Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१५०
 

शारीर एकात्मता (ऑरगॅनिक युनिटी) त्यांनी नष्ट करून टाकली. देशावर परचक्र आले असता येथला शेतकरी निर्लेप बुद्धीने शेत नांगरीत असे, हे केव्हा केव्हा भारताचे भूषण म्हणून सांगितले जात असते. अजूनही सांगण्यात येत असते. यापेक्षा जास्त करंटेपणा असू शकणार नाही. या परचक्राचे सुखदुःख त्याला काही नव्हते असा याचा अर्थ होतो. मग समाजाची शारीर एकात्मता कोठे राहिली ! ती राहू नये असेच येथले धर्मशास्त्र होते. या धर्मशात्राची बीजे प्राचीन काळापासून येथे आहेत. इ. स. पूर्वी पाचव्या सहाव्या शतकात झालेल्या सूत्रग्रंथांनी त्यांचा परिपोष करण्यास प्रारंभ केला. मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी तेच धोरण पुढे चालविले. तरी अजून या भूमीत बुद्धिप्रामाण्य होते. पुढे मीमांसकांनी ते नष्ट केले. मग सर्वत्र अंधार होऊन वर्ण, जाती, अस्पृश्यता यांची बंधने कडक, जास्त निष्ठुर होऊन व्यक्तीचे व्यक्तित्व या भूमीतून नाहीसेच झाले. स्वायत्त संस्था व लोकसंघटना यांचा तो पायाच असतो, यांचे ते प्राणतत्त्वच होय. ते नाहीसे होताच या समाजाचे कलेवर होऊन तो शतधा भंगून गेला व परकीय आक्रमणास बळी पडला.