Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७१
स्वराज्य आणि स्वधर्म
 

 समर्थ म्हणतात, 'जो परोपकार करीतचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला । मग काय उणे तयाला । भूमंडळी ॥' लोकांना आकृष्ट करण्याचा, त्यांना वेढोनि घेण्याचा लोकसेवा हाच खरा उपाय होय. यालाच पूर्वी परोपकार म्हणत. महंताने अत्यंत नम्रपणे हे व्रत आचरावे. 'सकळांसि नम्र बोलणे । मनोगत राखोनि चालणे । अखंड कोणी, येकाचे उणे । पडोचि नेदी ॥' यापुढेही जाऊन समर्थ म्हणतात, 'उदंड मुले नाना- परी । वडिलांचे मन अवघ्यावरी । तैसी अवघियांची चिंता करी । महापुरुष ॥' प्रत्येक महंत असा महापुरुष असावा. मिशनऱ्यांना फादर म्हणतात ते याच अर्थाने. समर्थांचा तोच अभिप्राय. जो आपली चिंता वाहतो, आपल्याला आसरा देतो त्याचे तत्त्वज्ञान, त्याचा धर्म खरा, अशीच लोकांची भावना असते. हे जाणूनच, या मार्गाने महाराष्ट्रधर्माचा प्रसार करण्याचे समर्थांनी निश्चित करून, त्याप्रमाणे प्रथम आपल्या महंतांना शिकवण दिली.

जगमित्र
 दासबोधाच्या निरनिराळ्या समासांत त्यांनी पुनः पुन्हा हा उपदेश केला आहे. 'दुःख दुसऱ्याचे जाणावे । ऐकून तरी वाटून घ्यावे । बरे वाईट सोसावे । समुदायाचे.' (११.५) अशा रीतीने लोकांच्या दुःखाशी आपण समरस झालो की लोक 'वोढोनि येती.' 'याकारणे मनोगत । राखेल तो मोठा महंत । मनोगत राखता समस्त । वोढोनि येती.' लोक राजी राखणे, लोकांचे मनोगत राखणे हे लोकसंघटनेचे मर्म आहे. हे कार्य लोकसेवेमुळे साधते. म्हणूने प्रत्येक महंताने जगमित्र झाले पाहिजे. आणि त्याने सकळांचे हृदय निवविले पाहिजे. 'शरीर परोपकारी लावावे । बहुतांच्या कार्यास यावे । उणे पडो नेदावे । कोणी येकाचे ॥' ' आडले जाकसले जाणावे । यथाशक्ती कामास यावे । मृदुवचने बोलत जावे । कोणी येकासी ॥' ही समर्थांनी उत्तम पुरुषाची लक्षणे म्हणून सांगितली आहेत. अशा उत्तम पुरुषांनाच त्यांनी मठाधिकारी म्हणून जागजागी नेमले होते.

उत्कट निःस्पृहता
 सेवा, परोपकर हे जसे, तसेच निःस्पृह वृत्ती हेही महंताचे तितकेच महत्त्वाचे लक्षण आहे. सेवेने जशी लोकांची मनोगते राखली जातात, त्यांची मने जिंकली जातात, तशीच त्याग, निःस्पृहपणा, निःस्वार्थबुद्धी, वैराग्य यांनी जिंकली जातात. विद्वत्ता कितीही मोठी असली तरी, स्वार्थाची जर शंका आली तर, लोकांवर तिचा प्रभाव पडत नाही. समर्थ म्हणतात, 'स्वतः निःस्पृह असेना । त्याचे बोलणेचि मानेना । कठिण आहे जनार्दना (जनतेला) । राजी राखणे ॥' उलट 'उत्कृट निःस्पृहता धरिली । त्याची कीर्ती दिगंती फाकली ॥' असे आहे. म्हणून चारित्र्य, निःस्पृहता, त्याग यांवर समर्थांनी फार कटाक्ष ठेवला आहे (दास. १९.६). दासबोधाच्या चौदाव्या