पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २३५

व मन शुद्ध कसे झाले ? कपाळाशी भट कटकट करितो, तेणेकरून त्याचे अंतःकरण बरे झाले काय ? व जे अर्थ समजत नाहीत, ते परमेश्वराचे वचनावर भरवसा ठेवून कसे चालतील? जर मुनसफास कानडी गोष्ट येत आहे, तर त्यापुढे मराठी कायदा ठेवला आणि त्याजवर जुलूम करून त्याजकडून पाठ करविला आणि त्यांस काही अर्थ त्यातील समजला नाही, तर तो मुनसफ त्या कायद्याप्रमाणे फैसल्ले करील काय ? तसेच हे जप करणारे भट वगैरे लोक ईश्वरास आपले बडबडीने प्रसन्न करतील काय ? निंदा खरी असेल, तर तो बोध म्हणावा; निंदा म्हणू नये, हे 'यथार्थहितवादीचे' मनात का येत नाही ?

♦ ♦


ब्राह्मणांचे ईश्वरी ज्ञान

पत्र नंबर ७२ : २६ आगष्ट १८४९

 मागील पत्रातील अवशेष मजकूर राहिला आहे, तो संक्षेपेकरून लिहितो.
 ब्राह्मणांस ईश्वराविषयी बहुत कळते, असे 'यथार्थवादी' म्हणतो. त्याचे उत्तर असे आहे की, अमुक बरे आणि अमुक वाईट, हे प्रथम ब्राह्मणास कळत नाही. लक्ष ब्राह्मणांची सभा असली व त्यांस एक प्रश्न केला तर उत्तर येणार नाही. फार कशास, कोणासही इतकाच प्रश्न करावा की, जर कांदा खाल्ला तर नीतीस वाईट आहे काय ? त्याचे उत्तर ब्राह्मण काय करतील ते पहा ! ईश्वराविषयी ब्राह्मणांचे एकमत नाही. कोणी तीन ईश्वर म्हणतात; बहुत ईश्वर म्हणतात; कोणी वेदास ईश्वर म्हणतात; कोणी २४ पदार्थांस ईश्वर म्हणतात; पुराणे तर सर्वांस ईश्वर म्हणतात. व व्याकरणी अक्षरास ईश्वर म्हणतात. याप्रमाणे अनेक भेद आहेत. ब्राह्मणांस ईश्वराविषयी खरे ज्ञान जर असते, तर जी हल्ली त्यामध्ये वेडे आहेत, ती नसती.
 कोणी म्हणतात, द्यावे तसे घ्यावे; किती एक म्हणतात, कष्टी फळ आणि तपी राज्य, म्हणजे तप केल्याविना ईश्वर फळ देत नाही. कोणी म्हणतात की, ईश्वराने देखील कृष्ण अवतारी लबाड्या वगैरे केल्या, अशी उदाहरणे दाखवितात. किती एक गोष्टी मी ब्राह्मणांचे तोंडून ऐकल्या आहेत व त्या अगदी वास्तविक विचारेकरून ईश्वराचे जे गुण दिसतात, त्यांस विरुद्ध आहेत.