माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
२९, ३०, ३१ ऑक्टोबर १९९३ हे तीन दिवस प्रतिनिधींची चर्चा झाली. या सगळ्या प्रदेशामध्ये (मराठवाड्यामध्ये) भूकंपाची धास्ती सगळीकडे अशी आहे की अजूनही लोक घरांमध्ये भिंतीच्या आत झोपू शकत नाहीत. घराच्या बाहेर खाटा टाकून झोपतात, जमिनीवर झोपतात आणि अशाही परिस्थितीमध्ये तीन दिवस घरापासून दूर आपण इथं राहिलो, तीनही दिवस चर्चा केली आणि आता मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून पुढे राबविण्याचा कार्यक्रम जो ठरला आहे तो तुमच्यापुढे ठेवणे एवढंच माझं काम शिल्लक राहिलेलं आहे.
बारा वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलन चालू करताना, हे आंदोलन शेतकऱ्यांना एकदोन फायदे मिळावे म्हणून चालू केलेलं नाही, आंदोलन कांद्याच्या भावाचं वाटलं तरी उद्दिष्ट त्याच्यापेक्षा फार मोठं आहे, उसाला भाव मिळावा म्हणून आम्ही रस्ता अडवला, पण आम्हाला मिळवायचं आहे ते त्यापेक्षा मोठं आहे हे मी स्पष्ट केलं होतं.
ही लढाई कोणती आहे? मी असं म्हटलं की ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. पहिल्या लढाईत गोरा इंग्रज गेला आणि त्याऐवजी काळा इंग्रज आला. आता काळ्या इंग्रजालासुद्धा काढून लावण्याची ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे.
आज मला आठवण होते की १९४२ मध्ये गोवालिया टॅंकवर काँग्रेसची सभा भरली होती आणि त्यावेळी परिस्थिती अशी होती, की दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्रज सरकारचा चारही बाजूंना पराभव होत होता. कोणत्याही क्षणाला हिंदुस्थान सोडून, हिंदुस्थान शत्रूकरता मोकळं करून निघून जाण्याची इंग्रजांची तयारी झालेली होती. जपान पुढे सरकत होता. सरकार नावाची गोष्ट शिल्लक नव्हती; सरकार शिल्लक होतं ते फक्त देशातील लोकांवर अत्याचार करण्याकरिता. आज