Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गावी गेलो तर काही नाही तरी राहण्याचा, जेवणखाण्याचा-भाजीभाकरीचा तरी खर्च होतो. ही तक्रार मी अध्यक्ष म्हणून कोणापुढे सांगू? सर्व जिल्ह्यांतील सगळ्याच कार्यकर्त्यांची हीच तक्रार आहे की पंचवीस तीस वर्षे संघटनेच्या चळवळीत आम्ही काम केले, घरातले पैसे घेऊन बाहेर आंदोलने केली. घरामध्ये कच्च्याबच्च्यांना खायला आहे किंवा नाही याचीसुद्धा चिंता केली नाही; पण आता आम्ही खरेच थकलो आहोत. यापुढे जर का तुम्ही आंदोलनाचा आदेश दिला तर त्याकरिता लागणारी शिदोरीसुद्धा कोठून जमवावी असा आमच्यापुढे प्रश्न आहे." अत्यंत प्रामाणिकपणे तुकारामजींनी हा प्रश्न माझ्यापुढे ठेवला. रात्रभर मला झोप आली नाही. शेतकरी संघटनेचा खर्च चालवावा कसा, आंदोलन चालवावे कसे, जे शेतकरी आंदोलनात येतात, तुरुंगात जातात त्यांच्याकरिता वकिलांची फी कोठून भरावी, त्यांना जामीन देऊन सोडवायचे झाले तर जामीनदार कोठून आणावे, संघटनेचा निदान पत्रव्यवहार चालवण्याकरिता लागणारा खर्च कसा भागवावा ही चिंता मला गेली पंचवीस वर्षे खाते आहे. मी तुकारामजींना त्यावेळी म्हटलं की महाराष्ट्राची ही परंपरा आहे. पुण्यातील पेशवाईचे घोडे अटकेपार गेले. पण पेशव्यांचा पराभव झाला तो पुण्यातील सावकारांनी केला, पेशव्यांना कर्जे फेडता आली नाहीत म्हणून पेशवाई बुडाली. शेतकरी संघटनेचेही असेच होते की काय याची मला चिंता पडली आहे.
 आणि आज पहाटे पहाटे माझ्या मनामध्ये साक्षात्कार घडल्यासारखा एक उत्स्फूर्त विचार आला. तुकारामजींनी विदर्भ मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी नवीन पद्धत काढली. कोणे एकेकाळी शेतकरी संघटनेला एक प्रकारचा आजार झाला. त्याला शेतकरी कार्यकर्ते 'रेस्ट हाऊस' आजार म्हणायचे - नेते कोठेही गेले म्हणजे त्यांनी सर्किट हाऊस किंवा रेस्ट हाऊसमध्येच उतरायचे. मग जेवणाची सोयसुद्धा त्याला साजेशी झाली पाहिजे. त्यामुळे शेतकरी संघटनेमध्ये एका वेगळ्या संस्कृतीची वाढ होत होती. सुरुवातीला 'माणूस' साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांनी शेतकरी संघटनेच्या वैभवाला 'संन्याशाचे वैभव' म्हटले होते. 'रेस्ट हाऊस' आजारामुळे 'संन्याशाच्या वैभवा'चे बिरुद जाते की काय असे वाटायला लागले होते. तुकारामजींनी यातून सुटण्याचा एक वेगळा मार्ग आपल्याला दाखवला. त्यांनी तो शब्दात सांगितला नाही हा त्यांचा विनय आहे. त्यांनी बसने किंवा आगगाडीने प्रवास करून आपला दौरा चालू ठेवला आहे. आजचा योग तसा चांगला आहे. आज संघटनेच्या सुरुवातीच्या वैभवाची आठवण झाली. कारण मी एकदा निपाणीहून अंबाजोगाईला जात असताना जयसिंगपूर येथे आलो. तिथून अंबाजोगाईच्या प्रवासासाठी माझ्या खर्चाची ज्यांनी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २६८