पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ८३


दिलेला नाही, माझ्या नाटकाचे प्रयोग तुम्ही यापुढे करूं नये" असें नोटिसवजा लिहिलें. तेव्हा कंपनीचे मालक ताबडतोब आले. पण त्यांच्या अेकंदर वर्तनाचा मला अितका राग आला होता की, मी त्यांना विशेष कांही न बोलूं देतां तारेंतलाच मजकूर तोंडाने सांगून परत लावून दिलें.
 (७०) पुढे 'चित्ताकर्षक' मंडळीने हें नाटक फार चांगलें बसविलें, व त्यांतील नानबा गोखले यांचें नाना फडणिसाचें काम तर अितकें अुत्तम ठरलें कीं तें काम करणारा त्यांच्या जोडीचा दुसरा मनुष्य मिळणें अशक्य आहे असे तज्ज्ञ लोकहि म्हणूं लागले. अशा रीतीने तोतयाचें बंड या नाटकाला मला नाटक मंडळी बरी मिळाली. मंडळींनाहि नाटक चांगले मिळालें व तिचें या नाटकामुळे नांव झालें. तेव्हा मजकडून आणखी कांही नाटकें लिहून घ्यावी अशी अिच्छा या कंपनीला झाली. आणि अेक नाटक पुरें लिहून होअून तें रंगभूमीवर आलें व लोकांना आवडलें, यामुळे दुसरें अेखादें नाटक लिहावे अशी मलाहि हौस अुत्पन्न झाली. त्याप्रमाणें दुसरें नाटक चंद्रगुप्त हें लिहिलें. तें लिहिण्याला कारण वास्तविक चंद्रगुप्तासंबंधाने आवड असें नसून पूर्वीपासून चाणक्यासंबंधाने मनावर गंभीर विचारांची पडलेली छाप. पूर्वी हायस्कुलांत मी मुद्राराक्षस नाटक वाचलें होतें, व त्यावरून आर्य चाणक्याच्या कर्तृत्वाविषयीं अेक प्रकारचा ठसा मनावर अुमटून राहिला होता. पण त्याच्या तामसी स्वभावाबद्दल थोडासा रागहि मनांत होता. तेव्हा त्याला मिथ्याप्रतिज्ञ करून त्याची किंचित् फजिती करावी अशी अेक कल्पना सुचून मी चंद्रगुप्ताचें कथानक हातीं घेतलें. तोतयाच्या बंडाला अैतिहासिक कथानकाचाच मुख्य आधार होता. पण माझ्या चंद्रगुप्त नाटकाला अितिहासाचा खरा आधार नसून, कथानक अगदी कपोलकल्पित असें रचलेलें आहे. मात्र वॉल्टर स्कॉटच्या वुडस्टॉक नामक कादंबरींत राजपुत्र चार्लस् याच्या चरित्राचें वर्णन फार वर्षांपूर्वी वाचलें होतें, त्याचा या ठिकाणीं किचित् अुपयोग केला. " दैवहत राजपुत्र स्त्रीवेषाने अेका राजनिष्ठ कुटुंबाच्या संरक्षणांत राहून त्याने शत्रूपासून आपला बचाव करून घेतला " ही चंद्रगुप्त नाटकांतील मूळ कल्पना होय. पण याच्याच अनुषंगाने, ' यच्चयावत् सर्व नन्दवंशीन्यांचा मी संहार करीन' अशी प्रतिज्ञा चाणक्याकडून करवून तीच पुढे