंवा महाराक्षस म्हणतात. त्याच्याबरोबर काम करतांना तहान नाही, भूक नाही, तीन तीन, चार चार रात्री झोप नाही, अफाट धावपळ याचा अनुभव त्यांनी सगळ्यांनी घेतलेला आहे. बाकी सगळे कार्यकर्ते थकून गळून पडायला आले तरी अनिल आत्ताच कामाला लागल्यासारखा टवटवीत दिसत असतो. आणि बाकीच्या कर्यकर्त्यांचा त्याच्या रांगड्या भाषेत उद्धार करीत असतो. अनिलची कामाची पद्धत जशी राक्षसी तशीच विश्रांतीचीही पद्धत राक्षसी. सगळं काम आटोपलं म्हणजे सगळ्या दिवसांच्या झोपेची भरपाई तो एका दमात करून टाकतो.
संघटनेच्या दृष्टीने मात्र अनिल अरबी सुरस कथातील दिव्यातील राक्षसाप्रमाणे आहे. अरबी कथात दिवा घासला गेला म्हणजे एक राक्षस प्रकट होतो आणि दिव्याच्या मालकाची कोणतीही इच्छा तो क्षणार्धात पुरी करून टाकतो. राक्षसाला सांगितलेले काम भर वाळवंटात मनसोक्त मेजवानीची सोय करण्याचे असो कां कोण्या बेटावर हिऱ्या मोत्या पाचूंनी मढवलेला राजवाडा अर्ध्या रात्रीत उभा करण्याचे असो. दिव्याच्या राक्षसाला अशक्य असे काहीच नाही. संघटनेचे काम म्हटले की अनिलला अशक्य असे काहीच नाही.
गेल्या पाच वर्षात या राक्षसाने इतके प्रचंड महाल उभारून दाखवले आहेत की, आज नुसती आठवण करायला गेलो तरी कुणीही आश्चर्याने चकीत होऊन जाईल. पंढरपूरचा साकडे मेळावा जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य शासन त्यावेळी शेतकरी संघटनेला झोडपूनच काढायला उठले होते. संघटनेचा कोणताही कार्यक्रम म्हटला की त्यावर बंदी यायचीच. एकदा कोणत्या का निमित्ताने होईना शेकऱ्यांना निर्भयपणे एखाद्या मेळाव्यात येता येईल असे करणे आवश्यक झाले होते. विठोबासमोर साकडे घालण्याची कल्पना या आवश्यकतेतून निघाली. विठोबापुढे जायचे म्हटल्यावर शासन बंदी घालणार नाही अशी कल्पना होती. ती खोटी ठरली. शासनाने बंदी घातली. मला सोलापूर जिल्ह्यात जायचीच बंदी घालण्यात आली आणि आता हा कार्यक्रम होऊ शकणार नाही, जास्तीत जास्त जिल्हा बंदी मोडून स्वत:ला अटक करून घेता येईल असे दिसू लागले. उलट्या बाजूने डाव्या चळवळीतील लोकांनीमोठे काहूर उठवले. माझ्या ब्राह्मण जन्मावर बोट ठेवून मी छुपा आरएसएसचा मनुष्य आहे असा प्रचार त्यांनी बऱ्याच दिवस चालवला होता. विठोबापुढे जाण्याच्या कल्पनेने त्यांचे चांगलेच फावले आणि त्यांनीही संघटनेविरुद्ध विष पेरायला सुरूवात केली. सरकारी बंदी विरूद्ध हायकोर्टात जाणे, ती बंदी उठवून घेणे त्या करिता जिल्हाधिकाऱ्याशी बोलणी करणे ही सगळी कामं अनिलने पार पाडली. गावोगाव खेड्यात जाऊन प्रचार करण्याचे काम अनिल जितक्या सहजतेने पार पाडतो तितक्याच सहजपणे तो हायकोर्टातील दालने, वकील मंडळी, कायद्याची कलमे यातून भ्रमण करतो.
सोलापूर जिल्ह्यात जायची त्यावेळी त्याच्यावरही बंदी होती. पण एखाद्या बहिर्जी नाईकाप्रमाणे तो वेगळ्या नावाखाली खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा भेटून आला. बंदी उठली ती मेळाव्याआधी आठ दिवस. आठ दिवसात अनिलने आकाशपाताळ एक केले. पंढरपूरकडे जाणाऱ्या साऱ्या रस्त्यांच्या बाजूच्या भिंती रंगवून घेणे हे काही काम साधे नाही. खुद्द पंढरपुरातील प्रचंड वाड्यांच्या भिंती त्याने अशा रंगवून घेतल्या की कार्तिकी यात्रेचे सगळे वारकरी पाहातच राहिले. त्यावेळी पंढरपुरात संघटनेचे काम असे काहीच नव्हते. सगळे बाहेरून नेऊन कामे करवून घ्यावी लागत होती. कोपरगावचा बद्री देवकर याच वेळी पंढरपुरला जाऊन बसला. जतचे महाराज बादलीभर खळ घेऊन भित्तीपत्रक चिकटवायच्या कामाला लागले. या काळांत जीपमधील उकळते पाणी पडून अनिलची सगळी पाठ भाजून निघाली. दुसरा कुणीही मनुष्य सरळ इस्पितळांत दाखल झाला असता इतका तो भाजला होता. अनिलच्या मनात असा विचारही आला नसावा. साकडे मेळाव्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्याने शर्ट काढून बँडेजने भरलेली पाठ मला दाखवली. साकडे मेळाव्याच्या प्रचंड यशाने आम्ही त्यावेळेस काहीसे ढगात होतो. अनिलची भाजलेली पाठ पाहिल्यावर या यशामागे काय वेदना आणि परिश्रम होते याची मोठी विदारकपणे जाणीव झाली. पंढरपुरचा साकडे मेळावा म्हणजे संघटनेच्या या राक्षसाने आठ दिवसात उभा केलेला अप्रतिम महालच होता.
हे असे चमत्कार एका माणसाने किती वेळा करून दाखवावे? काहीही कठीण काम दिसले किंवा समोर आले म्हणजे अनिलवर ते टाकून मी मोकळा होतो. आणि अनिलच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाही. कोणतीही कल्पना समोर मांडली की त्यातल्या अडचणी काढून ते कसे व्हायचे असे रडगाणे अनिलच्या तोंडून मीकधीच ऐकले नाही. मलाच वाटणाऱ्या धास्तीपोटी काहीवेळा मी त्याचे कष्ट कमी व्हावे याकरितां काही सूट देऊ करतो. अमुक गोष्ट नाही केली तरी चालेल तमुक एक गोष्ट जमण्यासारखी नसल्यास सोडून दे. अनिल अशा सूचना त्याच्या आडदांड पद्धतीने धुडकावून लावतो. कार्यक्रम पार पडला पाहिजे, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पार पडला पाहिजे, संघटनेच्या यशात दैदिप्यमान भर पडेल असे तऱ्हेने पार पडला पाहिजे. याच्याबद्दल त्याचा विशेष आग्रह असतो आणि अनेक वेळा मी मांडलेल्या मुळच्या प्रस्तावापेक्षा पुष्कळ वेगळा, अधिक व्यापक, अधिक महत्त्वाकांक्षी आणि म्हणून तो अधिक जिकीरीचा आणि त्रासाचा कार्यक्रम स्वत:च पुढे मांडतो, हे सगळे कसे काय व्हायचे? तर त्याचे उत्तर ठरलेले, 'त्याची काळजी तुम्ही करू नका.' आणि अनिलने असे आश्वासन दिले की मीही निर्धास्त होऊन माझ्यावर जी कामगिरी सोपवली ती पार पाडण्याच्या मागे लागतो.
साकडे मेळाव्यानंतर परभणी अधिवेशन झाले. त्यानंतर चंदीगड आंदोलन, पश्चिम महाराष्ट्र मोटरसायकल प्रचारफेरी. सर्व महाराष्ट्रातील महिन्याभराची प्रचार यात्रा. या सगळ्या कार्यक्रमांचा सेनापती अनिल गोटे. प्रचार यात्रेच्या शेवटच्या दिवशीच इंदिरा गांधींची हत्या झाली. सगळे राजकीय चित्र क्षणार्धात पालटले. गावबंदी कार्यक्रमाच्या आधाराने उभी केलेली रणनीती भुईसपाट झाली. शेतमालाच्या भावसबंधी शेतकऱ्यांच्या मनांत जळत असलेल्या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाला तोंड न देता इंदिरा काँग्रेसचे एक सोडून सगळे उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाले. निदान विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आयला थोडा फार लगाम घातलानाही तर पाच वर्षांपर्यंत तरी संघटनेची सगळी आंदोलने, कार्यक्रम बंद ठेवायला लागतील, एवढेच नव्हे, तर संघटनेला काम करणेसुद्धा अशक्य होईल असे दारुण चित्र दिसू लागले. या परिस्थितीत विचार करण्यासाठी अधिवेशन घ्यायचे ठरले. शेतकरी संघटनेचे अधिवेशन म्हणजे काही थोडी जबाबदारी नाही. सटाण्याच्या अधिवेशनाची तयारी किती तरी महिने आधी चालू होती. परभणी अधिवेशनाचीही तीच स्थिती खर्चाकरिता पैसा उपलब्ध झाला तरी सगळी कामे व्यवस्थित व वेळेत उरकून घेणे म्हणजे उरफोड काम. अनिलने धुळ्याला अधिवेशन भरवण्याची जबाबदारी स्वीकारली आणि पार पाडून दाखवली.
सहा जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी राजीव शासनाचे नवे वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले आणि शेतकरी संघटनेच्या इतिहासातील कापूस पर्वाला सुरूवात झालीहतात्मा बाबू गेनू स्मृती दिन १२ डिसेंबर १९८५ रोजी डॉ. दत्ता सामंत यांच्या सहकार्याने मुंबईच्या शिवाजी पार्कवर घेण्याचे ठरले. अनिलने पुन्हा एकदा वाळवंटात राजवाडा उभा करून दाखवला. सगळी मुंबई रंगवून काढली. छगन भुजबळांना व दत्ता सामंतांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा चमत्कार करून दाखवला. विदर्भ मराठवाड्यातून आलेल्या हजारो स्त्री पुरुषांची मुंबईत राहण्याची सोय केली. प्रत्यक्ष शिवतीर्थावर उभे केलेले व्यासपीठ अनेकांच्या स्मरणात असेल.
१९८७ च्या ठिय्या आंदोलनाची जबाबदारी पार पाडली ती पुन्हा अनिल गोटेनेच. कार्यकारीणीने त्याची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. अध्यक्षपदाच्या काळात तर सटाणा, धुळे, नागपूर आणि शेवटी सांगली येथे भरलेले मेळावे म्हणजे त्याच्या कर्तबगारीच्या चढत्या पताकाच होत्या.
सांगलीचा मेळावा म्हणजे खरोखरच अनिलच्या सर्व कामगिरीवर चढलेला सोन्याचा कळस होता. यापुढे आणखी मोठे मोठे कळस तो चढवील, याहूनही उत्तुंग शिखरे पादाक्रांत करील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. पण तरीही सांगलीच्या यशाचे असे एक खास स्थान कायमचे राहील.
वसंतदादा पाटलांनी मुख्यमंत्री पदाच्या वादात शेतकरी संघटनेला विनाकारण ओढले. माझ्यावर आणि व्ही.पी. सिंगांवर विनाकारण चिखलफेक केली आणि राष्ट्रीय नावाची शेतकरी संघटना काढून एक मोठा यक्षप्रश्न उभा केला. दादांच्या संघटनेला भवितव्य असे नाही हे उघड. शेतकरी संघटना ही काही आडमाप घोषणांनी उभी राहणारी गोष्ट नव्हे. संघटना उभी करण्याकरितां शेकडो हजारो कार्यकर्त्यांचे अश्रू, घाम आणि रक्त लागत असते. पण वसंतदादांबद्दल पुष्कळ शेतकऱ्यांच्या मनात ओलावा आहे. स्वातंत्र्यसैनिक म्हणूनही त्यांच्याविषयी आदर आहे. राष्ट्रीय शेतकरी संघटनेची जखम चिघळत ठेवणे त्रासाचे ठरण्याचा धोका होताच.
सांगली, कोल्हापूर भागात शेतकरी संघटनेचे काम कमकुवतच, जवळ जवळ नसल्यासारखेच. याही परिस्थितीतच अनिलने महाचमत्कार घडवून दाखवला. अनिल सांगलीला गेला. तालुक्यातालुक्यात गेला. संभाजीराव पवारासारखे कार्यकर्ते जमा केले आणि वसंतदादांचो मेळावा झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत सांगलीमध्येच महाप्रचंड मेळावा भरवून एक मुंहतोड़ जवाब देऊन टाकला. बस, त्या दिवसापासून राष्ट्रीय शेतकरी संघटनेचे नावसुद्धा कुठे येईनासे झाले. सांगलीतील मेळाव्याचीकामगिरी एखाद्या लष्करी कारवाईसारखी होती आणि ती अनिलने शंभर टक्के यशस्वी करून दाखवली. संघटनेच्या सगळ्या मोठ्या लढायात अनिल एकटाच एका सबंध रणगाड्याच्या दळाचे काम बजावत आला आले.
पण अनिल म्हणजे नुसता कामाचा राक्षस नव्हे. त्याच्या अंगी प्रचंड धाडसही आहे. जीवावर धोका येण्याची तयारीही आहे. संघटनेत येण्यापूर्वी अनिलवर सात बसेस जाळल्याचा आरोप होता. मंत्रीमहाशय वर्तक यांच्या श्रीमुखात ठेवून दिल्याबद्दल त्याला शिक्षा झाली होती. भर सभेत मंत्र्याच्या गळ्यात जोड्यांचा हार घालण्याचा आपला निर्धार त्याने पुरा करून दाखवला होता. संघटनेच्या कामात त्याच्या जेम्सबाँड प्रवृत्तीचा अनुभव अनेकदा आला आहे. विदर्भात कापूस आंदोलन सुरू झाले होते. मला रासुकाखाली अटक झाली होती. अनिलच्या धुळ्याच्या राहत्या घरी पोलिसांनी पहारा बसवला होता. या पहाऱ्यातून सुटण्याकरिता त्याने जी युक्ती वापरली ती कोणत्याही रहस्यकथेत शोभून दिसण्यासारखी आहे. पण त्याच्या या सगळ्या धाडसाच्या गोष्टी आजच प्रकाशात आणणे शक्य होणार नाही. अनिलच्या धाडसाच्या रम्य आणि सुरस कथा प्रकाशित करण्यापूर्वी दहा-पंधरा वर्षाचा काळ जाऊ द्यावा लागेल.
सगळ्या आडदांडपणाबरोबर अनिलमध्ये एक छुपा बहिर्जी नाईक आहे. नाव बदलून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आल्याचा उल्लेख मी केलाच आहे. अगदी कडक बंदोबस्तात तुरुंगात असतांना ॲडव्होकेट म्हणून अनिल मला भेटायला आला आहे. सल्लामसलत करून गेला आहे. सूचना देऊन आणि घेऊन गेला आहे.
या सगळ्या कथा खरे म्हटले तर अनिलच्या तोंडूनच ऐकायला पाहिजेत. तासन्तास चाललेल्या गाडीच्या प्रवासात अनिल स्वत:च्या या करामती मोठ्या रोमहर्षकपणे सांगतो. स्वत:च्याच गोष्टी असे नव्हे. त्याच्या आसपासच्या अनेक व्यक्तींच्या गोष्टी तितक्याच खुमारीने सांगतो. या अफाट माणसाभोवती आयुष्यात वेळोवेळी आणि जागोजागी तितकीच भन्नाट माणसे येऊन गेली. अनिलचे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचे कसब काही विलक्षण आहे. मला अनेकदा असे वाटायचे की हा कल्पनारंजीत कथा सांगतो. पण दोनतीन वेळा तपास करून पाहिल्यानंतर त्यात अतिशयोक्तीचा काही प्रकार नाही असे माझ्या लक्षात आले. शेवटी अनिल हा व्यवसायाने पत्रकार आहे. साधासुधा पत्रकार नाही. एका एका वर्षात तीन तीन पुरस्कार मिळवलेला पत्रकार आहे. इंग्रजीमध्ये अनेक मोठ्या लेखकांचा उल्लेख'गुड स्टोरी टेलर' म्हणून करतात. अनिलच्या या सगळ्या धावपळीत वेळ मिळेल तेव्हा त्याच्याच आसपासच्या लोकांनी ही शब्दचित्रं कधी तरी शब्दांकित करायला पाहिजे. मराठी साहित्यक्षेत्रातही त्यामुळे खळबळ उडेल.
मागच्या आठवणी सांगताना अनिलच्या संघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता असतांनाच्या आठवणी मन हेलावून सोडणाऱ्या असतात. खिशात पैसा नाही, जेवणा राहण्याची सोय नाही. राहाण्याची सोय दुसऱ्या कोणत्यातरी कार्यकर्त्यांच्या घरी केलेली. पोटात भुकेचा डोंब उसळलेला. पण ज्या घरी अकस्मात जायचे त्या घरी जेवायला थांबायचे आमंत्रण मिळेल की नाही याची खात्री नाही. अशा परिस्थितीत जेवणाचे आमंत्रण लावून घेण्याकरिता काय काय युक्त्या कराव्या लागतात याचे प्रत्यक्ष वर्णन अनिलच्या तोंडूनच ऐकायला पाहिजे.
थोड्या लोकांना माहित असलेला अनिलचा एक छंद म्हणजे कोर्टात केस लढवणे. धुळ्याच्या कोर्टात पुढाऱ्यांची लफडी काढण्याकरिता त्याच्या काही ना काही केसेस चालूच असतात. मुंबई हायकोर्टातही त्याचे अनेक रिट पिटीशन चालू असायचे. संघटनेच्या कामाला लागल्यापासून हे खटला प्रकरण थोडे कमी झाले आहे. कमी झाले म्हणण्यापेक्षा त्याचे स्वरूप बदलले आहे. आता त्याचे लक्ष असते संघटनेच्या खटल्यांकडे. प्रसिद्ध कायदेपंडित राम जेठमलानी यांच्याबरोबर काम करणे सोपे नाही. पण अनिल म्हणजे त्यांच्या गळ्यातला अगदी ताईत. तसे म्हटले तर अनिलला इंग्रजी अगदी जुजबी येते. पण राम जेठमलानी आणि अनिल एकमेकांशी गप्पा मारत असले म्हणजे फार जुन्या काळचे दोस्त भेटत असावे असे वाटते. मोठमोठ्या माणसांबरोबर स्नेह संबंध जोडणे ही त्याची एक हातोटी आहे. छगन भुजबळ असोत की बाळ ठाकरे, दत्ता सामंत असोत की व्ही.पी. सिंग आणि शंकरराव चव्हाण असोत की शरद पवार या सगळ्या मंडळींना अनिलविषयी आपुलकी आहे. यांचे सर्वांचे दरवाजे अनिलकरता कायमचे खुले असतात.
पण बाहेरचा असा अफाट, रांगडा, राक्षस अनिल घरी परतला म्हणजे अगदीच वेगळा दिसतो. यात खरे कौशल्य हेमावहिनींचे आहे. अगदी अगत्यशील गृहीणीची जबाबदारी हेमावहिनी सतत हसतमुख राहून सांभाळतात. त्यांच्या सतत आनंदी स्वभावाचे रहस्य काय असावे? मला वाटते बाहेरून काळ्या कभिन्न पत्थरासारख्या भासणाऱ्या अनिलच्या मनात आत कुठेतरी भावनेचा आणि प्रेमाचा झरा वहात असला पाहिजे. वहिनींना त्याची जाणीव सगळ्यात जास्त असली पाहिजे. अनिलच्या या आतल्या स्वरूपाचे दर्शन फक्त एकदा घडले. चांदवड अधिवेशनाच्या आधी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने संघटना सोडून दिली. एवढेच नव्हे तर बायकोने अधिवेशनात भाग घेऊ नये म्हणून तिला भयानक मारहाण केली. शिव्या दिल्या, अगदी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमोर. या प्रसंगाची माहिती सांगताना अनिल माझ्या खांद्यावर डोके ठेवून अक्षरश: ढसाढसा रडला. त्या बाईंना मारले म्हणून नाही, तर हा सगळा प्रसंग संघटनेचे कार्यकर्ते काही न करता थंडपणे पहात राहिले म्हणून.(साप्ताहिक आठवड्याचा ग्यानबा दि. २१ मार्च १९८८)
■ ■