अधिकार नाही, येथील ग्रंथ वाचायची परवानगी नाही, परदेशात काय ज्ञान आहे त्याचा तर संबंधही येऊ देत नाहीत. अशा तऱ्हेने सर्वत्र भिंती बांधलेल्या, हात बांधलेले, पाय बांधलेले अशा गुलामगिरीच्या अवस्थेत आपण होतो. इंग्रज आले, त्यांनी शाळा काढल्या. शूद्रांची, अतिशूद्रांची मुलेसुद्धा शाळेत जाऊ लागली. थोडे थांबा. ती मुले शहाणी होऊ द्या. ती शहाणी झाली की मग सगळा देश एकत्र होईल, 'एकमय' होईल. मग, आपण इंग्रजांच्या विरुद्ध 'एक राष्ट्र' म्हणून लढू शकू.' हा संदेश त्यांनी दिला. जोतिबांचे दुर्दैव असे की त्यांना 'नाना पाटील' भेटला नाही. जोतिबांची परिस्थिती राष्ट्रवाद्यांपुढे अशी झाली की पुण्याच्या म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीत त्यांना अवघी तीन मते मिळाली. जर का एका काळी जोतिबा फुले आणि नाना पाटील म्हणजे जोतिबांचा विचार आणि नाना पाटलांची धडाडी एकत्र झाले असते तर काय झाले असते या प्रश्नाचे उत्तर या पुढचा काळ देणार आहे असे आज या अधिवेशनास हजर असलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येवरून आणि त्यांच्यातील जोशावरून दिसते.
शेतीचा इतिहास
अधिवेशनाचा विषय फार मोठा आहे. हल्ली सगळ्याच पक्षसंघटना 'ऐतिहासिक' हा शब्द इतक्या वेळा नुसताच वापरतात की त्याचा अर्थच हरवून बसला आहे. आपले हे अधिवेशन ऐतिहासिक कसे ठरणार आहे?
फार वर्षांपूर्वीची म्हणजे हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट. मनुष्य जंगलात फिरत होता. जंगलात फिरता फिरता जी काही शिकार मिळेल ती खावी, जी काही कंदमुळे मिळतील ती खावी, जो काही निवारा मिळेल तेथे रात्र काढावी असे वन्य प्राण्यांसारखे जीवन मनुष्य टोळ्या करून जगत होता. संस्कृतीच्या इतिहासात याला 'अन्नचयन युग' म्हणतात.
मनुष्याला या वणवणीतून मायबहिणींनी सोडविले. पुरुषांनी शिकार करून किंवा गोळा करून आणलेल्या अन्नाचे वाटणीचे काम स्त्रियांकडे होते. याचा पुरावा जुन्या ग्रंथांमधून मिळतो. वाटणीचे काम करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीची परिस्थिती काय असते हे मायबहिणींना चांगले अनुभवायला मिळते. सगळ्यांना वाढून झाल्यानंतर जेव्हा बाईची जेवायची वेळ येते तेव्हा जे काही उरले सुरले असेल ते खाऊन कदाचित् बाईला अर्धपोटीच झोपायला लागते. अशाच अर्धपोटी झोपावे लागलेल्या आपल्या एखाद्या खापरखापर... आजीपणजीच्या लक्षात आले असावे की आपल्या आजूबाजूला जे काही गवत वाढते त्याला जे दाणे लागतात ते चावून खाल्ले तर पोट भरते. अन्नधान्याचा शोध लागला, ते अन्नधान्य जमिनीत टाकले तर त्यातून रोप उगवते आणि त्याला पुन्हा दाणे
पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१६६
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १६६