Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१९६
 

 प्राचीन काळापासून धनोत्पादनाचे व ते करणान्या वैश्ववर्णाचे त्या काळच्या धुरीणांनी असे महत्त्व जाणले होते तरी, धर्मशास्त्रात मात्र या वर्णाची प्रतिष्ठा मागल्या काळापासूनच कमी होऊ लागली, असे दिसते. स्त्रियो वैश्यः तथा शूद्राः तेऽपि यांति परां गतिम् | असा गीतेत यांचा शूद्रांबरोबर हीनत्वद्योतक उल्लेख केलेला आढळतो. बौधायन सूत्रात, वैश्य हे शूद्रांशी सर्रास मिश्रविवाह करतात व त्यांच्या व्यवसायांतही फारसा भेद नाही, यामुळे वैश्य हे शूद्रसम होत, असे म्हटले आहे (१-११-४). बौधायन धर्मसूत्राचा काळ इ. पू. ६०० ते इ. पू. ३०० म्हणतात. महाभारत साधारण याच काळातले आहे. पण त्यात तर सर्व वर्णातच सर्रास संकर चालू आहे, असे म्हटले आहे. तेव्हा संकरामुळे वैश्यांना हीनपद आले हे म्हणणे कितपत सयुक्तिक आहे याची शंका येते. याच काळात बौद्ध व जैन धर्माचा प्रसार होत होता. त्यातील अहिंसा तत्त्वामुळे वैश्यांनी हिंसाप्रधान असा शेतीचा धंदा सोडून दिला. आणि त्या वेळी ज्या वैश्यांनी तो सोडला नाही त्यांना अहिंसाश्रयी वैश्य हीन मानू लागले. असे कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांनी म्हटले आहे. हे मतही ग्राह्य मानणे कठीणच आहे. ब्राह्मण, क्षत्रिय हे वर्णसुद्धा प्रारंभी जरा आडपडद्याने व पुढे राजरोस शास्त्राधाराने शेती करीत असत. पण त्यामुळे त्यांना हीनत्व आले नाही. मग वैश्यांनाच का यावे, हे कळत नाही. याचा अर्थ असा दिसतो की धर्मशास्त्राचे दंडक व प्रत्यक्ष व्यवहार यात वैश्यांच्या बाबतीतही त्या काळी खूप अंतर पडले होते. सर्व भारतभर व जगभर संसार करणारे, रणविद्येतही निपुण असणारे, धनदौलतीचा प्रचंड व्यवहार करणारे असे जे वैश्य त्यांना शूद्रसम म्हणण्यात काहीच अर्थ नाही. हे वैश्य अनेक वेळा राज- सत्तारूढ होऊन साम्राज्येही स्थापीत व चालवीत हे मागे गुप्त, हर्ष यांची उदाहरणे देऊन सांगितलेच आहे. तेव्हा वंशशुद्धीच्या काही हेकट कल्पनांनी धर्मशास्त्रकार त्यांना हीन गणू लागले असे दिसते. प्रारंभी समाज किंवा सत्ताधारी राजे हे शास्त्र मानीत नसत. पुढे त्यांच्याही मनावर त्या शास्त्राचा प्रभाव पडू लागला तेव्हा मात्र या वर्गाला आणि सर्व वर्णांना हीनकळा आली व समाजाचा अधःपात झाला.

शूद्र वर्ण
 चातुर्वण्यांतील विवाहबंधने व व्यवसायबंधने यांविषयी येथवर विचार केला. त्यावरून असे दिसले की या कालखंडात वर्णभेद जरी अस्तित्वात होते तरी त्यांना तीव्रता आलेली नव्हती. अनुलोमविवाह तर शास्त्रमान्य व रूढ होते पण प्रतिलोमही अगदी वर्ज्य नव्हते, आणि प्रतिलोमसंततीला कोणी शूद्रही गणीत नसत. व्यवसाय- बंधने तर फारच ढिली होती. एक यजन याजन हा ब्राह्मणांचा व्यवसाय सोडला तर सर्व वर्गांचे लोक सर्व वर्णाचे व्यवसाय करीत असत. वरिष्ठ वर्णाच्या लोकांना खालच्या वर्णाचे व्यवसाय करण्यास शास्त्राची अनुज्ञा होती, पण खालच्या वर्णांना वरिष्ठ व्यवसाय करण्यास परवानगी नव्हती, असा एक समज आहे. व्यवहारात तर तो खोटा