Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकऱ्यांची आणि देशाची आर्थिक स्थिती सावरून त्यांना प्रगतीच्या मार्गावर आणण्यासाठी, अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील राष्ट्रांसाठी जसा 'मार्शल प्लॅन' आखला आणि अमलात आणला तशी एखादी योजना आखावी अशी अपेक्षा करण्यात काही गैर नाही; अशी योजना दोघांच्याही हिताची बाब ठरेल; पण ज्या सरकारचा खजिना इतका रिता झाला आहे की त्यांना त्यांच्या नोकरांचे पगार भागविणेसुद्धा शक्य होत नाही त्याच्याकडून 'मार्शल प्लॅन'ची अपेक्षा काय करणार! त्याऐवजी, आपण एक व्यावहारिक तोडगा काढला आहे. परदेशात शेतीउपयोगी अवजारे आणि साहित्य आपल्याकडील किमतीच्या तुलनेत निम्म्याहून कमी किमतीत मिळतात. हिंदुस्थानात खते जितकी महाग आहेत तितकी महाग दुसऱ्या कोणत्याही देशात नाहीत. याचे कारण यातील प्रत्येक मालावर सरकारचा कर आहे. शेतीवर तुम्ही पन्नास वर्षे सातत्याने अन्याय केला, शेतीला लुटले त्याची भरपाई करण्यासारखी तुमची आर्थिक परिस्थिती नाही, तर मग परदेशातून येणाऱ्या शेतीउपयोगी औजारे आणि साहित्य यावर फायदा कमावण्याचे बंद करा, त्यावरील सर्व आयात कर रद्द करा. ही मागणी मी वित्त मंत्रालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने ठेवणार आहे.
 ५.आम्ही ही आर्थिक लढाई लढण्यास समर्थ आहोत. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा बागुलबुवा कोणी कितीही दाखविला तरी मागे पाऊल घेण्याइतके आम्ही कमकुवत नाही. ज्या शेतकऱ्यांनी पंडित नेहरूंच्या शेतकरीविरोधी धोरणाशी लढाई केली, ज्या शेतकऱ्यांनी इंदिरा गांधींच्या शेतकरीविरोधी धोरणाशी लढाई केली, राजीव गांधींसारखा शत्रू पचवला, नरसिंहरावांसारखा शत्रू सांभाळला त्या आम्हा शेतकऱ्यांना दोनपाच कंपन्यांना तोंड देणे काहीच अवघड नाही. आम्ही पण कंपन्या काढू. आतापर्यंत, शेतकऱ्यांनी धंदा करायचा म्हणजे सहकारी संस्थाच काढाव्यात आणि शहरातील लोकांनी धंदा करायचा म्हणजे कंपनी काढायची असा भेद होता. शेतकरी कंपनी काढतो म्हणाले तर त्याला परवानगी नाही. त्यांचा आपला एकच धोशा – 'सहकार जरी अयशस्वी झाला असला तरी सहकार यशस्वी झालाच पाहिजे!' 'बिना सहकार नहीं उद्धार!' सारखे छान 'काव्य' गाऊन सहकार महर्षांनी शेतकऱ्यांना लुटले. आम्ही या सहकाराचा सुरुवातीपासूनच धिक्कार केला आहे. आज आम्ही या सांगली-मिरज अधिवेशनातून या सर्व सहकारवाल्यांना आव्हान देतो की त्यांनी बाजारपेठेत उतरून दाखवावे. शेतकऱ्यांच्या लुटीला ते इतके सोकावले आहेत की बाजारपेठेत ते एक दिवससुद्धा तगू शकणार नाहीत. सरकारच्या छत्राखाली, शेतकऱ्यांवर झोनबंदीसारखे, बिनपरतीच्या ठेवींसारखे निर्बंध लादून काम करणारी ही ऐतखाऊ माणसे जागतिक

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १७७