Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. आजपर्यंत असे कारखाने जेथे जेथे निघाले आहेत तेथे तेथे फक्त चेअरमन गब्बर झाले, डायरेक्टर गब्बर झाले, शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करायची, ती माझ्या मायबहिणीची माजघरातील 'प्रक्रिया शेती' असेल, चेअरमन बनवायची प्रक्रिया नव्हे.
 व्यापारी शेती
 पुढचा कार्यक्रम व्यापारी शेतीचा. इथं मात्र आपल्याला सगळ्यांना भाग घ्यावा लागेल. शेतकऱ्याच्या घरात प्रक्रिया करून जो जो माल तयार होईल तो खपविण्याची जबाबदारी आपल्यावर येणार आहे. अगदी नजीकच्या काळामध्ये, शेतकऱ्यांनी तयार केलेला ताजा व उत्तम प्रतीचा माल ग्राहकांना इतर कुठल्याही ठिकाणांपेक्षा रास्त व कमी किमतीत मिळू शकेल अशा ५००० दुकानांची साखळी आपण महाराष्ट्रभर उभी करणार आहोत.
 निर्यात शेती
 चौथा कार्यक्रम निर्यात शेती. आपण देशाला परकीय चलनाच्या संकटातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निर्यात ओघानेच आली. मग आधीचे तीन कार्यक्रम कशासाठी? आपला मूळ पाया पक्का असल्याखेरीज आपण निर्यात करायला गेलो तर टिकाव धरू शकणार नाही. आपण आता छोटे शेतकरी राहणार नाही, तर आपण आता आंतरराष्ट्रीय शेतकरी बनत आहोत. काही योजना तयार आहेत. माझा असा विश्वास आहे की येत्या दहा वर्षात आपण आपल्या एकूण उत्पादित मालापैकी १० टक्के मालाची निर्यात करू शकू आणि देशाला परकीय चलनाच्या संकटातून सोडवू शकू.
 शासनाला इशारा
 शेतकरी आता जागा झाला आहे. त्याने स्वीकारलेल्या - 'राष्ट्रीय कृषिनीती'ला अनुसरून सीता शेती, माजघरातील शेती, व्यापारी शेती आणि निर्यात शेती या चार प्रकारांनी आपला व्यवसाय चालविणार आहे. दिल्लीच्या खुर्चीवर बसलेले सरकार गुळाचा गणपती असला तरी शेतकऱ्यांच्या या प्रयत्नात अडथळे आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. कापूस, ऊस, दूध यांच्याबाबत हे सरकार जे निर्णय घेते आहे त्यावरून ही शक्यता अगदीच नाकारण्यासारखी नाही. त्यामुळे त्याबाबतीतही आपण सावध असले पाहिजे. आता आम्ही सरकारवर अवलंबून न राहता स्वतंत्र शेती, चौफेर शेती करायला लागलो आहोत. त्यातही जर सरकारने अडथळे आणण्याची वळवळ केली तर आपली आंदोलनाची ताकद त्यांना दाखवून देऊ. किसान समन्वय समितीच्या बैठकीतसुद्धा असा निर्णय झाला आहे, की सरकारने जर का शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांत अडथळे आणले तर

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ६७