संस्कृत ही या काळात सर्वसुलभ नव्हती, अध्यापनासाठी प्राकृत व देशी भाषा यांची गरज होती. यावरून लोकात प्राकृत व देशी याच प्रचलित होत्या हे स्पष्ट दिसते. महाभारतातही-
नाना चर्मभिराच्छन्ना, नाना भाषाश्च भारत ।
कुशला देशभाषासु जल्पन्तोऽन्योन्यमीश्वराः ॥
नाना वर्णाचे, अनेक भाषा बोलणारे, देशी भाषांमध्ये प्रवीण असे अनेक राजे एकमेकांशी बोलतात, असे वर्णन आले आहे. यावरून प्राकृताच्या लोकप्रियतेविषयी शंका राहात नाही.
इ. सनाच्या पाचव्यासहाव्या शतकात मागधी, महाराष्ट्री या भाषांचेही रूप बदलू लागले व त्यांचे अपभ्रंश त्या त्या प्रदेशात रूढ होऊ लागले, हे मागे सांगितलेच आहे. ते रूढ झाल्यावर लोकांना त्यांचाही असाच अभिमान वाटू लागला. महाराष्ट्री अपभ्रंशाला देशी हे नाव त्या वेळी रूढ होते व तेच पुढे प्रारंभीच्या मराठी कवींनी मराठीला लावले हे, डॉ. कोलते यांच्या आधारे, मागल्या प्रकरणी सांगितलेच आहे. त्या अपभ्रंश-देशी-भाषेचा अभिमान साहित्यात कसा दिसून येतो ते पुढील उताऱ्यावरून कळून येईल.
वायरणु देशी सद्दत्थगाढ | छंदालंकारविसाल पोढ ॥
देशीभाषेत व्याकरण आहे, गाढ शब्दार्थ आहे, ती छंदालंकारांनी संपन्न आहे आणि प्रौढ आहे. (पासणाह चरिऊ- पद्मदेव ).
सक्कअवाणी बहुअ न भावइ | पाऊनरसको मम्म व पावइ ।
देसिल वअना सब जन मिट्टा । तै तैसन जापओ अवहट्टा ॥
या श्लोकाच्या उत्तरार्धात, देशी वचने सर्व लोकांना गोड वाटतात म्हणून त्याच अपभ्रंशात (अवहट्टा) मी रचना करतो, असे कवीने म्हटले आहे. (कीर्तिलता-विद्यापती ठक्कुर ). [ विक्रमस्मृती, मराठीचे माहेर - डॉ. कोलते यांनी दिलेले उत्तर. ]
नद्या, डोंगर, समुद्र यांनी किंवा भाषेमुळे प्रदेश जरी पृथक झाला तरी तेवढ्यामुळे त्याला भिन्न अस्मिता आली असे होत नाही. त्या पृथकपणाची जाणीव तेथील समाजाला झाली, आपण भिन्न आहो, इतरांहून गुणसंपदेने श्रेष्ठ आहो, ही अहंता त्याच्या ठायी उद्भवली, आणि या अहंतेमुळे श्रेष्ठ कर्तृत्व तो प्रकट करू लागला म्हणजे मगच त्याच्या भूमीला अस्मिता प्राप्त झाली असे म्हणणे युक्त ठरते. महाराष्ट्र भूमीला इ. पू. दुसऱ्या शतकापासूनच ती कशी प्राप्त होत होती, ही भूमी, तिची भाषा व येथल्या लोकांची गुणसंपदा यांचा अभिमान तेव्हापासूनच येथे कसा फुलत होता आणि इतरांनाही तो कसा सार्थ वाटत होता, हे येथवर आपण पाहिले. आता या अस्मितेचे सातत्य ज्या राजसत्तेमुळे टिकून राहते तिचा विचार करावयाचा आहे.