गोटाही पुरवीत. गोव्याला हा माल तर पोर्तुगीजांना पुरवला जाईच, पण शिवाय फौजेचा सेनापती नुरीखान याने अली आदिलशहाच्या खुनाचाही कट केला होता ! पोर्तुगीजांचे शौर्य व शिस्त ही तर अव्वल दर्जाची होतीच, पण त्यांचा व्हाइसराय डॉन लुई हा विलक्षण कर्ता पुरुष होता. त्याची शिबंदी तुलनेने फारच कमी होती. पण त्याचा आत्मविश्वास असा दांडगा होता व वेढा घालणाऱ्यांना तो इतका कःपदार्थ लेखीत असे की गोवा व दाभोळ ही दोन्ही ठाणी संभाळून त्याने, झामोरिनने हल्ला चढविलेल्या दक्षिणेकडील मोल्यूकस व मोझँबिक या दोन्ही ठाण्यांना इकडून मदत पाठविली. त्याच वेळी काही पोर्तुगीज व्यापारी जहाजे गोव्याहून पोर्तुगालला निघाली होती. खरे म्हणजे संकटाला ओळखून डॉम लुई याने त्यांना थांबवून धरावयाचे. पण त्याला त्याची गरजच वाटत नव्हती. तो या संकटाला जुमानायलाच तयार नव्हता. त्याने खुशाल ती जहाजे जाऊ दिली आणि आपणच बाहेर पडून त्याने दाभोळवर हल्ला केला. बहामनी इतिहासात हा प्रसंग लहान आहे. पण या बहामनी शाह्यांच्या सामर्थ्याचा हिशेब देण्यास तो पुरेसा आहे.
अशी स्थिती असूनही मराठ्यांना त्या उलथून टाकता आल्या नाहीत. तसा प्रयत्नही मराठ्यांनी केल्याचे दिसत नाही. वास्तविक १४९० साली बहामनी सत्ता भंगली होती व तेव्हापासून १५३० पर्यंत विजयनगरची सत्ता अत्यंत प्रबळ होती. वीरनरसिंह व कृष्णदेवराय (इ. स. १५०३ - १५३०) हे सम्राट अतिशय पराक्रमी व समर्थ होते. त्यांनी विजापूर, बेदर या नगरींवर स्वाऱ्या करून त्यांचा विध्वंसही केला होता. या वेळी मोरे, सावंत, भोसले, राणे यांपैकी कोणाही एकदोन सरदारांनी उठाव केला असता तर विजयनगरच्या साह्याने त्यांना महाराष्ट्र स्वतंत्र करता आला असता. विजयनगरचे राजे या पाच शाह्यांच्या परस्परयुद्धात बहुधा कोणाची तरी बाजू घेऊन महाराष्ट्रात सारखे लष्कर घेऊन येतच असत. हिंदूंच्या उठावणीला साह्य करण्यासाठी ते निश्चितच आले असते. पण येथे उठावणीच झाली नाही ! महाराष्ट्र हा थंड गोळा होऊन पडला होता.
असे का घडले ते पाहण्याचा आता थोडासा प्रयत्न करू.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२९३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२६८
■