Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४१४
 

तरीही त्यांनी जुनी वतनदारी सर्वत्र चालू ठेवली याचे कारण एकच की एवढी प्रचंड आर्थिक क्रांती करणे त्या काळी शक्य नव्हते. गाव आणि देश संभाळण्याची जी कामगिरी देशक आणि गोतसभा करीत असत ती राजसत्तेकडून करून घेण्याइतके माणूसबळ त्या वेळी निर्माण करणे दुर्घट होते. ती कामगिरी ग्रामीण भागात स्थायिक झालेल्या लोकांकडून करवून घेण्यावाचून गत्यंतरच नव्हते आणि देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी यांच्याकडून हे कार्य करून घ्यावयाचे तर त्यांना वतन देणे अवश्यच होते. मराठ्यांची वतनासक्ती इतकी प्रबळ होती की वतनाची कायमी दिल्यावाचून हे लोक ती सेवा करण्यास तयार झालेच नसते. शिवाय दुसरी गोष्ट अशी की मोगल किंवा आदिलशाही मुस्लिम सत्ताधारी मराठ्यांचा हा वतनलोभ पूर्णपणे पुरवीत होते. वतने कायम राहून शिवाय त्या राज्यांत वतनदारांना अनियंत्रित सत्ताही चालविता येत असे. मोरे, भोंसले, निंबाळकर, मोहिते, सावंत, सुर्वे इ. मोठमोठे वतनदार छत्रपतींच्या विरुद्ध उभे टाकले होते याचे कारण हेच होते. वतनासक्ती! जनमानसातून ही आसक्ती समूळ नष्ट करून या सर्वांना स्वराज्याभिमुख करणे एका आयुष्यात कोणालाच शक्य झाले नसते. नवे आर्थिक व राजकीय तत्त्वज्ञान निर्माण करून त्याची शिकवण समाजाला दिली असती तरच हे घडून आले असते. पण ते करणारे ग्रंथकार, तत्त्ववेत्ते, पश्चिम युरोपात याच काळात जसे निर्माण झाले तसे, महाराष्ट्रात किंवा भारतात त्या काळी आणि पुढेही निर्माण झाले नाहीत. मराठ्यांच्या साम्राज्यसत्तेसाठी शेकडो रामदास हवे होते, असे राजवाड्यांनी म्हटले आहे. त्याचा हाच अर्थ आहे. शिवछत्रपतींना त्यांच्यासारखेच दोन-तीन समर्थ वारस लाभले असते तरी या वतनासक्तीचा बराच बीमोड करता आला असता. पण तसा एकही वारस त्यांना लाभला नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर वतनदारीचा विषवृक्ष पहिल्या एकदोन वर्षातच पुन्हा जोरावला आणि छत्रपतींनी प्रारंभिलेली आर्थिक क्रांती समूळ करपून गेली.

बहुजन अर्थशास्त्र
 पण तरीही छत्रपतींनी जे आर्थिक धोरण प्रस्थापित केले त्याचे मराठ्यांच्या पराक्रमाच्या दृष्टीने व हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे यात शंका नाही. वतनदार वर्गाची बेजबाबदार जुलमी सत्ता त्यांनी नष्ट केली आणि देशकांचे पुनरुज्जीवन करून सर्व अर्थव्यवहार जनताभिमुख केला. शेतकरी, रयत, तिचा उत्कर्ष हे सर्व अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे हे जे तत्त्व त्यांनी मराठ्यांना शिकविले ती खरी आर्थिक क्रांती होय. राजा आपल्या कल्याणाची चिंता वाहतो ही कल्पनाच, मुस्लिम काळात, मराठी जनता विसरून गेली होती. त्यामुळे हा राजा पित्यासारखी आपल्यावर माया करतो हे दिसताच अखिल बहुतजन हर्षनिर्भर झाले. त्यांच्यांत नवे चैतन्य निर्माण झाले आणि ते स्वराज्य कार्यार्थ सिद्ध झाले.
 अर्थमूलो हि धर्मः । हे जाणून छत्रपतींनी धर्मप्रेरणेला अर्थप्रेरणेची जोड दिली.