Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५३४
 

नव्हता. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांचा मोठा प्रवळ सागरमेनानी होता, म्हणून हे सर्व शत्रू काही काळ दबून होते. तो जाताच मराठ्यांची ही बाजू अगदी लंगडी झाली.
 हिंदुधर्माचा नाश करावयाचा आणि हिंदूंचा विध्वंस करावयाचा है मोगलांप्रमाणेच जंजिरेकरांचे कायमचे धोरण होते. कोकणातील परशुराम क्षेत्री ब्रम्हेंद्रस्वामी यांचे कायमचे वास्तव्य असे. छत्रपती शाहू, पेशवे बाळाजी विश्वनाथ व बाजीराव त्याचे अनन्य भक्त होते. काही काळ सिद्दीही त्याचा भक्त होता. पण १७२७ साली काही कारणाने स्वामीशी त्याचे वाकडे आले आणि त्याने शिवरात्रीच्या दिवशी परशुराम क्षेत्राचा पूर्ण विध्वंस केला. तेव्हा ब्रह्मेंद्रस्वामीने शाहू छत्रपतींना सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्यास सांगितले. तेव्हापासून मराठ्यांचे सरदार कोकणात मधून मधून मोहिमा करीत होते. पण संभाजीराजे, निजाम, माळवा ही प्रकरणे हाती होती. त्यामुळे पेशव्यांना तिकडे जाता आले नाही. १७३३ साली ही प्रकरणे मिटल्यावर शाहू छत्रपतींनी जंजिऱ्याची मोहीम आखली आणि पेशवा बाजीराव याची तीवर नेमणूक केली.
 कोकणच्या या संग्रामात जंजिरा आणि वसई अशा दोन मोहिमा झाल्या. या दोहींच्या इतिहासावरून पेशवेकालीन मोहिमांची वैशिष्ट्ये स्पष्ट दिसून आली. मोहिमांची कुलमुखत्यारी जेव्हा पेशव्यांच्याकडे असे, तेव्हा ते मोठमोठे विजय मिळवीत. पण प्रतिनिधी, सेनापती, सुमंत किंवा इतर पेशव्यांचा मत्सर करणारे सरदार यांची जेव्हा एकत्र नियुक्ती शाहू छत्रपती करीत, तेव्हा मोहिमेला फारसे यश येत नसे. जंजिऱ्याच्या मोहिमेत असेच झाले. शाहू छत्रपतींनी जंजिऱ्याची मोहीम आखल्यावर दाभाडे, गायकवाड, उदाजी चव्हाण, शंभुमिंग जाधव, सचिव या सर्वांना बाजीरावांची कुमक करण्याविषयी आज्ञापत्रे लिहिली.
 प्रतिनिधी कोकणात उतरला; पण त्याने बाजीरावाची भेटही घेतली नाही आणि परस्पर रायगडावर हल्ला करून ते ठाणे हस्तगत केले. पेशव्याला भेटून त्याने हा कार्यक्रम आखावयास हवा होता. पण तो पेशव्याचा द्वेष्टा होता. त्यामुळे मोहीम प्रारंभापासूनच ढिली पडू लागली. पुढे सेखोजी आंगरे याचा सरदार बंकाजी नाईक याने सिद्दी साताचा मोड करून त्याला गोवळकोटपर्यंत मागे रेटीत नेले. आता गोवळकोट पडला असता. पण प्रतिनिधीने लढाईस मना करून वाटाघाटी सुरू केल्या आणि 'आम्ही गनीम सुखे करून घेऊ, भांडायाचे प्रयोजन नाही,' असे नाईकास बजावले. त्यामुळे नाईक परत गेला.
 दाभाडे व गायकवाड यांचे व बाजीरावाचे वाकडे असल्यामुळे त्यांनी शाहू छत्रपतींचे हुकूम मानलेच नाहीत ! सेखोजी आंगरे हा बाजीरावाची मिळून होता. पण १७३३ साली मृत्यू पावला. तेव्हा त्याचे बंधू संभाजी व मानाजी यांच्यात वैमनस्य निर्माण झाले. आणि आंगरे घराण्यातच बेबनाव निर्माण झाला. आणि ही कमजोरी पाहून इंग्रज व सिद्दी यांनी आंगऱ्यांचा संपूर्ण नाश करण्याचा डाव टाकला. यामुळे, आणि