शंकरराव गायकवाड, देवळणकर, खळदकर ही नावे अत्यंत प्रसिद्ध आहेत. व्हायोलिन- वादनात गजाननराव जोशी, व्ही. जी. जोग, श्रीधर पार्सेकर ही नावे सर्वश्रुत आहेत. श्रीधर पार्सेकर हे परशुरामबुबा पार्सेकर, गजाननराव जोशी व नत्थन खां यांच्या जवळ व्हायोलिन (फिड्ल) शिकले. 'स्वरनिनाद' हे त्यांचे व्हायोलिनवादनावरचे पुस्तक फार सुंदर आहे. श्रीधर पार्सेकर यांचे बंधू सहदेव हेसुद्धा उत्तम फिड्लवादक आहेत. सिनेमा क्षेत्रात फिड्लवादक म्हणून यांनी चांगली कीतीं मिळविली आहे.
आता पखवाज आणि तबला या वाद्यांच्या वादनात जे कलाकार निष्णात झाले त्यांची माहिती घेऊन वाद्यसंगीताचे वर्णन पुरे करू.
नानासाहेब पानसे पखवाजवादक म्हणून फार प्रसिद्ध होते. काशीला ज्योतिसिंग नावाच्या एका कलाकाराकडून हे ती विद्या शिकले आणि जन्मभर तिचा अभ्यास करून ती त्यांनी पूर्णतेस नेली. इंदूर दरबारात त्यांना नोकरी होती. पण त्यांचे शिष्य सर्व महाराष्ट्रभर पसरले आहेत. ते स्वतःही महाराष्ट्रात मिरज, पुणे येथे येऊन आपल्या कलेचे वैभव दाखवून गेले आहेत. त्यांचे चिरंजीव बळवंतराव पानसे हेही वडिलांप्रमाणे विख्यात पखवाजवादक होते. नानासाहेब पानसे हे तबलावादनातही निष्णात होते. वामनराव चांदवडकर यांना तबल्याचा बाज त्यांनीच शिकविला. वामनरावांचा हात फार मुलायम, वाजविणे मधुर व नियमबद्ध असे. पानशांच्या शिष्यांत यांच्याइतका प्रवीण दुसरा कोणी झाला नाही, असे म्हणतात. मिरजेचे दत्तोपंत पटवर्धन यांना तबलावादन यांनीच शिकविले. मन्याबा कोडीतकर हे सातारा जिल्ह्यातील कोडीत गावचे राहणारे. ते जातीने गुरव होते. पखवाजवादन ते आपल्या वडिलांजवळ शिकले. प्रसिद्ध हरिदास त्र्यंबकबुवा नाशिककर यांच्या पाठीमागे मन्याबा कीर्तनात पखवाज वाजवीत असत. सखाराम गुरव हे प्रथम इंदुरास व नंतर बऱ्हाणपुरास राहत असत. हे नाना पानशांचे शिष्य. त्यांनी स्वतःही अनेक शिष्य तयार केले होते.
गोमंतक समाजातील काही स्त्रियांचा नृत्य-गायन हा पेशाच होता. अशा घराण्यातील स्त्रियांना साथ करण्याचे काम त्यांच्या नात्यातील पुरुषांना करावे लागे. त्यातून अनेक तबलावादक उदयास आले. लक्ष्मणराव ऊर्फ खापरूमामा पर्वतकर हे अशांपैकीच तबलजी होत. त्यांना अल्लादिया खांनी लयभास्कर अशी पदवी दिली होती. दत्ताराम नांदोडकर हे सर्व महाराष्ट्रात तबलजी म्हणून गाजले. हे काही काल गंधर्व कंपनीत होते. भास्करबुवा व ताराबाई शिरोडकर यांना साथ करण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. विठ्ठल मालपेकर हे प्रथम नर्तक म्हणून प्रसिद्धीस आले. पण पुढे ते तबल्यात प्रवीण झाले आणि नृत्याला उत्तम साथ करू लागले. सुब्रावजी अंकोलेकर यांचा या काळात महान तबलजी म्हणून लौकिक होता. मुन्ने खां यांच्याकडे त्यांचे शिक्षण झाले. यांनी स्वतःही अनेक शिष्य तयार केले आहेत. कामुराव मंगेशकर हे तबलजी म्हणून भारतभर गाजले. अनेक नामांकित गवयांना साथ करून त्यांनी नाव मिळविले. अनेक संस्थानिक व राजे महाराजांनी त्यांना सुवर्णपदके व प्रशंसापत्रके
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८२५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९९
महाराष्ट्रीयांची कलोपासना