पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संततिनियमनाचें अगत्य

१७

प्रजेचा लाभ मात्र समाजास होत नाहीं. कारण अशा प्रजेपैकी बहु- तेक प्रजा अल्पायुषी निपजून समाजाच्या उपयोगी पडण्याच्या आधींचं तिचा नाश होत असतो. शिवाय असली अल्पायुषी मुलें जन्मली म्हणजे ती जोपर्यंत जिवंत असतात, तोपर्यंत त्यांची हर- प्रकारची काळजी घेण्याविषयीं आईबापांस दक्षता ठेवावी लागते. त्यांच्या अन्नासाठीं, कपड्यालत्त्यासाठी, औषधपाण्यासाठी आई- बापांचा पैसा व त्यांचे शारीरिक श्रम खर्च होतच असतात. अर्थात् अप्रत्यक्षपणे एकंदर समाजाचें द्रव्यबळ व शरीरबळ या अल्पायुषी प्रजेवर व्यतित होतच असतें, आणि ही प्रजा मृत्युवश झाली, कीं हें सारें बल सत्कारणी लागण्याऐवजीं अगदी फुकट गेलें असेंच समजणें भाग असतें. सारांश, या दृष्टीनें आपल्या देशांतील सध्यांची बहुप्रसविता अत्यंत दुष्परिणामकारक आहे. या बहुप्रसवितेमुळें लोक- संख्या वाढावयास नको आहे ती वाढते ही पहिली गोष्ट; शिवाय लोकसंख्येची जी थोडी वाढ होते तिच्यासाठी समाजाचे श्रम आणि द्रव्यही भलत्याच प्रमाणांत खर्च होऊन वायां जातात ही दुसरी; व असल्या क्रमामुळे समाजांत अनेक प्रकारच्या व्याधि मूळ धरून बसतात आणि प्रजेचा एकंदर नैसर्गिक दर्जाच निकृष्ट होत जातो ही तिसरी. असला समाज भरभराटीच्या स्थितीत असेल किंवा त्याच्या हातून कांहीं पराक्रम होतील अशी आशा करणें व्यर्थ होय. आंतून सडत चाललेला वृक्ष चांगला फोफावेल व त्याचा खूप विस्तार होऊन त्याच्या शीतल छायेंत आपल्याला विश्रांति घ्यावयास सांपडेल अशी आशा करणें जितकें निसर्गनियमांच्या विरुद्ध आहे तितकेच वरील प्रकारची आशा करणेही अज्ञपणाचें होय. रूबिन नांवाच्या विद्वानाने ही गोष्ट अनेक प्रमाणांनी सिद्ध करून दाखविलेली आहे. निरनिराळ्या देशांचे जन्मसंख्येचे व मृत्युसंख्येचे आंकडे गोळा करून आणि त्या त्या देशांच्या इतिहासांत वैभवाचे काळ कोणते होऊन