Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिस्थिती मला अशीच दिसते. सरकार नावाची गोष्ट कुठं राहिलेली नाही. नेहरू व्यवस्थेमध्ये जे नियोजन झालं ते सगळं असफल झालं. आता नवीन व्यवस्थेकडे, खुल्या व्यवस्थेकडे गेलं पाहिजे असं सरकार स्वतः जाहीर करत आहे.
 परंतु शेतकऱ्यांवरचे अन्याय मात्र चालू आहेत. खुलेपणात जे काही स्वातंत्र्य मिळायचं त्यात शेतकऱ्याला काही नाही. महाराष्ट्रात परिस्थिती अशी की शेजारच्या राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोळाशे ते अठराशे रुपये क्विंटल भाव मिळत असला तर आमच्या शेतकऱ्यांना अकराशे पन्नास रुपयांवरच समाधान मानायला पाहिजे आणि त्यातूनसुद्धा तीन टक्क्यांची कपात होणार. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांत नऊ-दहा टक्के शर्करांशाच्या उसाला किमान भाव सहाशे वीस रुपये प्रत्येक टनाला मिळतो आणि महाराष्ट्रातल्या बारा साडेबारा टक्के शर्करांशाच्या उसाला जास्तीत जास्त भाव पाचशे पंचवीस रुपये आहे. हे सरकार उरलं आहे ते शेतकऱ्यांवर फक्त अन्याय करण्यापुरतंच उरलं आहे, बाकी सरकार नावाची गोष्टच शिल्लक नाही. बाहेरच्या देशातून स्फोटकं येतात, किनाऱ्यावर उतरतात, सरकार थांबवू शकत तर नाहीच पण सरकारचे अधिकारी मोटारसायकलवर बसून त्या स्फोटकांना सहारा देत पुढे जातात. दाऊद इब्राहीमचे लोक फिरतात त्यांना सरकार काही करू शकत नाही, जाती आणि धर्मांमध्ये दंगे लावन देणारे खुले आम फिरताहेत त्यांना पकडण्याची सरकारची हिम्मत नाही. सरकारची हिम्मत आणि ताकद आहे फक्त शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवण्याची. सरकार राहिलेलं नाही, जे काही शिल्लक आहे ते फक्त शेतकऱ्यांवर अन्याय करणारं राहिलं आहे.
 आणि म्हणून बळिराज्याचं स्वागत करताना शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे हे ठरविण्याकरिता आपण अधिवेशन घेतलं. पुढील काळात आंदोलन कसं चालवायचं याचा आराखडा मी तुम्हाला सांगतो आणि शेतकरी संघटनेचा निश्चित आदेश देतो.
 बळिराज्य येत आहे, हे जे सरकार आहे ते खुर्चीवर आहे असे मानण्याची, माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो, तुम्हाला गरज नाही. या क्षणापासून तुम्ही स्वतंत्र झालेले आहात.
 सरकार बंधनं घालणारं कोण? ज्याला दाऊद इब्राहीमपासून देश वाचवता येत नाही. त्या सरकारला शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा काय अधिकार आहे? हे स्वातंत्र्य मिळवायचं कसं आणि जपायचं कसं हे आता तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. गांधीजींनी ज्या शब्दांत सांगितलं तेच शब्द पुन्हा वापरायची वेळ आली आहे. माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो, "करा किंवा मरा. याच्यापुढे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ९२