आणि लोकही अभिमानाने तसे म्हणत असत. 'मराठा तितुका मेळवावा' हे तत्त्व समर्थांनी याच अर्थाने सांगितले होते. यामुळे सर्व महाराष्ट्रभर आपण मराठे आहो, ही एक नवीन अस्मिता निर्माण झाली आणि अल्पावधीत हे लोक पराक्रम करीत सर्व हिंदुस्थानभर पसरले. घराण्याच्या राज्याऐवजी लोकांचे राज्य व्हावे असा जो शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, त्यातून हे सर्व चैतन्य निर्माण झाले होते.
दुर्दैवाने ती मूळ भावना त्यांच्या मृत्यूनंतर ढिली झाली. आणि शेवटपर्यंत आपण सर्व मराठे आहो, अशी भाषा सर्वाच्या तोंडी असली तरी, तिच्याशी निगडित असलेला आशय कोणाच्याही मनात नव्हता. त्यामुळे ते चैतन्य नष्ट झाले व मराठेशाहीचा अंत झाला.
विनाशाचे कारण
मराठेशाही कशाने बुडाली याची चर्चा न. चिं. केळकर, सरदेसाई, राजवाडे, खरेशास्त्री इत्यादी थोर इतिहास पंडितांनी केली आहे. राष्ट्रभावना नाही, शिस्त नाही, एकजूट नाही, ध्येयनिष्ठा नाही, हीच कारणे बहुतेकांनी सांगितली आहेत. त्याविषयी येथे चर्चा करण्याचा विचार नाही. कारण प्रत्येक प्रकरणात ती जागोजागी केलेलीच आहे आणि साहित्य, कला, विद्या, धर्म, अर्थ इ. संस्कृतीच्या अंगांची आणखी एकदोन लेखांत जी चर्चा करावयाची आहे तीत ते विवेचन पुनः पुन्हा येईलच. येथे फक्त तिचा सारार्थ वर दिला आहे. 'आम्ही मराठे' ही जी नवी अस्मिता शिवसमर्थांनी निर्माण केली होती, तिची जपणूक व जोपासना पुढे कोणी केली नाही, हे मराठेशाहीच्या नाशाचे प्रधान कारण आहे.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६०६
■