पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १४५

लिहून लोकांस आपले धर्मांत आणले. या धर्माचे दोहीही धर्माशी विरुद्ध नाही. पुढे दिल्लीचे बादशहा औरंगजेब वगैरे झाले, त्यांनी त्या लोकांस उपद्रव दिला, याजमुळे त्या लोकांनी जमून आपले संरक्षणाकरिता मुलूख बळकाविला व अलीकडे रणजितसिंग वगैरे यांनी पुष्कळ मुलूख मिळविला आहे आणि स्वतंत्र राज्य केले आहे. असे शीख लोकांचे मूळ आहे. आता त्या धर्मात कोणीही जातो. त्यांस निषेध नाही.
 (४) हिंदुस्थानात कबीर म्हणून एक कवि व साधू झाला होता. त्याचे पंथात वागणारे लोकही पुष्कळ आहेत. त्यांस कबीरपंथी म्हणतात. कबीराचे मतही असेच होते की मुसलमान व हिंदू हे आपसांत धर्माचे विरुद्ध भावाने व्यर्थ भांडतात. मुख्य धर्म हाच की, कोणाचे वाईट करू नये व परमेश्वराची भक्ती करावी. लोकांस उपद्रव करीतात ते धर्म बुडवितात.
 (५) शंकराचार्य स्वामीपासून संन्याशी व गोसावी मत झाले. शंकराचार्य हे मुख्यत्वेकरून वेदान्तशास्त्राचे प्रतिपादक होते. यास्तव त्यांनी कलियुगात शास्त्राप्रमाणे संन्यास निषिद्ध असतानाही चालू केला व त्यांचे फार शिष्य होते, त्यांनी शूद्रासदेखील संन्यास देऊन गोसावी केले. संसार सोडला पाहिजे, हा त्यांचा मुख्य अभिप्राय आहे; परंतु हल्लीचे गोसावी वेदान्ताप्रमाणे किती चालतात, हे लोकांस ठाऊकच आहे.
 (६) मध्व स्वामींनी कर्नाटकात वैष्णव मत स्थापिले. तसेच वल्लभाचार्य म्हणून एक गुजराथेत होता, त्याने वैष्णव मतच परंतु एक वेगळ्या तऱ्हेचे काढिले. सांप्रत वैष्णवांचा व शैवांचा बहुत विपर्यास आहे. कर्नाटक प्रांती असे वैष्णव आहेत की, ते शैवाचे पंक्तीसदेखील जेवीत नाहीत. परंतु शैव आपल्यास स्मार्त म्हणवितात आणि वैष्णवास पाखांडी म्हणतात. वैष्णव अद्वैत- वेदान्तास मानीत नाहीत. (७) महाराष्ट्र देशात एक रामदासस्वामीचा पंथ आहे. परंतु त्याचे कोणाशी विरुद्ध नाही. तसेच तुकाराम, ज्ञानेश्वर हे साधू झाले. त्यांचे मत बहुतकरून शूद्र लोकांत चालू आहे व किती एक ब्राह्मणही त्यात आहेत; परंतु विद्वान ब्राह्मण बहुधा त्यात नसतात. याचेही मत साधूपणाचे आहे. यांचे शत्रुत्व कोणाशी नाही. हे मत हल्ली दोनशे वर्षांपासून चालू आहे. यांचे मुख्य मत असे आहे की, नीतीचे आचरण, सारासार विचार आणि कीर्तन करावे.
 (८) बंगाल्यात एक चैतन्य म्हणून मनुष्य होता. त्याचे मत बहिरागी लोक धरितात. व चैतन्याचे मताचे लोक सांप्रत पुष्कळ आहेत, ते गोसावी यासारखेच आहेत.