Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आता शिल्लकच उरलं नाही असं समजून आता आपल्याला शेती करावयाची आहे. ही शेती चार प्रकारची असेल. सीता शेती, माजघरातील शेती, व्यापारी शेती आणि निर्यात शेती.
 सीता शेती
  सीताशेती म्हणजे सीतेच्या काळात जशी शेती करीत त्याधर्तीवर शेती करणे. आजपर्यंत परकीय चलन खर्च करून जी वरखतं - युरिया, सल्फेटसारखी आणि औषधं वापरली जात होती ती वापरणे बंद करा. ती वापरून आजपर्यंत आपण खूप पिकवलं. जिथं पाच क्विटल निघत होतं, तिथं २५ क्विटल काढलं; पण सोन्याची कौलं काही आपल्या घरांवर चढली नाहीत, 'दिल्ली'ला मात्र ४० मजली इमारती उभ्या राहिल्या. रासायनिक खतांचा बिल्कुल वापर न करता शेतातल्या शेतात तयार होणाऱ्या जैविक पदार्थाचाच वापर करून शेती करणे म्हणजे सीता शेती. माझ्या मायबहिणी सीताशेतीचा आदर्श घालून देण्यात मागे राहणार नाहीत. आपल्या शेतकरी महिला आघाडीच्या लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमामुळे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जवळजवळ एक लाख महिलांच्या नावाने शेतजमीन झाली आहे. सीतेला जे भाग्य लाभले नाही ते त्यांना लाभत आहे आणि येत्या काही वर्षांत महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेच्या नावाने जमिनीचा लहानसा तुकडा का होईना, झालेला असेल अशी काळजी शेतकरी संघटना घेईल. आपल्या नावे जी जमीन झाली आहे त्या जमिनीवर रासायनिक खतांच्या वापराशिवाय शेती करायची सुरुवात मायबहिणी करतील.
 माजघरातील शेती
 दुसरा कार्यक्रम, माजघरातील शेती. यातसुद्धा मायबहिणीचा वाटा अधिक असेल. आपल्या शेतात तयार झालेला जो काही माल असेल, मग ती ज्वारी, बाजरी का असेना, तो पोत्यातून बाजारात गेला की त्या पोत्याबरोबर घरातील लक्ष्मीही बाहेर जाते. बाजारात जाण्याआधी, आपल्या शेतात तयार झालेल्या मालाला घरच्या लक्ष्मीचा हात लागला पाहिजे. सगळ्यांनाच त्यापासून पक्का माल तयार करता येईल असे नाही पण माला पोत्यातून पाठविण्याऐवजी तो घरच्याघरी निवडून स्वच्छ करून २ किलोच्या, ५ किलोच्या पिशव्यांत भरून बाराजात पाठविण्याची व्यवस्था केली तरीसुद्धा लक्ष्मी तुमच्या घरी राहणार आहे.
 पण त्याहीपलीकडे आपल्या शेतीतील मालावर काही प्रक्रिया करूनच तो माल यापुढे बाराजात पाठविण्याची व्यवस्था करावी लागेल. प्रक्रिया करायची म्हणजे काही साखर कारखाने, सूतगिरण्या यांसारखे अवाढव्य कारखाने काढायचे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ६६