होती. सातवाहनांच्या काळापासून यादव अखेरपर्यंत कोरीव लेखांत अशा श्रेणींचे विपुल उल्लेख सापडतात. हिंदूंचा व्यापार व उद्योग यांचे श्रेणीव्यवस्था हे पुरातन काळापासून प्रधान अंग होते. सातवाहनांच्या काळी सर्व महाराष्ट्रभर अशा संघांचे जाळेच पसरलेले होते. सर्व व्यापार व उद्योग यांच्यावर यांचे नियंत्रण असे, यांच्या मोठ्या पेढ्याही असत. त्यांनी धर्मार्थ अनेक देणग्या दिल्याचे उल्लेख आढळतात. कोष्टी, सोनार, गवंडी, तांबट यांच्याही श्रेणींचा उल्लेख, सातवाहनकालीन त्रिरश्मी पर्वत, कार्ले, कुडे, भीमाशंकर येथील लेण्यांत आढळतो. या श्रेणींना इतके स्थैर्य व प्रतिष्ठा होती की धर्मार्थ दान देणारे लोक आपला निधी या संघांच्या पेढ्यांत ठेवीत असत. राष्ट्रकूटांच्या काळच्या अशा श्रेणींचे वर्णन डॉ. आळतेकर यांनी आपल्या ग्रंथात सविस्तर केले आहे ( राष्ट्रकूट, पृ. ३६८-७० ). बेळगाव, मनगोळी, कोल्हापूर, मिरज येथील लेखांच्या आधारे त्यांनी त्यांच्या कारभाराचेही वर्णन केले आहे. यातील काही लेख राष्ट्रकूटांच्या काळचे तर इतर अनेक कल्याणीचे चालुक्य व यादव यांच्या काळचेही आहेत. या श्रेणींना आपल्या श्रेणीपुरते स्वतंत्र उपकायदे करण्याचाही अधिकार असे. ते कायदे संघाच्या सर्व सदस्यांवर बंधनकारक असत. मनू, याज्ञवल्क्य व उत्तरकालीन स्मृतिकार यांनी असा दण्डक घालून दिला आहे की राजांनी या कायद्यांना मान्यता देऊन त्यांचा अमल करण्यास साह्यही केले पाहिजे.
या श्रेणींना आपापले स्वतंत्र ध्वजही असत असे हरिवंशात वर्णन आहे. ही प्रथा दीर्घ कालपर्यंत चालू होती असे कोल्हापूरच्या लेखावरून दिसते. काही मोठ्या श्रेणींना छत्र व चामरे वापरण्याचाही अधिकार राजे देत असत. बदामी चालुक्यराज जगदेक- मल्ल १ ला (इ. स. १०१८ ते १०४० ) याने डंबळ येथील श्रेणीला असा अधिकार दिल्याचा उल्लेख डंबळ शिलालेखात आहे. या डंबळच्या श्रेणीचा ऐहोळी नगरीचे अधिपती असा निर्देश या लेखात आहे. ईस्ट इंडिया कंपनीला जसा राजसत्ता चालविण्याचाही अधिकार मिळाला होता तसाच अधिकार या श्रेणीला मिळाला असावा, असे डॉ.आळतेकर म्हणतात. अर्थात अशा श्रेणींना स्वतंत्र लष्कर ठेवण्याचा अधिकार होता हे ओघानेच आले. डंबळ व कोल्हापूर येथील लेखांत या श्रेणीच्या सदस्यांचा 'रणदेवतेचे प्रिय ' असा उल्लेख केलेला आहे. पाचव्या शतकातील मंदसोरच्या शिलालेखात संघसंदस्याचा, 'धनुर्धर, शत्रूंचा निःपात करण्यास समर्थ,' असा गौरव केलेला आढळतो. या संघांना सर्व भारतभर आपल्या व्यापारी मालाची ने-आण करावी लागे. तेव्हा मार्गातील चोर लुटारूंपासून आपले व आपल्या मालाचे रक्षण करण्यासाठी त्यांना लष्कर बाळगणे भागच होते. आपल्या कालखंडात दक्षिण भारताच्या पूर्वेला जावा- सुमात्रा या देशांशी व पश्चिमेला ग्रीस - रोम येथपर्यंत फार मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे. त्या वेळी धर्मप्रसारासाठी ब्राह्मण, साम्राज्यासाठी क्षत्रिय व व्यापारासाठी वैश्य सर्व जगभर फिरत असत. त्यामुळे त्या वेळचा समाज जिवंत व समृद्ध होता. याचे श्रेय ब्राह्मण- क्षत्रियांइतकेच वैश्यवर्णालाही आहे.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२२२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९५
समाजरचना