पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण पांचवें
सोन्याची कुऱ्हाड

ज्या काळांत संभोग घडला तरी गर्भधारणेचा संभव नसतो असा एखादा काळ स्त्रीच्या प्रतिमासिक अवस्थेत असतो किंवा काय हाच मुख्य प्रश्न आहे. या प्रश्नाच्या निकालावर ब्रह्मचर्याची व्यावहारिकता. किती व कशी अवलंबून आहे तें आम्ही मागील प्रकरणाच्या शेवटीं सूचित केलेच आहे व याही प्रकरणांत पुढे त्याचा अधिक विस्ताराने आपल्याला विचार करावा लागेल. पण तो करण्यापूर्वी प्रथम आप- णांस उपरिनिर्दिष्ट प्रश्नाचाच निकाल लावला पाहिजे. तसें करावयाचें झाल्यास संभोगक्रिया व गर्भधारणा यांचे परस्पर संबंध कशा प्रकारचे आहेत ते आपल्याला पूर्णपणे समजून घेतले पाहिजेत; आणि त्या- साठीं स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांची रचना कशा प्रकारची आहे तें आपल्याला पाहिलें पाहिजे. अशी चर्चा करावयास आमच्या वाचकांस उद्युक्त केलेले पाहून कांहीं लोक म्हणतील " अहो, हें तुम्हीं मांडले आहे तरी काय ? स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांचीं नांवें घेणेंही प्रतिष्ठित समाजांत बीभत्स मानलें जातें आणि तुम्ही तर आतां त्या इंद्रियां- च्या निरनिराळ्या भागांची रचना वाचकांस समजून द्यावयास सिद्ध झालां ! या तुमच्या अधम रुचीला म्हणावें तरी काय हेंच समजत नाहीं !” या संभवनीय आक्षेपाला आम्ही इतकेंच उत्तर देऊ इच्छितों, कीं स्त्री-पुरुषांच्या इंद्रियांची चर्चा ही तुम्हांला इतकी किळसवाणी गोष्ट कां वाटते? हात, पाय, नाक हे जसे मानवी शरीराचे अवयव आहेत त्याचप्रमाणे जननेंद्रियेंही शरीराची उपांगें होत. नाक किंवा कान यांचे व्यापार समजून घेण्यासाठीं त्यांच्या विभागांची चर्चा आपण करीत नाहीं काय ? मग जननेंद्रियांचे