Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०५
मराठेशाहीचा अंत
 

इतिहास पाहिला. दुर्दैव असे की अस्त फारच शोचनीय असा आहे. बाळाजी विश्वनाथाचा वंश म्हणून बाजीरावास गादीवर आणण्याचा आग्रह सरदारांनी धरला. पण बाळाजी विश्वनाथाच्या शतांशही कर्तबगारी त्याच्या ठायी नव्हती. नानासाहेब सरदेसायांनी दोनतीन ठिकाणी लिहिले आहे की उत्तर काळात त्याला कधीही आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप झाला नाही. ती तेहतीस वर्षे त्याने अगदी ख्याली- खुशालीत घालविली.

राज्य खालसा
 मराठेशाहीचे मुख्य धनी छत्रपती. पेशवाईच्या अस्तकाळी प्रतापसिंह गादीवर होते. ते जवळ जवळ बाजीरावाच्या कैदेत होते. खडकीच्या लढाईपासून पळत सुटलेल्या बाजीरावाने त्यास आपल्याबरोबर घेतले होते. छत्रपतींच्या ठायी कर्तृत्व नव्हते, पण ती एक पुण्याई होती, हे इंग्रज जाणीत होते. त्यामुळे त्यांना पेशव्यापासून अलग करण्याचा इंग्रजांचा प्रयत्न होता. अष्टीच्या लढाईनंतर प्रतापसिंह इंग्रजांच्या स्वाधीन झाले. तेव्हा, आम्ही त्यांचे सरदार, असे म्हणविणारे अनेक लोक बाजीरावास सोडून गेले. हा इंग्रजांचा कावा ! छत्रपतींना दूर केल्यावर १८१८ च्या एप्रिलात इंग्रजांनी त्यांना सातारच्या गादीवर बसविले. त्या वेळी सर्व मराठी राज्य आपल्या ताब्यात बेईल, असे प्रतापसिंहाना वाटत होते. पण एका जिल्ह्याएवढेच राज्य इंग्रजांनी त्यांना दिले. ते १८३९ पर्यंत. त्या साली फितुरीचा आरोप ठेवून, त्यांना त्यांनी काशीस नेऊन ठेविले आणि त्यांचा भाऊ शहाजी यास गादी दिली. आणि दत्तकास परवानगी नाही, म्हणून १८४८ साली त्याचेही राज्य खालसा केले. आणि मराठेशाहीचा निखालस अंत झाला.
 मराठेशाहीचा अंत अत्यंत शोचनीय प्रकारे झाला हे खरे. सर्व मराठ्यांनी शेवटी एक जबरदस्त लढा दिला असता, आणि त्यात पराभव पावून मराठेशाहीचा शेवट झाला असता, तर तो पराभवही मराठ्यांना भूषणावह ठरला असता. पण तसे झाले नाही. स्वार्थ, विलास, दुही यांनी सर्व सरदार ग्रासलेले होते. त्यामुळे पराक्रम असा शेवटी झालाच नाही. ही मोठी लाजिरवाणी गोष्ट घडली.

इतिहासातील कार्य
 तरीही मराठे व मराठेशाही हे नाव भारताच्या इतिहासात अमर होऊन राहिले आहे, हेही खरेच आहे. आणि त्याचे कारण म्हणजे शिवछत्रपतींनी केलेली क्रांती हे होय. पूर्वी महाराष्ट्रभूमीत स्वतंत्र राज्ये होती. पण ती सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव अशा घराण्यांची होती. त्यांतील अनेक राजे थोर होते, पराक्रमी होते, प्रजा- हितदक्ष होते. पण राज्य समाजाचे आहे असा भाव जनतेत त्या वेळी नव्हता. शिवछत्रपतींनी तो निर्माण केला. त्यांचे राज्य हे भोसल्यांचे नव्हते. ते महाराष्ट्र राज्य होते.