Jump to content

पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
संतति-नियमन

असें आपण म्हणूं काय ? त्याचप्रमाणें विवाहित स्त्री-पुरुषांनीं संभोग- सौख्याचा उपभोग घ्यावा व प्रजोत्पादन करावें या दोन्ही गोष्टी निसर्गक्रमप्राप्त आहेत यांत किमपि संशय नाहीं. पण त्याबरोबरच आपण जी प्रजा निर्माण करूं ती सुप्रजा असेल व तिच्यामुळे समाजाचे कोणत्याही तऱ्हेचें नुकसान न होतां कल्याणच होईल अशी सावधगिरी ठेवून पतिपत्नींनी संततिनियमन केले पाहिजे यांत संशय नाहीं. आहार विहारादि आपले सर्वच व्यापार नैसर्गिक आहेत. परंतु समाजांत रहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या सर्व व्यापारांवर समाजहिताचें बंधन घालावेंच लागतें. आणि असें आहे तर स्त्री- पुरुषांनीं प्रजोत्पादनाच्या क्रियेवरही सुप्रजाजननाचे बंधन घालून तिचें नियमन केले पाहिजे असें म्हणण्यांत वावगें तें काय आहे ?
 तिसरा आक्षेप उत्पन्न होण्यासारखा आहे तो असा, की प्रजो- त्पादन ही एक इतकी पवित्र क्रिया आहे, की तिची उघड उघड चिकित्सा करणें आणि तिच्या नियमनाविषयी लोकांना उपदेश करणें हा धार्मिक दृष्ट्या मोठा भ्रष्टाकार होय. परंतु या आक्षेपाला आमचे वाचक विशेषसें महत्त्व देतील असें आम्हांस वाटत नाहीं. प्रजोत्पादन ही क्रिया पवित्र आहे हें आम्हांसही मान्य आहे. किंबहुना ती अत्यंत पवित्र असून तिचे समाजाच्या हितावर दूरवर परिणाम होण्या- सारखे आहेत याविषयी इतर कोणापेक्षांही आमची अधिक खात्री आहे... परंतु ती क्रिया दीर्घपरिणामी व पवित्र असल्यामुळे तिच्याविषयीं कोणत्याही प्रकारचा विचार न करतां स्त्री-पुरुषांनी ती अंधपणे व मनःपूत करावी ही विचारसरणी कोणत्या मुलखाची : प्रजोत्पादनाचे समाजावर अतिशय महत्त्वाचे परिणाम घडतात हें जर खरें, आणि समाजाची धारणा उत्तम प्रकारें करणें हें जर धर्माचें मुख्य कार्य, तर समाजांत सुप्रजा निर्माण व्हावी एतदर्थ स्त्री-पुरुषांनीं आपल्या संततीचे नियमन करणें किती आवश्यक आहे तें सांगण्यांत धार्मिक