पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संकटाची सावली

चाच उपदेश स्त्री-पुरुषांस करणें समर्थनीय ठरेल किंवा नाहीं ? आणि संततिनियमनाचा उपदेश प्रथमदर्शनी विवाहहेतूविषयींच्या प्राचीन कल्पनांच्या विरुद्ध दिसला तरी वास्तविक तो तसा नाहीं असें म्हणतां येईल किंवा नाहीं :- इत्यादि प्रश्नांचा विचार करणें अगत्याचे आहे.
 पहिली गोष्ट ही, कीं प्राचीन काळीं शास्त्रकारांनी बहुप्रसविता प्रशस्त मानली होती, याचें कारण तेव्हां ती खरोखरच समाजाच्या कल्याणाची होती. मानवी सुधारणेच्या प्राचीन अवस्थेत असा एक काळ असतो, कीं तेव्हां कोणत्याही समाजास आपले अस्तित्व आणि वर्चस्व कायम ठेवावयाचें असेल तर इतर समाजांशी युद्ध करून त्यांना जिंकण्याची तयारी त्यास नेहमीं ठेवावी लागते. या कारणानें समाजाचा अंतर्गत एकोपा आणि मनुष्यबळ हीं ज्या ज्या गोष्टींनीं वाढतील त्या सर्व गोष्टींचा अंगिकार करण्याचें धोरण त्या समाजास ठेवावें लागतें. या काळास युद्धप्रधानकाळ असें नांव द्यावयास हरकत नाहीं. आपले शास्त्रकार ज्या काळी होऊन गेले तो अशा प्रकारचा युद्धप्रधान काळच होता. त्यामुळे समाजाचें मनुष्यबळ वाढणें त्यांस इष्ट वाटणें अगदीं साहजिकच होतें, व त्या दृष्टीनें विवाहित स्त्री-पुरुषांच्या पोटीं अधिक संतति झाल्यास 'अधिकस्याधिकं फलम्' असें त्यांस वाटून बहुप्रसवितेचा प्रकार त्यांनी प्रशस्त मानला यांत नवल नाहीं. श्रुतींच्या काळांत आपले आर्य पूर्वज नुकतेच इकडे येऊन व अनार्य लोकांवर प्रभुत्व स्थापित करून वसाहत करून राहू लागले होते ही कल्पना जर खरी असली तर अशा झटापटीच्या वेळी त्यांना आपल्या स्वतःच्या समाजाचें संख्याबल वाढणे अगत्याचें वाटणें अपरिहार्यच होतें; व 'आम्हांस पुष्कळ गाई द्या', 'आम्हांस पुष्कळ पुत्र द्या' अशा प्रकारची त्यांनीं देवाची प्रार्थना केल्याची साक्ष कित्येक वेदऋचांवरून पटते हें ठीकच आहे. श्रुतींनंतर