Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०३
शास्त्री पंडित
 

हिंदू पंडिताने का केली नाही ? महंमदाच्या बरोबर आलेला मुस्लिम पंडित अल्बेरुणी याने ही चिकित्सा करून हिंदूंच्या अनेक दोषांवर टीका केली आहे. पण महंमद गझनीच्या स्वाऱ्यासंबंधी किंवा त्यानंतरच्या आक्रमणासंबंधी, हिंदुपंडितांनी विवेचन करून शत्रूच्या विजयाची व आपल्या दोषाची कारणमीमांसा करून, समाजाला मार्गदर्शन केले नाही. या पंडितांचे सर्व लक्ष व्रत, दान, श्राद्ध, प्रायश्चित्ते यांवर होते. त्यांवर त्यांनी हजारो पानांचे ग्रंथ लिहिले. पण राजकीय परिस्थिती, इतिहास, शस्त्रास्त्रे, आरमार, यांविषयी त्यांनी एक अक्षरही लिहिले नाही.'
 डॉ. काणे यांनी ज्या अल्बेरुणीचा निर्देश केला आहे त्याची थोडी माहिती देतो. तीवरून तुलनात्मक दृष्टीने पाहाता येईल व तत्कालीन भारतीय शास्त्रीपंडितांचे वैगुण्य ध्यानात येईल. अबू रैहान महंमद अल्बेरुनी (९७३ - १०४८) हा गणितशास्त्रज्ञ ज्योतिषी, इतिहासकार व तर्कपंडित होता. संस्कृतमध्ये त्याने चांगले प्रावीण्य मिळविले होते. त्याने अनेक देशांतून प्रवास केला होता. सुलतान महंमद याच्या बरोबर तो हिंदुस्थानात आला होता. आणि तेथल्या परिस्थितीचा, चालीरीतींचा, पुराणे, गीता, वेद, यांचा अभ्यास करून त्याने 'तारीख अल् हिंद', 'हिंदुस्थानचे वर्णन' या नावाचा ग्रंथ लिहिला. त्याने अनेक ग्रीक ग्रंथांची भाषांतरे केली होती. भूगोल, पदार्थविज्ञान रसायन या शास्त्रांची त्याला आवड होती.
 हे वर्णन वाचून मनात येते की भारतात त्यावेळी असे दहापाच पंडित जरी असते तरी या देशाचा अधःपात झाला नसता. अनेक देशांत प्रवास केलेले, ग्रीक आरबी या भाषांचा अभ्यास केलेले, पदार्थ-विज्ञान, रसायन, इतिहास भूगोल याची आवड असणारे पंडित यावेळी भारताला हवे होते. ही परंपरा सातव्या आठव्या शतकापूर्वी येथे होती. पण पुढे मूढ व अविवेकी, अंध असे धर्मशास्त्र प्रवर्तित झाले आणि परदेश- गमन बंद झाले. परकी भाषांचे अध्ययन संपले आणि शब्दप्रामाण्यामुळे विद्याही लोपली. योगायोग असा की याच वेळी ग्रीक विद्येचे पुनरुज्जीवन करून मार्सिग्लिओ, विल्यम ऑफ ओकॅम, महाकवी दांटे, पियरी डुवॉईस या पाश्चात्य पंडितांनी पश्चिम युरोपात भौतिक विद्येचा प्रसार केला; अवलोकन, स्वतंत्र चिंतन, प्रयोग, बुद्धिप्रामाण्य इतिहासचिकित्सा या ज्ञानसाधनांची महती लोकांना पटवून दिली आणि युरोपचा उत्कर्ष घडवून आणला. भारतात प्राचीन काळी ग्रीकविद्येसारखीच विद्या होती. अकराव्या शतकातील किंवा बहामनी कालातील शास्त्रीपंडितांनी तिचे पुनरुज्जीवन केले असते तर पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे परकीय आक्रमणांचा निःपात करण्यास भारत समर्थ झाला त्याचप्रमाणे या काळातही तो समर्थ होऊन तेराव्या शतकातच हा देश स्वतंत्र झाला असता. पण त्या प्राचीन विद्येची गोडी या शास्त्रीपंडितांना मुळीच नव्हती. त्यांना व्रते, श्राद्धे, प्रायश्चित्ते, हाच धर्म असे वाटत होते. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यांतील- विशेषतः महाभारतातील श्रेष्ठ धर्मतत्त्वांची त्यांना जाणीवही नव्हती. असे शास्त्रीपंडित समाजाचे नेतृत्व काय करणार ?