Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२६.
पेशवाईचा उदय
 



कारणे
 मराठ्यांनी स्वातंत्र्ययुद्ध जिंकले आणि मराठ्यांच्या इतिहासाचा दुसरा कालखंड समाप्त झाला आणि थोड्याच म्हणजे पाचसहा वर्षात पेशवाई हा तिसरा कालखंड सुरू झाला. वर सांगितलेच आहे की युद्धसमाप्तीनंतर मराठ्यांच्यातील दुही संपली नाही. शाहू राजे दक्षिणेत आल्यानंतर तर ती जास्तच तीव्र झाली. पण एवढ्यावर हे भागले नाही. चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर, दमाजी थोरात, हिंदुराव घोरपडे, इ. प्रमुख मराठा सरदार कधी ताराबाईच्या तर कधी शाहूराजांच्या पक्षाला असे करीत करीत शेवटी मोगलांना जाऊन मिळाले. मोगल उत्तरेत निघून गेले तरी त्यांचे दाऊदखान, निजाम हे सुभेदार दक्षिणेत होतेच. आणि मराठा सरदारांच्यांत फूट पाडून त्यांना आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी होत होते. यामुळे १७१३-१४ च्या सुमारास एक वेळ अशी आली होती की मराठ्यांचे स्वराज्य आता राहात नाही. वरील सरदारांनी ताराबाई किंवा शाहू यांपैकी कोणाचाही पक्ष घेऊन एकजूट केली असती तर असा प्रसंग आला नसता; उलट मोगली सत्ता त्याच वेळी संतुष्टात आली असती. त्यांच्यांत केवळ दुफळी माजली असती तरी स्वराज्य नष्ट होण्याचा प्रसंग आला नसता. पण ते सरदार मोगलांनाच मिळाले. खटावकरांसारखे काही सरदार