पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संतति-नियमन

विणार कीं काय ? असले विलायती वेडेचार आपल्या देशाला कधीही कल्याणप्रद होणें शक्य नाहीं. अहो, विवाहानंतर संभोग - सौख्य आणि संभोगानंतर संतति हा उचित क्रमच होय ! आणि शिवाय या बाबतींत आमच्या शास्त्रकारांचें म्हणणें काय होतें तें पाहूं गेल्यास तेंही असल्या कल्पनांच्या विरुद्धच दिसेल !"
 संभोगसौख्य हें विवाहानुषंगिकच होय, आणि संतति हैं क्रम- प्राप्त विवाहफलच होय, या दोन्ही गोष्टींविषयी कोणी वाद घेणार नाहीं. तसेंच विवाह करण्यामध्यें सुप्रजाजननाखेरीज दुसरा कोणताही हेतू स्त्री-पुरुषांच्या हृदयांत असतां कामा नये यांतही शंका नाहीं. आपल्या पूर्वजांचीं मतें पाहिली तर ती अशीच आहेत. 'ही माझी कन्या प्रजोत्पादनासाठी मी तुला देतों' अशा मंत्राने पित्यानें कन्यादान करण्याविषयींच शास्त्रकारांची आज्ञा आहे. त्याच- प्रमाणें विवाहहोम-प्रसंगीं वराने वधूला उद्देशून जे मंत्र म्हणावेत अशी शास्त्राज्ञा आहे त्या मंत्रांचाही 'आपण उभयतां आतां प्रजो- त्पादन करूं' 'आपण पुष्कळ पुत्रांस जन्म देऊ' असाच मति- तार्थ असून, त्या प्रसंगीं देवांची प्रार्थना करण्यासाठीही या माझ्या पत्नीच्या ठिकाणीं दहा पुत्र जन्म पावोत' या व अशा अर्थाचेच मंत्र शास्त्रकारांनीं वराच्या तोंडी घातले आहेत. अर्थात् या सर्व गोष्टींवरून हेंच उघड होतें, कीं विवाहित स्त्री-पुरुषांनी आपल्या पोटीं शक्य तितकी संतति निर्माण होण्याची इच्छा करावी, असाच शास्त्रकारांचा अभिप्राय होता.
 परंतु शास्त्रकारांचा अभिप्राय त्या प्रकारचा होता म्हणून आजही बहुप्रसवितेचाच उपदेश स्त्री-पुरुषांना करणे हितकारक होईल किंवा काय ? शास्त्रकारांच्या काळांतील परिस्थिति आणि आजची परिस्थिति यांत कांहीं महत्त्वाचा भेद आहे किंवा नाहीं ? भेद अस- ल्यास त्या भेदाच्या आधारावर बहुप्रसवितेच्या ऐवजीं संततिनियमना-