Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६७
बहामनी काल
 


भेदजर्जर
 मद्यपी, व्यसनासक्त, नालायक सुलतान, अल्पवयी वारस, त्यामुळे कारस्थाने करणारे वजीर व सरदार, आणि या पाच भिन्न शाह्या यांची अखंड चाललेली आपसा-आपस युद्धे ही कारणे कोणत्याही सत्तेचा शक्तिक्षय करण्यास पुरेशी आहेत. याच्या भरीला दक्षिणी परदेशी व शिया-सुनी यांचे कलह हेही मागल्या अंकावरून पुढे तसेच चालू होते. आदिलशाहीचा मूळ संस्थापक युसूफ आदिलशहा ह्याने शियापंथाची दरबारात प्रसिद्धपणे स्थापना केली. त्यामुळे पुष्कळ सुनी लोक नोकऱ्या सोडून गेले. त्याचा मुलगा इस्माइल याने दक्षिणी व हबशी लोकांना घालवून देऊन लष्करात व दरबारात परदेशी लोकांचा भरणा केला. इस्माइलनंतर त्याचा भाऊ इब्रहीम तख्तावर आला. त्याने शियापंथ मोडून सुनीपंथाची स्थापना केली व परदेशी लोकांना हाकलून देऊन दक्षिण्यांचा भरणा केला. १५५७ साली सुलतानपदी आलेला अली अदिलशहा हा शिया होता. त्याने सुनीपंथ मोडून पुन्हा शियापंथाला आश्रय दिला. १५८० साली इब्राहीमशहा २ रा गादीवर आला. सत्ता हाती येताच त्याने शियापंथ मोडून सुनी चालू केला. शेवटी औरंगजेबाने आदिलशाही बुडविली त्या वेळी ती शिया पंथी होती. औरंगजेब कट्टा सुनी होता. गोवळकोंडा व विजापूर यांशी त्याचे वैर असण्याचे, त्या दोन्ही शाह्या शिया होत्या, हे एक कारण होते. एक सुलतान जाऊन दुसरा तख्तावर येण्याचे वेळी बारशाच्या कलहाप्रमाणेच या पंथभेदामुळे व दक्षिणी-परदेशी भेदामुळे राजसत्तेला हादरे बसत.

पोर्तुगीजांपुढे
 विजापूरची ही जी वर कथा सांगितली तशाच इतर शाह्यांच्या कमीअधिक प्रमाणात कथा आहेत. अशा स्थितीत त्या कितपत बलशाली असू शकतील याची कल्पना करणे फारसे अवघड नाही. १५७० साली त्यांच्या बलाची कसोटी लागण्याचा प्रसंग आला. त्या साली अली आदिलशहा, मूर्तजा निजामशहा व कालिकतचा झामोरीन यांनी दोस्तीचा करार करून पोर्तुगीजांना भारतातून हाकलून लावून त्यांचा मुलूख वाटून घेण्याचे ठरविले. त्याअन्वये अलीशहाने गोव्याला व मूर्तजाने चौलास वेढा दिला. आदिलशहाची फौज दीड लक्षापर्यंत होती व निजामशहाचीही जवळजवळ तितकीच होती. उलट गोव्याच्या किल्ल्यात जेमतेम ४००० व चौलच्या किल्ल्यात ३००० लष्कर होते. असे असूनही आदिलशहा व निजामशहा यांना ८-१० महिने त्या दोन्ही किल्ल्यांनी दाद दिली नाही. शेवटी अपार हानी सोसून दोघांनाही वेढे उठवून परत जावे लागले. या लांछनास्पद अपयशाचे कारण पोर्तुगीजांचे शौर्य हे तर आहेच, पण मुस्लिम लष्करातील फूट, भेद व फितुरी हेही तितकेच प्रबल कारण आहे. चौलच्या किल्लेदाराला मूर्तजा निजामशहाचे बहुतेक सरदार बातम्या तर पुरवीतच, पण दाणा-