Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३३
स्वराज्याचे साम्राज्य
 

देश बागलाण या बाजूने निजाम यांनी उठावणी करून एकमेकांस मिळावयाचे अशी मोहीम त्यांनी आखली. त्रिंबकराव दाभाडे यांनी जाहीर केले की 'आमचे धनी छत्रपती, त्यांचे राज्य बाजीरावाने घेतले ते त्यांचे त्यांस परत द्यावयास जातो.' या वेळी पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम, रघूजी कदमबांडे आणि उदाजी व आनंदराव पवार (हे बाजीरावाचे सरदार आता फितूर झाले) असे त्याच्या बरोबर होते.
 या संबंधात चिमाजी आप्पाने लिहिले आहे की 'दाभाड्यांनी कज्जा केला तर तो आम्ही संभाळतो. पण ते जर निजामास जाऊन भेटले तर त्यांचा हुद्दा परिच्छिन्न दूर करावा. एवढी गोष्ट महाराजांपाशी पक्की ठरवून मग दाभाड्यांना गुजराथच्या सनदा द्याव्या.'
 यावरून पेशवे आणि इतर सरदार यांच्या वृत्तीतला फरक स्पष्ट होईल.
 दाभाड्यांनी स्वारीच काढली, तेव्हा पेशव्यांनीही तयारी केली. सेनापतींची समजूत घालून त्यांना साताऱ्यास घेऊन यावे, असे शाहू महाराजांनी बाजीरावास सांगितले होते. त्याप्रमाणे स्वारीस निघाल्यापासून बाजीरावाने जासूदातर्फे प्रयत्न चालविले होते. पण त्रिंबकरावाला ते नकोच होते. त्यामुळे लढाई अटळ झाली. निजामाची व दाभाड्याची मिळणी होण्यापूर्वीच बाजीरावाने डभई येथे दाभाड्यांना गाठले. लढाई मोठी झाली. आणि सेनापती गोळी लागून पडले. लढाई थांबली. बाजीराव एकदम मागे सरला. त्याने लुटालूट होऊ दिली नाही. आणि तो सर्व आवराआवर करून महाराजांना जाऊन भेटला. महाराज म्हणाले, 'अविवेके करून नबाबाशी (निजामाशी) राजकारण केले. दुर्बुद्धी धरून, आगळिक करून, आपणांतच लढाई केली. त्याचे फळ झाले.'
 कर्नाटकातील मोहिमा, पालखेड येथे निजामावर मिळविलेला विजय, माळवा आणि बुंदेलखंड या प्रदेशांतील साम्राज्यविस्तार, आणि संभाजीराजे व सेनापती दाभाडे यांनी उभारलेल्या बंडखोरीचा बंदोबस्त या सर्व विजयांचे श्रेय बाजीराव, चिमाजी आणि त्यांचे राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, इ. जे एकनिष्ठ सरदार यांना आहे. मराठेशाहीला पुढे साठसत्तर वर्षे जे काही यश मिळाले त्याचा पाया यातून घातला गेला.
 यानंतरचे दोन मोठे विजय म्हणजे कोकण विजय आणि उत्तर हिंद-विजय होत. त्यांचा क्रमाने विचार करून मग मराठ्यांच्या या साम्राज्यविस्ताराच्या प्रयत्नांची गुणदोष-चिकित्सा करू.

कोकण-जंजिरा
 कोकणात पोर्तुगीज व जंजिरेकर सिद्दी हे मराठ्यांचे कायमचे शत्रू. त्यांना इंग्रजांचे आणि मोगल बादशहाचे कायमचे साह्य असे. हे कोकणचे चित्र शिवाजी महाराजांच्या वेळेपासून आपल्याला दिसत आहे. त्यात या वेळी फारसा फरक झालेला