पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १४९

असतील व जेव्हा लोक दूर दूर गेले आणि दोन कोश वस्ती होती, ती पन्नास कोश झाली, तेव्हा सांगून पाठविणे अवघड पडू लागले. तेव्हा मग लोकांनी लेखनविद्या काढली असेल; परंतु लेखनविद्या निघण्यापूर्वी बहुत काळ गेला असेल, आणि लेखनाचे पूर्वी हे शास्त्र व राजाने सांगितलेले नियम साधारण भाषेत व कविता -प्रबंधात स्मरण राहण्याकरिता पाठ करून ठेवीत असतील आणि जागोजाग नाना प्रकारचे नियम चालत असतील.
 असे होताना काही दिवस गुदरल्यावर मागील नियम रद्द करून दुसरे राजे झाले. त्यांनी दुसरे त्यांस जे नीट दिसले ते नियम केले असतील. असे होता होता बहुत नियम झाल्यानंतर जाति झाल्या असतील. पहिला धंदा शेतकीखेरीज दुसरा नसेल. कारण पिकविणे व खाणे हे मनुष्यास मुख्य कर्म जगण्याकरिता जरूर पाहिजे. हे जर लोक न करतील, तर जीव जगणार नाहीत व पिकवावयाचा उद्योग हाच ईश्वराने लोकांस लावून दिला असेल; कारण त्याएवढा धंदा दुसरा कोणताही नाही. परंतु पुढे असे झाले की, दोनशे चारशे लोक शेत करणार झाले. तेव्हा चारशे नांगर तयार करणे, हे एका मनुष्याचे काम झाले. तेव्हा सुतारकाम ज्याचे त्याने घरोघर करावे, त्यात सुख नाही, याजकरिता एकाने ते पत्करिले. मग तो लोकांपासून चरितार्थास दाणे घेऊन नांगर पुरवावे. असे काम करू लागला, तेव्हा तो सुतार झाला.
 पुढे इतकी पुष्कळ लाकडे रानातून तोडून आणावयास व नांगर करावयास त्यांस फावेना, म्हणून दुसरा एक मनुष्य लक्कडवाला झाला. तसेच इतके लोक घरे बांधून राहू लागले, तेव्हा गवंडी झाला व नेम व शास्त्रार्थ पुष्कळ झाले. तेव्हा ते पढून इतर लोकांस सांगावयास जरूर पडली, तेव्हा ब्राह्मण झाले. त्यांनी सर्व नेम व धर्म शिकून लोकांचे दाण्यावर उपजीविका करावी, असे ठरले. कोणी कज्जा करील तर त्याने ब्राह्मणास पुसावे व त्याने शास्त्रार्थ सांगावा असे झाले. असे होता होता लोक देशोदेशी राहिले. तेव्हा एका देशात लोक चांगले सुखी आहेत, असे पाहून दुसरे देशातले लोक गरीब होते ते इकडे येऊन त्यांस लुटावयास त्यांनी आरंभ केला. तेव्हा या देशातील लोक किती एक क्षत्रिय झाले. म्हणजे त्यांनी दुसरे उद्योग सोडून शिपाईगिरी पत्करली आणि कबूल केले की; सर्व लोकांचे आम्ही परराष्ट्रापासून पालन करू. कोणास उपद्रव लागू देणार नाही. आम्हास घरी खावयास द्यावे. ते लोकांनी कबूल केले. पुढे जो शेतकरी त्याने दाणे घेऊन बाजारात जावे ही गैरसोय पडू लागली. तेव्हा एकाने व्यापार आरंभिला. म्हणजे तो दाणे घेऊन इतरांस देऊ लागला. अशाच व्यापारावर आपले पोट भरू लागला.