Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१५८
 

प्रसिद्धच आहे. त्यांचा एक मंत्री हेमाडी याने 'चतुर्वर्गचिंतामणी' या आपल्या ग्रंथात त्यांच्या वंशाची परंपरा देऊन त्यांचा हाच गौरव केला आहे. क्षीण झालेल्या धर्माला त्यांनी पुन्हा तरुणता प्राप्त करून दिली, असे तो म्हणतो. जैत्रपाळावर मुकुंदराजाने कृपा करून त्याला विवेकसिंधू ग्रंथ सांगितला ही कथा विश्रुतच आहे.

सहिष्णुता
 महाराष्ट्राची सर्व राजघराणी ही सनातन वैदिक धर्माची अभिमानी होती हे जितके खरे तितकेच हेही खरे की बौद्ध व जैन हे जे अवैदिक धर्मपंथ त्यांच्याकडे ते अत्यंत सहिष्णू व उदार दृष्टीनेच पाहात असत. सहिष्णुता ही भारतीयांच्या पिंडातच आहे. आणि महाराष्ट्र याला अपवाद नव्हता. उत्तरेत व अगदी दक्षिणेत क्वचित प्रसंगी बौद्ध जैनांचा छळ झाला, कधी कत्तलही झाल्या. पण हे सर्व अपवाद होत. सहिष्णुता हाच सर्वत्र नियम होता. इस्लाम धर्म हा अत्यंत असहिष्णू होय. इस्लामेतरांच्या तरुण वृद्ध, स्त्री, बालके, सर्वांच्या कत्तली करणे, त्यांच्यावर पाशवी अत्याचार करणे, त्यांना सक्तीने बाटविणे यातच इस्लामियांना भूषण वाटते. ते त्यांच्या धर्माचेच एक कलम आहे असे ते मानतात. अशा इस्लामियांशीसुद्धा हिंदू सहिष्णुतेने वागतात. हे आत्मघातकीपणाचे आहे, हे ध्यानात येण्याची ऐपत हिंदूंमध्ये तेव्हाही नव्हती व आजही नाही. राष्ट्रकूटकालीन असल्या सहिष्णुतेविषयी लिहिताना डॉ. आळतेकर म्हणतात, 'महंमद कासीम व महंमद गझनी यांनी केलेल्या अत्याचारांची माहिती असूनही हिंदुराजे मुस्लिमांशी सहिष्णुतेने वागत. याचा अर्थ असा की त्या काळचे हिंदू हे अदूरदृष्टी व अंध असून त्यांना त्यातून कोसळणाऱ्या अनर्थपरंपरेचे आकलन करण्याची बुद्धीच नव्हती. तेव्हा असे हिंदू, बौद्ध व जैन पंथीयांशी असहिष्णुतेने वागतील हे शक्यच नव्हते. बौद्ध विहार, जैन मठ, देवळे यांना हिंदूंच्या मठदेवळांप्रमाणेच महाराष्ट्रीय राजघराण्यांनी व धनिकांनी मुक्तहस्तांनी देणग्या दिल्याचे व भूदान केल्याचे शेकडो कोरीव लेखांत उल्लेख आहेत. काही राजांनी स्वतःसुद्धा जैनांना मंदिरे बांधून दिली होती. पुराणांनी बुद्धाला, तो वेदविरोधी असूनही, विष्णूचा अवतार मानून सर्व धर्मांचे ऐक्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच अनेक भिन्न पंथ येथे असूनही हिंदुसमाज त्या काळी भंग पावला नाही. तो एकरूप राहिला.

बौद्ध जैन- स्वरूप
 बौद्ध व जैन हे दोन वेदविरोधी नास्तिक पंथ इ. स. पूर्वी सहाव्या शतकात ईशान्य भारतातील बिहार प्रांतात प्रस्थापित झाले. त्यातील बौद्धधर्म इ. सनाच्या आठव्या नवव्या शतकात भारतातून अजिबात लोप पावला हे जरी खरे तरी अशोकाच्या काळापासून पुढे काही शतके त्याचा सर्व भारतात, इतकेच नव्हे, तर भारताबाहेरील