पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३६ : शतपत्रे

किती एक म्हणतात की, ब्राह्मणाचे मुखी पडले की, देवाचे मुखी पडले. किती एक म्हणतात, "ते मंत्रा ब्राह्मणाधीनं" तस्मात् "ब्राह्मणो मम दैवतम्." किती एक म्हणतात की, ईश्वराचे भजन ब्राह्मणाचे भजन केल्यापोटी आहे. किती एक ईश्वराची सेवा म्हणजे उपास वगैरे ब्राह्मणांकडून करवितात. किती एक म्हणतात की, ज्याच्या पुण्याचा प्रताप आहे, त्याजपुढे देवाचा उपाय नाही. कोणी म्हणतात की, जग हाच ईश्वर आहे. दुसरे म्हणतात की, आपला जीव हाच ईश्वर आहे. तिसरे म्हणतात की, विष्णू ईश्वर आहे. चौथे म्हणतात, विष्णूस आयुष्य आहे व शिव ईश्वर आहे. आणखी म्हणतात की, संन्यास घेतल्यावाचून ईश्वर मुक्ती देत नाही. इत्यादी ईश्वराविषयी वाद आहेत. याजवरून ब्राह्मणास किती कळते, हे उघड दिसते.
 भट तर अगदीच मूर्ख; परंतु शास्त्री, पंडित, पुराणिक नीति, ज्ञान व धर्म जाणत नाहीत. मोठे नीतीविरुद्ध कर्म असले, तरी ते क्षुल्लक मानतात. आणि मोठे वाईट कर्म आहे, ते चांगले म्हणतात, त्यात काही पाप नाही, असे मानतात.
 पाचवे प्रश्नाचे उत्तर देण्याची जरुरी नाही; कारण यथार्थवादीच्याने उत्तर देववले नाही. केवळ काही ल्याहावे म्हणून लिहिले आहे. सहावे. किती एक ब्राह्मण अतिशय गर्विष्ठ आहेत. मला खचित दिसते की, इतर लोक सुधारतील आणि ब्राह्मण लोक मागे राहतील; कारण त्यांस उपदेश ठीक वाटत नाही. सर्वांस तुच्छ मानून ब्राह्मण आपणास सर्वांहून श्रेष्ठ असे समजातात. जरी त्यामध्ये काही श्रेष्ठत्व नसले तरी श्रेष्ठत्व भोगावे असे वाटते. पैसा प्राप्त झाला, म्हणजे बाजीरावाने गंगाधरशास्त्री याजला मारले त्याचा दोष मानणार नाहीत. ब्राह्मण म्हणतात की, द्रव्य खर्च केल्यास सर्व दोष दूर करून देऊ. याजमुळे ब्राह्मणांसारखे नीच लोक कोणीच नाहीत. ते सर्व गुन्हेगारांस द्रव्याने पावन करतात. प्रायश्चित्त भाडेकऱ्याप्रमाणे होते. असे जर दोष जातील तर मग ईश्वराचा न्याय कोठे राहिला ? परंतु साधारण ब्राह्मण ईश्वराचा न्याय जाणत नाहीत व दुष्ट कर्माची भीती त्यांस वाटत नाही. ते म्हणतात की, काय चिंता ? कामदाराने पैसा खाल्ला तरी तो ब्राह्मणाच्या घरी पडला, असे म्हणून लुटतात. आणि त्याची कर्मे पाहिली तर अन्नछत्रे घालितात. परंतु तेथे एकटे ब्राह्मणास मात्र सोय असते. दुसरा कोणी येऊ देत नाहीत. इतका पक्षपात करतात.
 तात्पर्य ब्राह्मण लोक हल्ली दुसरा काही व्यापार करीत नाहीत. गरीब, अज्ञानी लोकांस लुटून आपला निर्वाह करतात. तेली असला म्हणजे त्यांस सांगतात, तू आपल्या घाण्याची पूजा केलीस तर तेल फार निघेल. असे म्हणून