पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रत्यक्ष पुरावा व आक्षेपनिरसन

३३

मोठ्या कष्टाने मिळतें असल्या शतदरिद्री स्त्री-पुरुषांना अपत्यलाभाचे स्वर्गीय सुख भोगावयास मिळतें; आणि उलट जो आपल्या दारीं इंद्राचा ऐरावत देखील आणून उभा करूं शकेल, आणि ज्याच्या घरीं सुखसंपत्तीचा पूर वहात आहे अशा क्रोडोपतीनें हजारों नवस करून देवाजवळ भीक मागितली तरी त्याला अपत्याची प्राप्ति होत नाहीं. यावरून संतति ही केवळ परमेश्वरी इच्छेच्या आधीन असणारी गोष्ट होय हैं उघड होतें. एखाद्या स्त्रीच्या नशिबी अपत्यसौख्य लिहिलेले नसले म्हणजे डॉक्टरी इलाजांची, मांत्रिकांच्या अंगाऱ्या- धूपाऱ्यांची आणि उपासतापासांची परमावधि केली तरी तिच्या पोटीं संतान होत नाहीं; पण एखाद्या पतिपत्नींस दारिद्र्यामुळे किंवा इतर कांहीं कारणांनी संतति नकोशी वाटली तरी त्यांच्या लिखितांत जेवढी संतति लिहिलेली असेल तेवढी त्यांस झाल्यावांचून रहात नाहीं.. सारांश, संततीचा विषय सर्वस्वी परमेश्वरी सूत्राचा आहे, आणि त्या वात्रतीत मनुष्याने नियंत्रणाचा प्रयत्न करणें म्हणजे ईश्वरी सूत्र बदलण्याचा प्रयत्न करण्यासारखें आणि अतएव दुःसाध्य व हास्यास्पद आहे.
 या दैववादजन्य आक्षेपांत अगदीच तथ्य नाहीं किंवा तो कोणालाच पटण्यासारखा नाहीं असें आम्ही म्हणूं इच्छित नाहीं. किंबहुना आम्हांस तर असें वाटतें कीं या आक्षेपांत असा कांहीं एक- सत्यांश आहे, कीं त्यामुळे प्रथमदर्शनी तो सर्वांनाच पटण्यासारख वाटेल. ज्याच्या घरांत अठरा विश्वे दारिद्र्य आहे त्याला संतति नको असूनही होते, आणि ज्या राजवाड्यांत संततीसाठी लोक तळमळत असतात तेथें तो जन्म पावत नाहीं, हा अनुभव अगदी नेहमींच्या अनुभवांपैकी आहे. परंतु या अनुभवावरून उपरिनिर्दिष्ट आक्षेप मान्य करून संततिनियमनाचा प्रयत्न व्यर्थ समजण्याचें मात्र कारण नाहीं... कारण, एक तर दरिद्री स्त्री-पुरुषांच्या पोटीं पुष्कळ मुलें येतात