Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१५.
संताचे कार्य
 



 बहामनी कालातील नेतृत्वाचा विचार आपण करीत आहो. तेराव्या शतकाच्या अखेरीपासून सुरू झालेली मुस्लिमांची आक्रमणे, त्यानंतर काही काळ चाललेली दिल्लीच्या सुलतानांची सत्ता आणि नंतर प्रस्थापित झालेली बहामनी सत्ता ही महाराष्ट्रावर आलेली अस्मानी प्रलयापत्तीच होती. मराठ्यांची राजसत्ता तर मुस्लिमांनी नष्ट केलीच होती, पण त्याबरोबरच मराठ्यांचा हिंदुधर्म, त्यांच्या प्राचीन परंपरा, हा सर्व महाराष्ट्र समाज आणि या लोकांचे स्वत्व यांचा संपूर्ण नाश करण्याची प्रतिज्ञाच बहामनी सुलतानांनी केली होती. अशा वेळी या समाजाच्या नेत्यांनी या अनर्थापासून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी काय प्रयत्न केले आणि त्यांत त्यांना किती यश आले याचा शोध आपण घेत आहो. तो घेत असताना मराठा सरदार आणि ब्राह्मण शास्त्रीपंडित यांच्या कार्याची चिकित्सा गेल्या दोन प्रकरणांत आपण केली. तीतून असे दिसून आले की परकीय मुस्लिम आक्रमण व येथे प्रस्थापित झालेली मुस्लिम सत्ता ही नष्ट करून या समाजाचे रक्षण करण्याचे कसलेही प्रयत्न या दोन वर्गातील नेत्यांनी केले नाहीत. मराठे आपला क्षात्रधर्म विसरले होते आणि यवनसेवेतच ते धन्यता मानू लागले होते. आणि समाजाचे धारण करील, येथील सकळ लोकसंस्थेचे रक्षण करील असा जो प्राचीन वैदिक धर्म त्याचा शास्त्रपंडितांना विसर पडला होता. श्राद्धपक्ष, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, प्रायश्चित्तविधी यालाच ते धर्म मानीत होते. अशा स्थितीत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतांचा, या महापुरुषांचा या भूमीत उदय झाला नसता तर महाराष्ट्राचा सर्वनाश अटळ होता.