विला आणि बुंदेलखंडात रजपूत राजांनीही बराच जोर केला. पण असे असूनही निजाम, हैदर आणि रघुनाथराव यांच्या बंदोबस्तात गुंतून पडल्यामुळे माधवरावाला उत्तरेकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही.
इंग्रज
दिल्लीचा बादशहा अलाहाबादेस सुजा उद्दौल्याच्या आश्रयाने राहिला होता. आणि आपणास दिल्लीस नेऊन मसनदीवर कोण बसवितो या विवंचनेत तो होता. बंगालचा सुभेदार मीर कासीम याचा पाडाव करून इंग्रजांनी बंगाल व बिहार व्यापले होते. मीर कासीम, बादशहा व सुजा यांनी इंग्रजांवर स्वारी केली. पण १७६४ च्या ऑक्टोबरात इंग्रजांनी त्यांचा पूर्ण पराभव करून आणखी चार महिन्यांत, म्हणजे १७६५ च्या फेब्रुवारी महिन्यांत, अलाहाबादचा किल्ला घेतला आणि अलाहाबादपासून कलकत्त्यापर्यंतच्या भूप्रदेशाचे इंग्रज मालक झाले ! त्या सालच्या मे महिन्यात क्लाइव्ह इंग्लंडहून परत आला, तेव्हा एवढा मोठा घास आपणास पचणार नाही, हे ध्यानी घेऊन तो लगेच अलाहाबादेस जाऊन बादशहाला भेटला व नमते घेऊन, त्याने ऑगस्टमध्ये बंगालची दिवाणी त्याच्यापासून मिळविली. त्या वेळी आपणास दिल्लीस नेऊन मसनदीवर बसवावे असा बादशहाने इंग्रजांना आग्रह केला. पण त्यांनी ते मान्य केले नाही. कारण, दिल्लीपर्यंत जाऊन, बादशहाचे रक्षण करण्याइतकी ताकद अजून आपल्यात नाही, हे त्यांनी जाणले होते. पण निश्चित नकार दिला तर बादशहा दुसऱ्यांच्या- मराठ्यांच्या- कच्छपी जाईल ही भीती असल्यामुळे, ते दीर्घकाळपर्यंत गुळमुळीत बोलून टोलवाटोलवी करीत राहिले. केवळ एक लष्करी भरारी मारावी, असे इंग्रजांच्या मनात असते, तर ते कटकेपर्यंत सुद्धा या वेळी गेले असते. पण एवढा प्रदेश आपल्या सत्तेखाली टिकविण्याचे सामर्थ्य आणि कर्तृत्व अजून आपल्याठायी नाही, हे जाणून त्यानी सबुरी केली. आणि जे मिळविले तेथेच आपली सत्ता आणि आपला व्यापार दृढ करण्यावरच त्यांनी आपले सर्व लक्ष केंद्रित केले.
सरदारांचा उद्योग
१७६९ च्या उन्हाळ्यात माधवरावाने महादजी शिंदे, तुकोजी होळकर आणि रामचंद्र गणेश कानडे यांस उत्तर हिंदुस्थानात धाडले. बादशहाला दिल्लीला आणून मसनदीवर बसविणे हे त्यांचे पहिले कर्तव्य होते. कारण दिल्लीच्या पातशाहीचे संरक्षण हा बादशहाशी झालेल्या कराराचा मुख्य भाग होता. पण एकदम दिल्लीवर न जाता, जाट, रजपूत यांचा बंदोवस्त करून मग शेवटी ते कर्तव्य साधावे, असे या त्रिवर्गाने ठरविले आणि प्रथम उदेपूर, बुंदीकोटा या प्रदेशांत जाऊन, अनेक वर्षांच्या राहिलेल्या खंडण्या वसूल करून, त्यांनी खर्चाची तरतूद केली. आणि मग प्रथम जाटाचे पारिपत्य करावयाचे ठरविले.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५९४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५६६