'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक/कृतज्ञता

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

कृतज्ञता -

 हरि नारायण आपटे याच्या 'करमणूक' साप्ताहिकाला १९९० साली १०० वर्षे पूर्ण झाली. 'करमणूक' शताब्दी निमित्ताने साप्ताहिक ' करमणूक'चा वाङ्म़यीन अभ्यास करावा आणि तो वेळीच प्रसिद्ध करावा असा विचार मनात घोळत असतानाच 'मराठी नियतकालिकांचा वाङ्म़यीन अभ्यास' या ग्रंथाच्या या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडासाठी 'करमणूक' वर लिहावे अशी प्रेरणा डॉ. सरोजिनी वैद्य आणि डॉ. उषाताई देशमुख यांनी दिली. त्या कामाला लागलो. त्यातूनच एक परिचयात्मक लेख 'करमणूक'वर लिहून झाला. तो हैद्राबादच्या : पंचधारेतून (जुलै, डिसें. १९८८) प्रसिध्द झाला. त्या आधारेच ज्येष्ठ सुहृद श्री. रविंद्र पिंगे यांनी मुंबई मराठी साहित्य संघ आयोजित करीत असलेल्या कै. प्रा. ल. ग. जोग व्याख्यान मालेत 'हरिभाऊंचे साप्ताहिक-करमणूक' याच विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केले. तीन दिक्साच्या या व्याख्यानमालेत मा. श्री. शंकर सारडा आणि डॉ. अनुराधा औरंगाबादकर यांचाही समावेश होता. तेव्हा मुंबईच्या जोग व्याख्यान मालेत प्रस्तुत विषयावर दि. १६ फेब्रु. १९८९ ला एक व्याख्यान पुष्प गुंफता आले, हे मी माझे सद्भ़ाग्य मानतो.

 यातूनच प्रस्तुत पुस्तिका सिध्द झाली आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ येथील 'जवाहरलाल नेहरू ग्रंथालया'कडे, दादरच्या' मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया' कडे धाव घ्यावी लागली. या कामी ग्रंथालयाधिकारी श्री. अ. चिं. टिकेकर आणि श्री. अच्युत तारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे विशेष उल्लेखनीय सहाय्य लाभले.

 मराठीतील जाणते समीक्षक गुरुतुल्य प्रा. डॉ. भालचंद्र फडके यांनी मुद्दाम सवड काढून आपल्या प्रस्तावनेने पुस्तिकेचा शुभारंभ करून दिला. गुरुवर्य डॉ. ग. मो. पाटील यांनी संस्कृत श्लोकांचा अर्थ उलगडून दाखविला. अलिबागच्या सन्मार्ग प्रिंटिंग प्रेसचे श्री. परशुराम लक्ष्मण पाटील यांनी सुबक व आकर्षक मुद्रण करून दिले. ही पुस्तिका प्रकाशात आणण्याचे संपूर्ण श्रेय माझे सन्मित्र प्रा. डॉ. माधवराव पोतदार (पेण) यांनाच आहे. त्यांनी कोणतीही अडचण येवू न देता विशुद्ध मुद्रणाची जोखीम पार पाडली. अन्यथा जव्हारसारख्या आदिवासी क्षेत्रात अशा लेखनाला प्रकाश लाभणे केवळ अशक्य होते. प्राचार्य देवदत्त तुंगार यांचं सातत्याने जे सहकार्य लाभले ते मोलाचे असून त्यांचा व इतर सर्व सहकाऱ्यांचा मी अतिशय ऋणी आहे.  डॉ. भालचंद्र फडके यांनी प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे आर्यभूषण छापखान्यातील अंकाची उपलब्धी. तसेच डॉ. श्रीपती कापरे यांचा 'करमणूक' वरील अप्रकाशित प्रबंध वा 'मराठी कथेची वाटचाल' पाहायला हवे होते. परंतु जयकर ग्रंथालयाकडून पत्रव्यवहार करूनही 'करमणूक' बाबत संदर्भ साहाय्य उपलब्धीबाबत कळविले गेले नाही. एका अर्थाने डॉ. भालचंद्र फडके यांची ही प्रस्तावना घेतल्याने 'न्यून्य ते पुरते' झाले आहे.

 गोखले एज्युकेशन सोसायटीने याही पुस्तिकेच्या प्रकाशनासाठी रुपये ५०० चे अनुदान दिले, त्याबद्दल संस्थेचे सचिव मा. डॉ. मो. स.गोसावी यांचा मी कृतज्ञ आहे.

 या निमित्ताने हरिभाऊ आपट्यांच्या मूळ साप्ताहिक 'करमणूक' च्या अंकाकडे जाणकार मराठी रसिक-वाचकांचे लक्ष वेधले गेले आणि वाङ्मयीन नियतकालिकांच्या आणि मराठीच्या अभ्यासकांना ही पुस्तिका उपयुक्त ठरली तरच या लेखनाचे सार्थक होईल.

 विभा प्रकाशनाच्या या पाचव्या प्रकाशनाला मराठी रसिकांनी उत्तम प्रतिसाद द्यावा, अशी नम्र विनंती आहे.

 वंदनीय पिता श्री. बाबासाहेब गिरधारी, वाहेगावकर यांच्या चरणी ही पुस्तिका अर्पण करतो. कारण त्यांनीच कंबर कसून निर्भयपणे सदा वागण्याचा संदेश दिला आहे.

 पुनश्च कृतज्ञता!

- भास्कर गिरधारी

गुरुपौर्णिमा, शके १९१३
दि. २६ जुलै, १९९१.