पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४४ : शतपत्रे

मान्य नाही. त्या लोकांस सांप्रत जे आपणांस हिंदू लोक म्हणवितात त्यांनी जिंकले आहे. पूर्वी हिंदू लोक हे पंजाबकडून आले व त्यांनी उत्तरेस अंमल बसविला, आणि देशाचे नाव पुण्यभूमी असे ठेविले. महाराष्ट्र व कर्नाटक हे देश हिंदुस्थानचे राजाकडे बहुत काळ नव्हते. तेथील लोकांस ते घडशी, राक्षस व रावणाचे सेवक असे म्हणत होते. पुढे हिंदू लोकांनी जिंकीत जिंकीत सर्व देश जिंकला. तेव्हा ते मूळचे लोक डोंगरात व रानात जाऊन राहिले. ते अद्यापि तेथेच राहतात. असे या लोकांचे मूळ आहे.
 आता किती एक स्वदेशीय लोक असून, ते नाना प्रकारचे पंथास लागले आहेत. त्याविषयी थोडासा इतिहास लिहितो. तेणेकरून हिंदू धर्म प्रमुख असता, त्यापासून दुसरे पंथ कसकसे निघाले आहेत, त्यांची गोष्ट समजेल.
 (१) हिंदू लोकांचे येण्यापूर्वी हिंदुस्थानात कोणता धर्म असेल तो असो. हल्ली जे या देशात राहणारे लोक, यांचा मुख्य धर्म वेदशास्त्राचे आधारे करून आहे व त्यासी विपरीत एक बुद्ध धर्म म्हणून आहे. गयेस एक पंडित झाला. त्याने हा धर्म स्थापिला आहे. तो पंडितच बौद्ध अवतार. त्याचे ठिकाण अद्यापि गयेस आहे. त्याचा धर्म वेदांशी विरुद्ध आहे, यास्तव ब्राह्मणांनी महाप्रयत्न करून तो बुडविला. तत्रापि बंगाल्याचे पलीकडे व ब्रह्मदेशांत तो अद्यापि चालत आहे. लंकेतही तोच धर्म चालतो, पण त्यात काही काही फरक आहेत. तथापि मूळ एकच. (२) त्यानंतर दुसरा जैन पंथ. हा धर्म देशांत आहे, व याचे धर्माधिकारी स्वामी जागोजाग आहेत. हे मत काही वर्षांपूर्वी फार चालले होते. परंतु कुमारिल भटाने बहुतकरून ते मोडिले व त्या मताचे लोकांनी ग्रंथ केले होते, तेही बुडविले. एक अमरकोश मात्र ठेविला आहे. जैनांचे मत असे आहे की, ही सृष्टी अविनाशी आहे. यज्ञ व श्राद्धादि करणे जरूर नाही. अद्यापि त्यांचे मत जागोजाग चालत आहे. (३) नानक व गुरू गोविंद हे पंजाबचे मुलखात झाले. त्यांनी आपण स्वतः ग्रंथ लिहून एक नवीन धर्म चालू केला. त्यात जैनमताचे लोक, मुसलमान व हिंदू या जातीचे लोक आहेत. त्यांचे नाव शीख म्हणजे शिष्यार्थी शब्द आहे. नानक याचे जन्मास दोनशेपन्नास वर्षे झाली. तो पहिल्याने हिंदू होता. नंतर मुसलमान होऊन मक्केस गेला व संन्यासी बहिरागी यांचे मेळ्यात फिरला. नंतर त्याने आपणांस ईश्वराची अशी आज्ञा झाल्याचे प्रगट केले की, यवन व हिंदू हे मूर्खपणाने उगीच भांडतात. ईश्वर एकच आहे. त्यांस सर्वांनी भजावे व परस्पर कलह मोडून उत्तम धर्म लोकांस शिकवावा. याप्रमाणे त्याने ग्रंथ