Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५७
धार्मिक जीवन
 


भागवत धर्म
 राष्ट्रकूटांच्या काळी श्रौत यागांचे महत्त्व कमी झाले होते. एकाही राष्ट्रकूट सम्राटाने अश्वमेध केलेला नाही किंवा वाजपेय, पौंडरिक इ. इतर यागही केले नाहीत. पण वैदिक परंपरा उच्छिन्न झाली असा याचा अर्थ नाही. वर सांगितलेच आहे की उपनिषत्- काळापासून यज्ञयागांचे महत्व कमी झाले होते, आता या सुमाराला जवळ जवळ नाहीसे झाले. पण वैदिक धर्माचेच भागवत धर्मात रूपांतर झाले होते. महाभारत व गीता हे त्याचे मुख्य ग्रंथ होत. सातवाहनांच्या काळापासून महाराष्ट्रात हा अद्वैत- वेदान्तनिष्ठ कर्मप्रधान भागवत धर्म प्रसृत झाला होता. असे असूनही इतके दिवस श्रौत यागांची लोकप्रियता काही अंशी टिकून होती इतकेच. आता तीही नाहीशी झाली. पण याही काळात अग्निहोत्र घेऊन अग्निपूजा करणारे ब्राह्मण अनेक होते. तशी परंपरा पुढे हजार वर्षे चालू होती. राजघराण्यातील आणि एकंदर श्रौत यज्ञांचे माहात्म्य कमी झाले हे मात्र खरे. त्या जागी आता पुराणांनी आणखी पुष्ट केलेला गीताप्रणीत भागवत धर्म अधिराज्य करीत होता.
 राष्ट्रकूटांचा मूळ संस्थापक दंतिदुर्ग हा सनातन धर्माचा कट्टा अभिमानी होता. माळव्यावरील स्वारीत उज्जयिनीस मुक्काम असताना त्याने हिरण्यगर्भ महादान केले. इ. स. ७५४ साली रथसप्तमीस त्याने आपली सुवर्णतुला केली व ते द्रव्य ब्राह्मणांस दान केले व मातेच्या आज्ञेवरून ब्राह्मणांना भूमिदानेही दिली. त्याचा चुलता कृष्णराज याने गादीवर आल्यावर वेरूळचे जगविख्यात कैलास लेणे कोरले आणि तेथील शिवलिंगाला सुवर्णालंकार व रत्नालंकार अर्पण केले. राजा अमोघवर्ष याचा जिवसेन नामक जैन साधू हा गुरू होता. पण तो लक्ष्मीचा भक्त होता. इतका की एकदा त्याने महालक्ष्मीला आपले बोट कापून वाहिले होते. धारवाड येथील सूर्य, महादेव या देवतांना त्याने जमिनी दान दिल्याचे लेखही सापडले आहेत. तिसरा इन्द्र नित्यवर्ष (इ. स. ९१४) हा उज्जयिनीच्या महाकाळेश्वराचा भक्त होता. गोविंद ४ था याने गोदातीरी कवठे या गावी सुवर्णतुला केली. ६०० गावे ब्राह्मणांना अग्रहार दिली व ८०० गावे देवालयांना दिली.
 कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव यांच्या काळी वैदिक परंपरेचा अभिमान उत्तरोत्तर वाढतच गेला. चालुक्य आहवमल्ल याने यज्ञयागही केले होते. आयुष्याच्या अखेरीस त्याला दोषी ताप आला. तेव्हा रघुराजांचा आदर्श पुढे ठेवून त्याने तुंगभद्रेत जलसमाधी घेतली. चालुक्य विक्रमादित्य ६ वा याने विजापूर जिल्ह्यातील आसिबिडी येथे विष्णुमंदिर बांधले व त्यासमोर एक तळेही खोदले. याज्ञवल्क्य स्मृतीचा प्रसिद्ध टीकाकार विज्ञानेश्वर हा त्याच्या दरबारी होता. 'विक्रमादित्यासारखा ऐश्वर्यसंपन्न राजा कधी ऐकलाही नव्हता व पाहिलाही नव्हता' असे विज्ञानेश्वराचे उद्गार राजाच्या सनातन धर्माभिमानाचे द्योतकच आहेत. यादव राजांची वैदिक धर्मनिष्ठा