Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागतात हे कळले आणि मनुष्याला शेतीचा शोध लागला. हा शोध पुरुषांनी नाही, स्त्रियांनी लावला.
 सुरुवातीला जमिनीची मशागत म्हणजे काठीने जमीन उकरणे एवढेच बाया करायच्या. त्यामुळे फारसे पीक येत नसे. मग, पुरुषांनी जमीन उकरण्यासाठी नांगर आणि नांगराला बैलासारखा शक्तिशाली प्राणी जोडण्याची कला शोधून काढली. अशा तऱ्हेने जमीन नांगरली म्हणजे अमाप पीक येते याचा शोध मनुष्याला लागला; म्हणजे मनुष्याने नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावून त्याचा वापर केला आणि 'अन्नासाठी दाही दिशा' अवस्थेतून स्वतःची सुटका करून घेतली. खळ्यामध्ये धान्याची रास तयार होऊ लागली, उद्याची भ्रांत संपलीच, पण वर्षभर धान्य वापरूनसुद्धा उरू लागले. शेतीत बचत (surplus) तयार झाली.
 बचतीतून भांडवल
 मग, चौघा भावांच्या लक्षात आले की आता चौघांना अन्न तयार करण्यासाठी सगळ्यांना शेतीत कष्ट करण्याची गरज नाही. मग त्यांनी असे ठरवले की एका भावाने जंगलात जाऊन लाकडे तोडावीत आणि सगळ्यांना राहाण्यासाठी, थंडी, वारा, उन, पाऊस यांपासून सर्वांचे संरक्षण करण्यासाठी घर बांधावे. तीन भाऊ शेतीत राहिले, चौथ्याने जंगलात जाऊन लाकडे तोडून आणून घर बांधले, त्याच्या अन्नाची व्यवस्था शेतीतील तीन भावांनी केली. निसर्गातील संकटांपासून संरक्षण मिळाल्यामुळे त्यांना तोंड देण्यात खर्ची पडणाऱ्या शक्तीची बचत झाली आणि पुढच्या काळात शेतीतील पीक आणखी वाढले. मग, आणखी एक भाऊ नव्या बचतीच्या आधारे शेतीतून बाहेर पडला आणि त्याने झाडांच्या साली आणि कापसासारख्या तंतुंपासून शरीराचे एरवीही रक्षण करणारी वस्त्रे शोधून काढली.
  अशा तऱ्हेने एकदा पोटाचा प्रश्न सुटला की माणसाची प्रगती व्हायला लागते. घराची व्यवस्था झाली, कपड्यांची व्यवस्था झाली असे करता करता डोक्यावर फिरणारा पंखा, आकाशात उडणारे विमान, सर्व येणारा कॉम्प्युटर या सर्व गोष्टी होण्यामागचे मूळ कारण म्हणजे मनुष्याने अन्नासाठी 'दाही दिशा' फिरण्याचे सोडून शेती करून अन्नधान्याची रास तयार करायला सुरुवात केली हे होय. शेतीचा शोध लागला म्हणून मनुष्याची प्रगती झाली, म्हणून जगाची प्रगती झाली. म्हणजे, शेतीतच मनुष्याच्या प्रगतीचा उगम आहे.
 लुटीची व्यवस्था
 दुर्दैवाने, ही प्रक्रिया काही सातत्याने सुखांतपणे चालत राहिली नाही. शेतकऱ्याला वाटले की आता चिंताच नाही. शेतकऱ्याला वाटले की आता पीक घ्यायचे आणि प्रगती करायची, आणखी पीक घ्यायचे आणि आणखी प्रगती करायची. त्यांच्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १६७