Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३.
मरहट्ट सम्राट सातवाहन
 



स्वतंत्र राजसत्ता
 महाराष्ट्री भाषेमुळे आपल्या समाजाला पृथगात्मता आली आणि या भाषेचा व या भूमीचा लोकांत अभिमान निर्माण होऊन त्याला अस्मिता प्राप्त झाली हे गेल्या दोन प्रकरणांत आपण पाहिले. आता या पृथगात्म झालेल्या महाराष्ट्रभूमीच्या राजसत्तेचा विचार करावयाचा. भाषेमुळे पृथगात्म झालेला समाज आपली स्वतंत्र अशी राजसत्ता निर्माण करू शकला नाही तर त्याच्या अस्मितेला स्थिरता येत नाही व त्याच्या संस्कृतीची, धर्माची, साहित्य, कला, शास्त्रे यांची जोपासना होऊ शकत नाही. मनुष्याला देह, मन, बुद्धी, प्रज्ञा सर्व प्राप्त होऊनही त्याची प्राणशक्ती जिवंत नसेल तर वरील सर्व संपदा असून नसल्यासारखीच होते. स्वतंत्र राजसत्तेचे राष्ट्रीय जीवनात असेच महत्त्व आहे. प्राणशक्ती देहाचे सर्व अवयव संघटित व सूत्रबद्ध करते आणि यामुळेच मन, बुद्धी, प्रज्ञा यांच्या सर्व व्यापारांना एकात्मता प्राप्त होते. त्याप्रमाणे राजसत्ता समाजाला संघटित व शासनबद्ध करून त्याच्या सर्व घटकांच्या भिन्न भिन्न व्यापारांना एकात्म, एकरस बनविते व अशी सत्ता दीर्घकाळ टिकली तरच त्या समाजाची पृथगात्मता जगन्मान्य होते व त्याच्या स्वतंत्र संस्कृतीला चिरंजीवित्व लाभते. दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका - युनायटेड स्टेटस् – यांची तुलना येथे उद्बोधक होईल. दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिना, पेरू, ब्राझील, चिली, इ. अनेक देशांची अनेक