Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्था केली होती, त्यांनी आपले नावही त्यावेळी सांगितले नव्हते, ते आज इथे मंचावर बसलेले आहेत. शेतकरी संघटनेच्या संन्याशाच्या वैभवाची आजही चर्चा होत असताना ते इथे उपस्थित असणे हा योगायोगच आहे.
 तुकारामजींनी आपला दौरा करताना एक नवीन पद्धत काढली. बाहेर जेवणे नाही; शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमाला जे कार्यकर्ते येतील त्यांनी आपापल्या घरची शिदोरी बांधून आणायची आणि ती बांधून आणताना अध्यक्ष आणि त्यांच्या सोबतचे एक-दोन कार्यकर्ते यांच्याकरिता अर्धा चतकोर भाकरी जास्त आणली तर त्यात त्यांचंसुद्धा पोट निघतं. मी शेतकरी संघटनेला हा नवा प्रकार दाखविल्याबद्दल तुकारामजींना वंदन करतो आणि जरी आम्ही राज्यपालांच्या मिरजेमधील राजभवनात उतरलो असलो तरी आम्हीही बाहेर जेवायला जाणे बंद केले आहे आणि तानाजीरावांच्या घरून आलेल्या डब्यातीलच जेवण करून आलो आहोत.
 आणि शेतकरी संघटनेला जर आंदोलनात पुढे न्यायचे आहे तर घर सावकाराने वेढले आहे अशा अवस्थेतील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करता करता शेतकरी संघटनाच कर्जात बुडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
 त्यामुळे, आज मी अध्यक्षांच्या प्रेरणेने निर्णय घेतला आहे की यापुढे मी जेव्हा जेव्हा कार्यकर्त्यांकडे सभेकरिता किंवा बैठकीकरिता जाणार आहे तेव्हा मी एक फडके समोर पसरणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांनी मागे वळून बाहेर न जाता माझ्यासमोर येऊन त्या फडक्यावर यथाशक्ती - अगदी कितीही कमी असली तरी - रक्कम टाकून जावे. औरंगाबाद येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत आपण निर्णय घेतलाच आहे की यापुढे शेतकरी संघटनेच्या कोणत्याही कार्यक्रमांत हारतुरे, शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्याचे कार्यक्रम करायचे नाही. ज्या कोणाला अशा प्रकारे खर्च करण्याची इच्छा असेल त्यांनी ती रक्कम मी जे फडके समोर पसरलेले असेल त्यावर टाकावी. ही सर्व रक्कम लगेच मोजून ती त्या त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांच्या हाती जिल्ह्याच्या खर्चासाठी सोपवली जाईल. हेच माझं 'संन्याश्याचं वैभव' आहे आणि त्यातूनच शेतकरी संघटना भरभराटीस येणार आहे.
 कर्जमुक्ती विरुद्ध कर्जमाफी
 ज्या कोणाला शेतकरी संघटनेपासून फुटताना त्यांनी शरद जोशींना नावं ठेवावी, शरद जोशींनी आमचे पंख छाटले म्हणावे, शरद जोशींनी आम्हाला मोठं होऊ दिलं नाही म्हणावं असं नेहमीच घडतं. असं कोणी म्हणू लागलं की वेगवेगळ्या पक्षांचे ठराविक जातीचे लोक पुढे येतात आणि असं म्हणणाऱ्यांच्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २६९