दशकातील पहिला समास 'निःस्पृह लक्षण' याच नावाचा आहे. त्यात समर्थ परोपरीने निःस्पृहता विवरून सांगत आहेत. 'आपण आसक्त होऊ नये, केल्यावीण सांगो नये, बहुसाल मागो नये, शिष्यवर्गासी ॥' द्रव्यासाठी कीर्तन करू नये. राजद्वारीचा कार्यकर्ता होऊ नये, कोणी इनाम दिले तरी घेऊ नये. राजाच्या आधीन होणे जसे निंद्य तसे लोकाधीन होणेही निंद्यच होय. लोकांना राजी राखणे अवश्य आहे. पण ते त्यांच्या आधीन होऊन नव्हे. म्हणूनच 'आशाबद्ध बोलो नये, अभिलाष धरू नये.'
भिक्षामिसे
यासाठीच समर्थांनी भिक्षेचे कडक दण्डक घालून दिले आहेत. महंताने आपला उदरनिर्वाह भिक्षेवरच करावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. पण नियम असा की 'बहुत आणिता येक मुष्टीच फक्त घ्यावी.' भिक्षामिषाने लोकपरीक्षा करावी, परिस्थितीचे अवलोकन करावे आणि जगाचे ज्ञान करून घ्यावे, असा भिक्षा सांगण्यात समर्थांचा हेतू आहे. म्हणून बरेच दिवसांची भिक्षा एकदम जमवून ठेवणे हे महंताला वर्ज्य आहे. 'आठा दिवसां धान्य मिळविले । तरी ते कंटाळवाणे जाले । प्राणी येकायेकी चेवले । नित्यनूतनेपासूनी ॥' रोज नवीन प्रदेश, नवीन वस्ती पाहणे हे त्यात साधत नाही. म्हणून, 'कुग्रामे अथवा नगरे । पहावी घरांची घरे । भिक्षामिसे लहान थोरे | परीक्षून सोडावी ॥' भिक्षा सांगण्यात समर्थांचा असा हेतू असल्यामुळे व तिचे स्वरूप वर वर्णिल्याप्रमाणे कडक असल्यामुळे भिक्षा हे निःस्पृहतेचे लक्षण म्हणूनच त्यांनी सांगितले आहे. 'सुखरूप भिक्षा मागणे । ऐसी निःस्पृहतेची लक्षणे ॥' (दास. १४-२, १५-६)
वाग्विलास
लोकसेवा, परोपकार आणि निःस्पृह वृत्ती या गुणांप्रमाणेच महंताचा आवश्यक असलेला तिसरा गुण म्हणजे वक्तृत्व हा होय. समर्थांना नवे नेतृत्व निर्माण करावयाचे होते आणि लोकांच्या मनात दृढपणे बसलेले जुने तत्त्वज्ञान पालटून तेथे राष्ट्रधर्माचे तत्त्वज्ञान रुजवावयाचे होते. यासाठी अमोघ वक्तृत्वाचे महत्त्व किती आहे, ते सहज ध्यानात येईल. 'वाग्विलासे सकल सृष्टी वेधिली तेणे' असे त्यांनी महंताचे वर्णन केले आहे. हा वक्ता सकळांची अंतरे जाणतो, लोकांच्या मनात अनेक मतमतांतरे असतात, शंका असतात, आक्षेप असतात, त्यांना स्वानुभवाच्या व ग्रंथांच्या आधारे चोख उत्तरे देऊन तो सपाट करतो. प्रसंगमान पाहून, नेमकी भेदक वचने बोलून लोकांवर इतका प्रभाव पडतो की लोक 'नाना मार्ग सांडून त्याला शरण येती.' त्याच्या निरूपणाचा त्यांना वेध लागतो, सृष्टीमध्ये सकळ लोक त्याला धुंडीत येतात आणि या वेदसामर्थ्यामुळेच त्याला उदंड समुदाय करण्यात यश येऊन 'लोकी लोक वाढविले, तेथे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले, गुप्तरूपे' असा अधिकार
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३७२