Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाजारपेठेत चोवीस ताससुद्धा टिकू शकणार नाहीत. आम्ही या अधिवेशनात असे ठरवीत आहोत की आम्हाला अशा तऱ्हेची व्यवस्था उभी करायची आहे की जिच्यामध्ये कंपन्यांची कार्यक्षमता असेल आणि सहकारी व्यवस्थेतला सहभाग असेल. सरकारने आमच्या या प्रयत्नांत मध्येमध्ये आड येता कामा नये.
 सामर्थ्य आहे चळवळीचे
 शेतकरी संघटनेच्या तुम्हा सर्व पाईकांचे कौतुक आहे की देशावर जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात संकट चालून येते आहे अशी भीती समोर दिसताच देशाच्या पंतप्रधानांनी, मी सत्तारूढ राष्ट्रीय आघाडीशी कोणत्याही स्वरूपात संबंधित नसताना, किंबहुना त्यांच्याविरोधात लढलो असतानाही, देशापुढील संकटाच्या निवारणासाठी मदतीकरिता मला हाक मारली आहे आणि मी तेथे गेलो आहे तो तुम्हा सर्वांच्या अनुमतीने गेलो आहे आणि मी कायम तुमच्याबरोबरच राहणार आहे. सहाव्या मजल्यावर गेल्यानंतर इंडियात सामील होणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरांसारखा मी बेइमान होणार नाही. इतके दिवस आम्ही धनुष्यबाणच पाठीवर लावून फिरत होतो, आता पाठीवरील धनुष्यबाणाच्या जोडीला मंत्रालयातील 'वेद'सुद्धा आपल्यासमोर पडले आहेत, आमच्याकडे नवीन हत्यार आले आहे. मला त्यांनी मी बुद्धिमान आहे म्हणून नाही बोलावले, मी हाक मारली की तुम्ही शेतकरी लाखोच्या संख्येने जमता या ताकदीची दखल घेऊन त्यांनी मला बोलावले आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करावे वाटले तर शेतकऱ्यांचा फक्त शेतकरी संघटनेवर विश्वास आहे हे त्यांना माहीत आहे म्हणून त्यांनी मला तेथे बोलावले. त्यामुळे तुम्ही हेही लक्षात ठेवायला हवे की माहेरचा आधार कमकुवत झाला आहे असे कळले की सासरी पोरीला चांगले वागवीत नाहीत. माझ्या शब्दाखातर लाखो लोक उठतील हे जोपर्यंत त्यांना खात्री आहे तोपर्यंतच मी जे काही म्हणतो ते ते मान्य करणार आहेत. तेव्हा आपली संघटनेची ताकद टिकवून ठेवली पाहिजे, वाढवत राहिली पाहिजे. मी तेथे गेलो आहे आता सर्व काही सुरळीत होईल असे म्हणून गाफील राहून चालणार नाही.
 चोरांच्या बंदोबस्तासाठी
 महाराष्ट्रात शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. शेतकऱ्यांच्या विहिरीवर निर्बंध घालणारे भूजल विधेयक आणण्याचा सरकारने विडा उचलला आहे, कापूस खरेदीचा एकाधिकार त्याच भ्रष्ट आणि लुटींच्या पद्धतीने चालू आहे, थकीत वीजबिलांपोटी विद्युत महामंडळाचे अधिकारी वीज कनेक्शनच तोडू लागले आहेत, त्यामुळे उभी पिके जळून जाऊ लागली आहेत, गेल्या पन्नास वर्षांत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १७८