आधीपासूनच मोगलांचे मनसबदार होते, तेही त्यांना सामील झाले. आणि सर्व शून्याकार होण्याची वेळ आली. अशा वेळी हे बुडते जहाज, नानाप्रयत्नाने त्याच्या फटी सांधून, छिद्रे बुजवून, बाळाजी विश्वनाथ, शाहू छत्रपतींचा पेशवा, याने प्रथम तरते केले, मग त्याच्यावर सर्व प्रकारचा सरंजाम भरून त्याला भक्कमपणा आणला, आणि ते पैलतीराला नेऊन स्वराज्याचे रक्षण केले.
स्वराज्याचे रूप
स्वराज्याचे रक्षण झाले हे खरे, त्याचे पुढे साम्राज्य झाले हेही खरे; पण हे स्वराज्य शिवछत्रपतींच्या स्वराज्याहून फार निराळे होते. त्याचे वैभव, त्याचे उज्ज्वल रूप याला नव्हते, आणि पुढे तसे केव्हाही आले नाही, पुढल्या शंभर वर्षात मराठ्यांनी मोठा गौरवास्पद इतिहास घडविला. पण हिंदवी स्वराज्य, अखिल भारताचे एकसंघ साम्राज्य, सर्व भरतभूवर एकछत्री सत्ता, या थोर उद्दिष्टांच्या आसपासही ते कधी येऊ शकले नाहीत. शिवसमर्थांनी शिकवलेली धर्मनिष्ठा, त्यांनी उपदेशिलेली राष्ट्रभक्ती मराठ्यांनी अंगी बाणविली असती तर ते स्वप्नही साकार झाले असते. पण या महाप्रेरणा त्यांच्याबरोबर लुप्त झाल्या. आणि वतनासक्ती, स्वार्थ, दुही, फितुरी या व्याधींनी मराठ्यांना ग्रासले. यांतून काही संघटित शक्ती निर्माण करून पेशव्यांनी मराठा राज्याचे रक्षण केले हेच जास्त. हे राज्य म्हणजेच पेशवाई. अशी ही जी पेशवाई तिचे स्वरूप आता न्याहाळावयाचे आहे.
मुक्तता
औरंगजेब मृत्यू पावला आणि त्याचा मुलगा अजमशहा याने अहमदनगर येथे तख्तावर आरोहण केले, आणि फौजफाटा, सरंजाम घेऊन तो दिल्लीकडे निघाला. जाताना शाहू राजे, मातुःश्री येसूबाई, राजांच्या स्त्रिया, आणि इतर लवाजमा यांना त्याने बरोबरच नेले. शाहू राजांना मुक्त करावे असे त्याच्या मनात नव्हते. पण नर्मदा पार झाल्यावर झुल्पिकारखानादी सरदारांनी राजांना सोडल्यास मराठ्यांच्यात दुफळी माजेल आणि पुढे मागे त्यांना जिंकणे सोपे होईल, असा विचार अजमशहाला सांगितला. तो त्याला पटून त्याने शाहू राजांना मुक्त केले. त्या वेळी मोगलांच्या ताबेदारीत राहून शाहू राजांनी राज्य करावे, आणि स्वराज्य, चौथाई, सरदेशमुखीचे हक्क त्यांनी वसूल करावे, असा उभयतांत करार झाला. पण सनदा मात्र त्या वेळी बादशहाने दिल्या नाहीत. पण मुक्तता झाली हेच पुष्कळ असे मानून राजे छावणीतून दोनशे स्वार बरोबर घेऊन निघाले व १७०७ सालच्या जून महिन्यात दक्षिणेत येऊन पोचले.
पुण्याई
शाहू राजे दक्षिणेत आले, तेव्हा येताना वाटेत आणि पुढे अहमदनगरपर्यंत,
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०५
पेशवाईचा उदय