पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संकटाची सावली

याची कल्पना करणे फारसे अवघड नाहीं.'कपाटवक्षाः परिणद्ध- कंधरः ।' अशा शब्दांनी हिंदी लोकांचें वर्णन करण्याचा काळ पुरा लोपला याविषयीं यत्किंचितही शंका नाहीं.आजच्या तरुण स्त्री-पुरुषांचें वर्णन करावयाच्या वेळीं चरकांतून निघालेल्या उसाच्या चिपाडासारखे हातपाय, खोल गेलेले डोळे, वर आलेल्या बरगड्या असल्या शब्दप्रयोगांचीच योजना करणे भाग पडेल. यामुळे अनेक प्रसंगी असा विचार मनांत येतो, की या अधोगतीच्या उताराला लागलेलें आमचें राष्ट्र शेवटीं जाणार आहे तरी कोठें ? स्वराज्याच्या कल्पना आम्ही मनाशीं मांडतों व त्या सत्यसृष्टीत आणण्यासाठी राजकीय क्षेत्रांत तुंबळ युद्ध खेळावयास आमची तयारी आहे. पण स्वराज्य मिळविण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक राष्ट्रांतील लोकांची शरीरसंपत्ति व लढाऊ सामर्थ्य अलौकिक प्रकारचें होतें अशी साय इतिहासाची साक्ष आहे. दीड दोन शतकांपूर्वी मराठ्यांनी जें स्वराज्य- वैभव उपभोगिलें त्याचीही हीच साक्ष आहे; व आज घटकेला राज्यक्रांतीचीं साधनें बदलली आहेत, व हिंदुस्थानास स्वराज्य मिळावयाचें तें शांतताप्रधान क्रांतीनेंच मिळेल, असें क्षणभर गृहीत धरलें तरी स्वराज्यप्राप्तीनंतर स्वराज्यसंरक्षणासाठीं शारीरिक बळाची आवश्यकता उरणार नाहीं असें थोडेंच म्हणतां येईल ? शारीरिक संपत्ति हैं एक राष्ट्राच्या उन्नतीचें मुख्य साधन होय, हे लक्षांत ठेवून आपल्या देशाविषयीं विचार करूं लागल्यास हिंदुस्थान कांहीं शतकांनी नामशेष होणार कीं काय अशीही दुष्ट शंका मनांत आल्यावांचून रहाणार नाहीं.
 कोणी असें म्हणतील, कीं आपल्या देशांत मृत्युसंख्येचें प्रमाण सर्व देशांच्या प्रमाणापेक्षां अधिक दिसत असले तरी तेवढ्यानें देश नष्ट होण्याची शंका बाळगण्याइतकें घाबरून जाण्याचें मुळींच कारण नाहीं. हिंदुस्थानची प्रजा आज दुर्बल झालेली आहे व उत्तरोत्तर